बुधवार
१२ ऑगस्ट २०२६


आजऱ्यात मारामारी…
चौघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आमराई गल्ली परिसरात बार मध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये चौघे जखमी झाले असून शैलेश कृष्णा दारुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय पाटील रा.देवर्डे, कुलदीप केसरकर, अमर व्हळतकर दोघे रा.साळगाव व दीपक सुतार रा.आजरा या चौघां विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सदर प्रकार घडला. या मारामारीत फिर्यादी शैलेश दारुटे रा.आवंडी, आदित्य वंजारे रा. अमराई गल्ली, आजरा, मैनुद्दीन शेख रा. भारत नगर आजरा व संजय पाटील रा.देवर्डे हे जखमी झाले आहेत.
पुढील तपास पोलीस हवालदार शिकलगार करीत आहेत.

विहिरीच्या मोटारीचा शॉक लागून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू
दाभील येथील घटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभील (ता. आजरा) येथे विहिरीच्या मोटारीची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का लागून दाभील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच श्रावण गणपती वाजे (वय ५९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने दाभील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत नंदकुमार आनंदराव वाजे ( दाभील) यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. वाजे हे आपल्या वरवा नावाच्या शेतातील भातशेतीला पाणी देण्यासाठी दाभील येथील झीत्रे यांच्या ‘झोटींग माळ’ नावाच्या शेतातील गट क्रमांक १४८ मधील विहिरीवर गेले होते. भातशेतीसाठी पाणी सुरू करण्याच्या उद्देशाने ते विहिरीवरील विद्युत मोटारीची दुरुस्ती करीत असताना अचानक मोटारीचा विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
श्रावण वाजे हे दाभील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
ग्रामपंचायत व सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने ग्रामस्थांसह मित्रपरिवारातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.

राम मंदिर च्या दानपेट्यांतील रक्कम आमदार- खासदार फोडण्यासाठी…
शिवसेनेचा आरोप…आजऱ्यात महाआरती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अयोध्या येथील राम मंदिरातील कथित दानपेटी रक्कम चोरी प्रकरणी आजरा तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे व उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा व महाआरती करून या प्रकरणाचा निषेध केला. एकीकडे राम मंदिराच्या देणग्या गायब होत आहेत तर दुसरीकडे आमदार खासदार फोडले जात आहेत. याचाच अर्थ हा पैसा आमदार, खासदार फोडण्यासाठी केला जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी तिकडे राम मंदिरात झालेल्या चोरीची पुनरावृत्ती बाळूमामा मंदिरातही झाली आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काही बोलत नसल्याचा आरोप केला.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, जनतेला सरकारचा कारभार कळावा यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सरकार विरोधात तरुणाई आता रस्त्यावर उतरू लागली आहे. ईव्हीएम वर गोलमाल करून निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत यांचेही भाषण झाले.
यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी राधानगरी विधानसभा संपर्कप्रमुख दीनानाथ चौगुले, दिनेश कुंभीरकर, संजय येसादे, संजूभाई सावंत, शिवाजी आढाव, भिकाजी विभुते, डॉ. धनाजी राणे शांताराम पाटील, अनुसया पाटील, मीना पुजारी, सुजय पाटील, रोहन गिरी, प्रथमेश खोत, रंगराव माडभगत, तानाजी डोंगरे, जयसिंग मनोळकर, अमित गुरव, अभिजीत संकपाळ, दिनेश कांबळे, महेश पाटील, सौरभ पाटील, राजेंद्र पाटील, बबन चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आजरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे, आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देश-विदेशात पोहोचविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व द्रष्टे नेतृत्व डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल आजरा येथे सर्वपक्षीयांच्या वतीने जनता बँक सभागृहात शोकसभा घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शोकसभेचे प्रास्ताविक करताना उमेश आपटे म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील दादांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले. त्यांनी केलेले उत्तुंग कार्य त्यांना सदैव अजरामर ठेवेल. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
श्रीमती अंजना रेडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव केला.कॉ. संपत देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाले.
मुकुंददादा देसाई यांनी डॉ. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, मौनी विद्यापीठाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्थेला नवी उंची मिळवून दिली. आज लाखो विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा लाभ घेत आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षणाची गंगा उभी केली. डॉ. पाटील यांनी पाहिलेले विकासाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पुढे नेण्याचे काम त्यांचे सुपुत्र, कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे सतेज उर्फ बंटी पाटील करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शोकसभेस रणजीत देसाई, अनिल फडके, राजू होलम, सुभाष देसाई, दिगंबर देसाई, अमित सामंत, शशिकांत नार्वेकर, निसार लाडजी, नौशाद बुडे्डखान, किरण कांबळे, परशुराम बामणे, सरिता कांबळे, संजयभाऊ सावंत, रवींद्र भाटले, विक्रम देसाई, बाकीव खेडेकर, सुफीयान खेडेकर, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत, युवराज पोवार, सुनील शिंत्रे, अशोक शिंदे, शांताराम पाटील, निवृत्ती कांबळे, जोतिबा चाळके, दत्ता कांबळे, सुभाष विभूते, गौरव सुतार, संतू कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरीच्या वर्धापन दिनानिमित्त आजरा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर्स, कोल्हापूर यांच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आजरा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास आजरा तालुका असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पारपोलकर यांच्यासह एस. एस. मकानदार, मंचिंद्र डवरी, सर्जेराव बोटे, अमित गोसावी, बुरहान खेडेकर, सुभाष सुतार, सतीश पवार आणि ओंकार परीट संग्राम आपके विजय येझरे उपस्थित होते.
भविष्यातही अशाच प्रकारचे विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

शहरी नियमानुसार गॅस सिलेंडर पुरवठा करा…
आजरा शहरवासीयांची मागणी

आजरा : मृत्युंजय माणूस वृत्तसेवा
सद्यस्थितीत आजरा शहराला केला जाणारा एचपी गॅस सिलेंडर पुरवठा हा गवसे या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या एजन्सी मार्फत केला जातो. शासकीय नियमानुसार ग्रामीण भागातील ग्राहकाला ४५ दिवसानंतर गॅस करता बुकिंग करावे लागते. बुकिंग नंतर पुन्हा दोन-चार दिवस निघून जातात. यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने शहरी निकषानुसार हा कालावधी २५ दिवसाचा करण्यात यावा अशी मागणी असे तहसिलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शरीफ खेडेकर, जावेद पठाण, अबूसईद माणगावकर, सुशील लतीफ, गौस मुल्ला आदी उपस्थित होते.

आजचे पंचांग
दिनांक : १२ ऑगस्ट २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या तिथी (रात्री ११.०५ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (सकाळी ०७.५९ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : व्यातीपात योग (दुपारी ०३ .२५ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : चतुष्पाद करण (दुपारी १२.२७ पर्यंत) त्यानंतर नागवा करण
चंद्र राशी : कर्क राशी (१३ ऑगस्ट सकाळी ०६.०६ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४३ ते दुपारी ०२.१९ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
प्रवीण परीट

देवकांडगाव तालुका आजरा येथील प्रवीण पांडुरंग परीट (वय ४५ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने इचलकरंजी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन मुले असा परिवार आहे.


