mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार 

७ ऑगस्ट २०२६

आजऱ्यात भटक्या घोड्यांचा नवा उपद्रव, नागरिक त्रस्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा शहरात आधीच भटकी कुत्री आणि भटकी जनावरे यांचा उपद्रव वाढला असताना आता नव्याने भटक्या घोड्यांचा त्रास सुरू झाला आहे. बाजारपेठ आणि संकेश्वर-बांदा महामार्गावर घोड्यांचे कळप रस्त्यावर उभे दिसत आहेत.

वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच रस्त्यावर शेणामुळे घाण आणि घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना आणि बाजारासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनाही याचा मोठा त्रास होत आहे.

प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन भटक्या घोड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नगरसेविका रहिमतबी खेडेकर यांना न्यायालयाकडून दिलासा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या बांधकाम समिती सभापती, नगरसेविका रहिमतबी खेडेकर यांच्या सर्वसाधारण मागास प्रवर्ग जातीचा दाखला अवैधतेला न्यायालयातून तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

नगरसेविका रहिमतबी खेडेकर ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग ३ मधून इतर मागास प्रवर्गातून मोठ्या चूरशीने निवडून आलेल्या होत्या.गत सभागृहातील माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांचा पराभव केला होता.

रहिमतबी खेडेकर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुमैय्या खेडेकर यांनी जात पडताळणी समितीकडे दाद मागितली होती.रहिमतबी यांचा ‘दर्जी’ जात प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे याचे पुरावे समितीला सादर केले होते समितीने दोघांचेही म्हणणे ऐकून घेत अखेर योग्य पुराव्याअभावी रहिमतबी यांचा जातीचा दाखला अवैध ठरविला होता.

या निर्णयाविरुद्ध रहिमतबी यांनी उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाद मागितली होती.अखेर रहिमतबी खेडेकर यांना न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असल्याने नगरसेवक पद अपात्रतेची संकट तुर्तास तळले आहे.

मडिलगे येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसांत तक्रार दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील मडिलगे येथील २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणी दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घरातून बेपत्ता झाली आहे.

बेपत्ता तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित तरुणी घरातून आजरा येथे गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही.

पोलीस हवालदार पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.

आजरा तालुक्यात हत्तीच्या धुमाकुळाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

यंदा पावसाने शेतीला दिलासा दिला असला तरी वन्य हत्तींच्या धुमाकुळामुळे आजरा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. गेली १९ वर्षे धनगरमोळा-घाटकरवाडीपुरता मर्यादित असलेला हत्तींचा वावर आता भटवाडी आणि मुरुडे परिसरातही पोहोचला आहे.

रात्रीच्या वेळी शेतात घुसणारा टस्कर हत्ती भातरोप, नाचणी आणि ऊस पिकांची नासधूस करत आहे. दत्तात्रय तेंडुलकर, बाबू तेंडुलकर, अर्जुन बोलके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आधीच वाढते उत्पादन खर्च, मजुरांचा तुटवडा आणि हमीभावाचा प्रश्न असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. सातेवाडी-कासारकांडगावमध्ये काही शेतकऱ्यांनी शेतीच पडीक ठेवली आहे.

वन विभागाची नुकसानभरपाई अत्यल्प आणि उशिरा मिळत असल्याची तक्रार आहे. तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ७ ऑगस्ट २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी (दुपारी ०४.३६ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (सायंकाळी ०६.४२ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : वृद्धि योग (दुपारी १२.१० पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : गराजा करण (दुपारी ०४.३६ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०८ ते दुपारी १२.४४पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

उत्तूर येथे ८ ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज, योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तूर, सह्याद्री निसर्ग मंडळ आणि संवेदना फाउंडेशन, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नेहरू चौक, उत्तूर येथे रानभाजी महोत्सव होणार आहे.महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन, परिसरातील रानभाज्यांची विक्री-खरेदी तसेच रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून आयोजित केला जाणारा हा महोत्सव नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे.

उत्तूर व परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी तसेच निसर्गप्रेमींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आजरा गडहिंग्लज शटल सेवा विस्कळीत … विद्यार्थी, नोकरदारांसह प्रवाशांची गैरसोय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा आणि गडहिंग्लज आगारांतर्गत पूर्वी नियमितपणे सुरू असलेल्या आजरा- गडहिंग्लज शटल सेवेचे वेळापत्रक बदलून ती आजरा-गडहिंग्लज -संकेश्वर अशी करण्यात आल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या निर्णयाबाबत प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शटल सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

पूर्वी आजरा गडहिंग्लज मार्गावर सुमारे प्रत्येक २० मिनिटांनी एसटी बस उपलब्ध होत होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना नियमित आणि वेळेवर प्रवासाची स्विधा मिळत होती. मात्र, संकेश्वरपर्यंत फेऱ्या वाढविल्यानंतर आजरा-गडहिंग्लज मार्गावरील बसचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून बस कधी येईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामु‌ळे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. यापूर्वी आजरा आगाराच्या २१ आणि गडहिंग्लज आगाराच्या २१ अशा एकूण ४२ शटल फेऱ्या सुरु होत्या. सध्या आजरा आगाराच्या फेऱ्यांची संख्या २३ करण्यात आली असली, तरी बसचे किलोमीटर वाढविण्याच्या उद्देशाने संकेश्वरपर्यंत फेऱ्या वाढविल्याने आजरा- गडहिंग्लज मार्गावरील एसटीचे पत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.

ही सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एक किलो १०० ग्रॅम गांजासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!