शनिवार
२५ जुलै २०२६


आ.सदाभाऊंच्या कथित विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना देशद्रोही असे वक्तव्य केल्याच्या कथित विधानाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आजरा युवासेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख समीर चांद शिवसेना शहरप्रमुख सागर नाईक, युवासेना शहर प्रमुख रोहन गिरी, संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव, दिनेश कांबळे, संजूभाई सावंत, चंद्रकांत व्हरकटे, बिलाल लतीफ, सुयश पाटील, शंकर पाटील, प्रथमेश खोत, सागर नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कानोलीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा ) येथील अर्जुन आप्पा पाटील ( वय ७७ वर्षे) यांना शेतामध्ये सर्पदंश झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा काल शुक्रवारी मृत्यू झाला.
ते बुधवार दि. २२ रोजी पट्टी नावाच्या शेतात गेले होते, त्यावेळी त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. सुरुवातीला त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात व पुढे प्रकृती गंभीर झाल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. कानोलीचे माजी सरपंच संभाजी आपगे यांचे ते सासरे होत.
रक्षाविसर्जन रविवारी सकाळी आहे.

आजऱ्यात २०० रुपयांच्या बोगस नोटांचा सुळसुळाट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या आठवडाभरापासून आजरा शहरात २०० रुपयांच्या बोगस नोटा मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने आर्थिक संस्थांसह व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
विशेषतः शुक्रवारच्या आठवडा बाजारात या नोटांचा वापर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला, किराणा , औषधे आणि कपड्यांच्या खरेदीसाठी या नोटा दिल्या जात आहेत.
बनावट नोटा हुबेहूब असल्याने सर्वसामान्यांसह व्यापारी, बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही त्या ओळखताना मोठी अडचण निर्माण होत आहे. बनावट आणि अस्सल नोटांमधील फरक ओळखण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
नागरिकांनी सतर्क राहून व्यवहार करताना नोटांची नीट तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजरा महाविद्यालयात नशामुक्तीचा निर्धार ; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून स्वतःचे आरोग्य, कुटुंब आणि समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवावे, असे प्रतिपादन प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. ते आजरा महाविद्यालय, आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नशामुक्त अभियान, कोल्हापूर’ अंतर्गत आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार होते.
त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प कृतीत उतरवून समाजात जनजागृतीचे कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शिंत्रे यांनी व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम स्पष्ट करत युवकांना तंबाखू, गुटखा, मद्य आणि इतर अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रा. रत्नदीप पवार यांनी सर्व उपस्थितांना नशाविरोधी शपथ दिली.
डॉ. अविनाश वर्धन यांनी स्वागत व प्रास्ताविक करून अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अविनाश वर्धन व प्रा. रत्नदीप पवार यांनी केले. . सौ. रुपाली पिळणकर यांनी आभार मानले.

निधन वार्ता
तुकाराम कुंभार

कुंभार गल्ली, आजरा येथील तुकाराम भैरु कुंभार ( वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फोटो क्लिक…

आजरा – गडहिंग्लज मार्गावर शासकीय विश्रामगृह ते रामतीर्थ फाट्या नजीक असणाऱ्या पांडुरंग कोले यांच्या घरासमोर शुक्रवारी सकाळी चार चाकी पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

छायावृत्त…

एकीकडे खरिपाची घाई सुरू असताना दुसरीकडे भर दुपारी गव्यांनी कळपाने हजेरी लावून ऊस पिकासह भात-तरव्यांचे मोठे नुकसान सुरू केले आहे. शेती करायची की नाही ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रा. मनोज देसाई यांच्या शेतामध्ये काल शुक्रवारी दुपारी चार वाजता गव्यांच्या कळपाने हजेरी लावली होती.
पाऊस पाणी...
गेले आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने थोडीफार उघडीप दिली असली तरीही तालुक्यात घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर होत असून झुलपेवाडी ता. आजरा येथील येसूबाई शामराव बेळवेकर यांच्या राहत्या घरांची भिंत पडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २५ जुलै २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी तिथी (सकाळी ११.३४ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (२६ जुलै सकाळी ०७.३४ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : ब्रह्म योग (रात्री ०९.०८ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.३४ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३० ते सकाळी ११.०७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


