मंगळवार
२१ जुलै २०२६


पावसाचा जोर वाढला..
तालुक्यातील पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने साठ्याच्या मार्गावर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरि तालुक्यात पुन्हा एक वेळ पावसाचा जोर वाढला असून तालुक्यातील पाणी प्रकल्पामध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत असून पूर्ण क्षमतेने प्रकल्प बांधण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्फनाला प्रकल्प रात्री पूर्ण क्षमतेन भरला आहे. सांडव्यातून ७० क्युसेक्सने पाण्याच विसर्ग सुरु झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला सर्फनाल्याचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले. यंदा पाणीसाठा करण्याचे तिसरे वर्ष आहे. प्रकल्पाची क्षमता ६७० दशलक्ष घनफूट इतकी आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरला असून सांडव्यातून सुमारे ७० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र हिरण्यकेशी नदीकाठावरील वीस गावांचे आहेः सुमारे २ हजार ६४४ हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्याचबरोबर अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटतो. त्यामुळे हा प्रकल्प तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान मानला जातो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे प्रशासनाने हिरण्यकेशी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चित्री, आंबे ओहोळसह उचंगी प्रकल्पामध्ये पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी आज आजऱ्यात निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दिल्ली येथे जंतरमंतरवर चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी शिवतीर्थ येथे जाहीर निदर्शने करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
जंतर-मंतर येथे गेले २० दिवस नीट पेपर फुटी प्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी शांततामय पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आंदोलन बेदखल करण्याचा हा प्रकार आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध व जाब विचारण्यासाठी आज संसदेवर निघालेल्या मोर्चावर अमानुष पद्धतीने लाट्याला करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले आहेत. सरकारची ही कृती अमानुष असून लोकशाही विरोधी आहे. लोकशाहीमध्ये लोकांना आपला विचार मांडण्याची आणि सरकारच्या धोरणाविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्याचा अधिकार असतो पण हा अधिकारच सरकार नाकारत आहे. सरकारच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
आज मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीला कॉ. संपत देसाई, सुभाष विभुते, रावसाहेब देसाई, रवींद्र भाटले, कॉम्रेड शांताराम पाटील, कॉम्रेड दत्ता कांबळे, प्रकाश मुरुसकर, कॉम्रेड संजय तरडेकर, महादेव सुतार, पुष्पलता घोळसे, प्रा. मीना मंगळूरकर, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, व्ही.डी. जाधव, दशरथ घुरे, भीमराव माधव, शिवाजी गुरव, संजयभाई पवार, निवृत्ती गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

हुंडाबळी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सैनिक वेलफेअर फौंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सैनिक, माजी सैनिक वेलफेअर फौंडेशन, आजरा यांच्या वतीने हुंड्यासाठी सौ. अस्मिता काटकर या विवाहित महिलेचा छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा तालुक्यातील राजारामपुरी मूळ गाव लाटगावच्या अस्मिता प्रतीकसिंह काटकर रा. सायबर चौक, कोल्हापूर यांचा हुंड्याच्या कारणावरून सातत्याने छळ झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अशा अमानुष घटना समाजासाठी काळिमा फासणाऱ्या आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष व जलद चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहितेसह इतर कायद्यानुसार कडक गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी, आणि कोणत्याही आरोपीला राजकीय किंवा इतर कोणतेही संरक्षण मिळू नये अशी मागणी फौंडेशनने केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर दत्तात्रय मोहिते, दत्तात्रय सावंत, कृष्णा पाटील, सुरेश हसबे, सखाराम कुंभार, राजेंद्र सावंत/मुंगूस वाडी,शंकर पाटील/देवर्डे, आनंदा तेमकर, रूपचंद्र गावडे आदींच्या सह्या आहेत.

रामदेव गल्ली व कुंभार गल्लीत गतिरोधक बसवा – नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील रामदेव गल्ली व कुंभार गल्ली येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या दोन्ही गल्ल्यांमध्ये तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांनी नगरपंचायत आजराचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दोन्ही गल्ल्यांमधील रस्ते तीव्र उताराचे असल्याने वाहनांचा वेग नियंत्रित राहत नाही. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास सतत धोका निर्माण होत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रामदेव गल्लीमध्ये दर आठवड्याला बाजार भरत असल्याने व्यापारी, ग्राहक व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारातून न वाहता थेट रस्त्यावरून वाहत असल्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय होतो. परिणामी व्यापारी, ग्राहक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही गल्ल्यांमध्ये रबरी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग नियंत्रित होईल, अपघाताचा धोका कमी होईल आणि पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊन ते गटारात जाण्यासही मदत होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनाही पाठविण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी डॉ. स्मिता कुंभार नगरसेविका, सुधीर कुंभार ,भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष परशुराम बामणे, नगरसेवक व अध्यक्ष अन्याय निवारण समिती. किरण कांबळे, नौशाद बुड्डेखान व कार्यकर्ते उपस्थित होते.

सेक्युलर मुव्हमेंटचा सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र (आजरा, गडहिंग्लज, चंदगड) या संघटनेच्या वतीने आजरा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत संघटनेने दडपशाहीचा निषेध केला.
NEET सह स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहाराची चौकशी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, लडाखला सहाव्या अनुसूचीप्रमाणे घटनात्मक संरक्षण, स्थानिक स्वराज्य व पर्यावरण संरक्षण या मागण्या करण्यात आल्या.
मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी अजय देशमुख, रवी भोसले, सागर कांबळे, प्रवीण कश्यप, सर्जेराव कांबळे, अंकुश कांबळे, शिवाजी गुरव, काशिनाथ मोरे, दत्तात्रय कांबळे भिकाजी कांबळे, संदीप कांबळे, संतोष मासोळे, शिवाजी कांबळे, शशिकांत कांबळे व इतर उपस्थितड होते.

हंदेवाडीतील समस्या तात्काळ सोडवा – ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी, ता. आजरा येथे गटारीचे काम ठेकेदारांनी अर्धवट सोडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. माती ट्रॉलीत न भरल्याने पावसात गल्लीत चिखल झाला आहे. पिण्याच्या नळासमोर मोठी चर पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. तसेच शाळेच्या संडास-बाथरूमसमोर पाणी साचत असल्याने लहान मुलांना शाळेत येण्यास अडचण होत आहे. याशिवाय गावात २-३ दिवसांनीच पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात सुभाष सावंत यांनी जॅकवेलवरील मोटर कमकुवत असल्याने नवीन मोटर बसवणार असल्याचे आणि गल्लीत खडी टाकणार असल्याचे सांगितले, मात्र ग्रामसेवकांकडे वेळ नाही असे कारण दिले जात आहे. शाळा व्यवस्थापन समितीने ई-लर्निंगसाठी तात्काळ टीव्ही संच द्यावा आणि शाळेमागील धोकादायक झाड काढावे अशीही मागणी केली आहे. या सर्व समस्या कोणतीही कारणे न देता तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा भर पावसाळ्यात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याकडे बी.डी.ओ., सी.ई.ओ. आणि आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
फोटो क्लिक….

आज जरी या चित्राची ओळख पटत नसली तरी सोमवार पर्यंत ती पाण्याची टाकी होती. हत्तीने पाण्याच्या टाकीची दशा अशी केली आहे.
स्थळ : गणेशवाडी

आजचे पंचांग
दिनांक : २१ जुलै २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (२२जुलै पहाटे ०५.१६ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (रात्री ०८.४८ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : सिद्ध योग (सायंकाळी ०६.२४ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ०४.३४ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कन्या राशी (सकाळी ०७.५४ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.०१ ते सायंकाळी ०५.३९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


