सोमवार
२९ जून २०२६

उत्तूरच्या पहिल्या महिला सरपंच मालुताई आमणगी यांचे निधन

उत्तूर : मंदार हळवणकर
उत्तूर गावच्या पहिल्या महिला सरपंच तथा विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री. किरण शंकर आमणगी यांच्या आई श्रीमती मालुताई शंकर आमणगी यांचे शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी निधन झाले.
मालुताई आमणगी यांनी उत्तूर. ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून कार्य करत गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आजरा तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद : ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा तालुका आजरा येथील शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री. सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य श्री. शिरिष देसाई, पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य श्री. समीर पारधे, पंचायत समिती सदस्य श्री. विकास चोथे तसेच नगराध्यक्ष श्री. अशोक चराटी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांनी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन केले. तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओची मात्रा देऊन देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण व उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय, आजरा यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यासाठी तालुक्यात १०८ पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी २६५ कर्मचारी व २४ सुपरवायझर कार्यरत होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात ५०३३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले असून ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण पुढील चार दिवस घरभेटीद्वारे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
या मोहिमेस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.
पल्स पोलिओ मोहिमेसाठी उत्तूर आरोग्य केंद्राचे प्रभावी नियोजन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत एकही बालक वंचित राहू नये, यासाठी उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राने व्यापक नियोजन केले. सहा उपकेंद्रे व २१ गावांमध्ये दोन दिवस ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली.
रविवारी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला. उत्तूरमधील विविध केंद्रांसह बसस्थानकावर येणाऱ्या बसमधील पाच वर्षांखालील बालकांनाही पोलिओची लस देण्यात आली.
मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. रविवारी लसीकरणापासून राहिलेल्या बालकांना सोमवार व मंगळवारी घरोघरी भेट देऊन पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.

पोळगाव येथे गोमातेचे दणक्यात डोहाळे जेवण…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एखाद्या कुटुंबाला पाळीव प्राण्यांचा लढा लागला की तो प्राणी त्या घराच्या कुटुंबातीलच घटक होऊन जातो. मग ते कुटुंब शेतकरी असेल तर मग विचारायची सोयच नाही. पोळगाव येथील उत्तम वसंत नार्वेकर यांच्या कुटुंबीयांच्या घरातील पाळीव गाय त्या कुटुंबाचा घटक बनली आणि कुटुंबातील एखाद्या सुवासिनी मुलीप्रमाणे त्या गाईचे डोहाळे जेवण देखील दणक्यात घालण्यात आले.
‘ कृष्णावी ‘ गाय म्हणजे नार्वेकर कुटुंबीयांचा जीव की प्राण. तिची स्वच्छता, तिचे आरोग्य, आहार याची विशेष काळजी कुटुंबातील प्रत्येक घटक घेताना दिसतो. गाय गाभण राहिल्यानंतर या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
काल रविवारी कृष्णावीचे डोहाळे जेवण दणक्यात घालण्यात आले. कृष्णावीला नटवून- सजवून तिचे औक्षण करून तिच्या आवडीचे विविध पदार्थ तिला खाण्यास देण्यात आले.
संपूर्ण पोळगावकरांनी हा सोहळा डोळे भरून पाहिलाच पण त्याचबरोबर नार्वेकर कुटुंबीयांचे कौतुकही केले.

तालुक्यात पावसाची दमदार हजेरी...

अजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला असून खरीपाची कामे पुन्हा एकदा वेगावली आहेत.
रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. सायंकाळ नंतर मात्र पावसाने थोडा जोर धरला असून सोमवारी सकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे भात तरवांना जीवदान मिळाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रोप लावणी ला सुरुवात झाली आहे. इतरत्र पावसाने हजेरी लावली असली तरी जोरदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे.
चित्री नदीत कोरडी...
चित्री प्रकल्पातून आवर्तने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आजरा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पाऊस आहे, चित्री प्रकल्पात पाणी आहे. परंतु नदीचे पात्र पूर्ण कोरडे झाले आहे. नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा नाही अशी अवस्था शहर वासीयांची झाली आहे.

वझरे ग्रामपंचायतीची नाहक बदनामी नको…
मुक्काम एस टी प्रकरणी सरपंचांचे आवाहन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे मुक्काम गाडी प्रकरणी एसटी प्रशासनाने दिशाभूल करण्याची माहिती दिली आहे. यामुळे ग्रामपंचायतीची व कारभाऱ्यांची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
गावात एस. टी. महामंडळाचा कोणताही अधिकारी येऊन त्याने चालक वाहकांच्या सुविधेबाबत पाहणी केलेली नाही. सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती ती नको म्हटल्यानंतर पुन्हा सुसज्ज असे स्वच्छतागृह असणाऱ्या शाळेमध्ये मुक्कामाची सोय केली. परंतु माकडांनी कौले फोडली असे जुजबी कारण देत ती नाकारली. पुन्हा स्थानिक संदीप पाटील यांच्या स्वच्छतागृहाची सोय लावली होती त्यालाही त्यांनी नकार दिला. गेली चार वर्षे ग्रामपंचायतच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या तेव्हा कोणतीही अडचण आली नाही आणि आता मात्र मुक्कामाच्या दृष्टीने वेगवेगळ्या अडचणी वाहक व चालकांकडून सांगितले जात आहेत.
ग्रामीण भागात असणाऱ्या वझरे गावांमध्ये उपलब्ध सोयी- सुविधा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. परंतु प्रत्येक वेळी कारणे सांगितली जात असतील तर त्याला वझरे ग्रामस्थ काय करणार ? असं संवालही उपस्थित केला आहे.
निधन वार्ता
सुवर्णा अमनगी

उत्तूर येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी श्री. सुहास शिवानंद आमणगी यांच्या आई श्रीमती सुवर्णा शिवानंद आमणगी (वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी व एचएससी परीक्षेतील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकेत शाळेच्या निकालाचा चढता आलेख, शालेय उपक्रमाबद्दल माहिती सांगून दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या क्षेत्रात चांगले काम करून सुजान नागरिक बना अशा शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रमुख पाहुणे सुनील सुतार व इतर मान्यवरांचे तसेच उपस्थित पालकांचे स्वागत वृक्षांची रोपे देऊन करण्यात आले.पाहुण्यांच्या हस्ते आजरा तालुक्यात एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या कु . खदीजा शहानवाज मुल्ला हिचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुधीर मुंज , उपाध्यक्षा श्रीम.विमल भुसारी ,सचिव मलिककुमार बुरुड, सुधीर कुंभार,संभाजी इंजल या मान्यवरांच्या हस्ते हापीज समीर आगा, श्रेयशी शिवाजी बोलके, युविका अमर पवार, सफिना युसुफ शिकलगार तसेच बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थिनी कु. साक्षी सुनील करडे, सानिका संतोष लाड, राधा दिलीप गुरव यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा .डॉ. सुधीर मुंज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी शहानवाज मुल्ला, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड आणि आभार विजय राजोपाध्ये यांनी मानले.

आजचे पंचांग
दिनांक : २९ जून २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा तिथी (३० जून पहाटे ०५.२५ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (३० जून पहाटे ०४.०३ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : शुक्ल योग (दुपारी ०२.२५ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ०४.१६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४४ ते सकाळी ०९.२४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


