mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि.६ एप्रिल २०२६

शॉर्ट सर्किटने आग
लाखाचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शॉर्टसर्किटने गांधीनगर, आजरा येथील छत्रपती संभाजी नगर मधील संयोगिता संजय सरदेसाई यांच्या घराला  लागलेल्या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू ,कपडे, पैसे, भांडी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर व त्याचे पती महेश खेडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी  आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हातावरचे पोट असणाऱ्या सरदेसाई कुटुंबांच्या समोर आगीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे‌.

बहिरेवाडीत त्रिवेणी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर यांच्या वतीने बहिरेवाडी (ता. आजरा) येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक रामभाऊ देशपांडे व ॲस्टर आधार, कोल्हापूरचे डॉ. अजित कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सन्मान स्वीकारताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी स्व. अनंतराव आजगावकर यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्याचे सांगितले. त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या असून त्यांच्या विचारांचे चिंतन होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

रामभाऊ देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर डॉ. अजित कुलकर्णी यांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला.

यावेळी कै. अनंत विष्णु आजगावकर स्मृती पुरस्कार डॉ. श्रीपाद जोशी (जत) यांना प्रदान करण्यात आला. दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार समीर कुलकर्णी (गडहिंग्लज) यांना मिळाला. पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वाती उपाध्ये यांच्यासह इतर गुणवंत शिक्षकांना देण्यात आला.

त्रिवेणी जीवनगौरव पुरस्कार डॉ. शिवशंकर उपासे यांच्यासह मान्यवरांना प्रदान करण्यात आला. तसेच प. पू. बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार रमजानभाई आत्तार यांना देण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच रत्नजा सावंत, पं. स. सदस्य प्रकाश चोथे, पुरस्कारप्राप्त मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. श्रीकांत नाईक यांनी केले, स्वागत टी. के. पाटील यांनी केले, तर आभार संपत सावंत यांनी मानले.

उद्या आजऱ्यात मशीनद्वारे भात रोप लागण मार्गदर्शन मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच मशीनद्वारे भात रोप लागण संदर्भातील मार्गदर्शन मेळावा आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या परोली रोड, येथील राईस मिल जवळ सकाळी ११ -०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली आहे.

यावेळी भात रोप तयार करण्यासाठी पूर्ण तयारी, भात पेरणी यंत्र व लागणीचे यंत्राची माहिती, यंत्र चालू करणे, चालवणे व हाताळण्याचे प्रात्यक्षिक, भातरोपाची यंत्राने पेरणी करण्याचे प्रात्यक्षिक चिखलामध्ये रोप लागण मशीन चालवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

रामतीर्थ येथे १५ एप्रिल पासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुधवार दिनांक १५ एप्रिल ते बुधवार दिनांक २२ एप्रिल अखेर श्री क्षेत्र रामतीर्थ येथे जगद्गुरु तुकोबाराया आणि भजन कीर्तनादी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे व्यासपीठ अधिष्ठान ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज शिप्पूर ता‌ हुपरी जि. बेळगाव भूषविणार आहेत.

या सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी एक ते चार गाथा पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा किर्तन व त्यानंतर भोजन प्रसाद होणार आहे.

या कालावधीत दररोज मान्यवरांचे कीर्तन ही होणार आहे. बुधवार दिनांक २२ रोजी सकाळी आठ ते दहा काल्याचे किर्तन ह.भ. प‌.श्री.अर्जुन जाधव महाराज शिप्पूर हे करणार असून सकाळी दहा वाजता ह.भ.प. डॉ. एस.डी. पन्हाळकर महाराज उत्तुर यांच्याकडून महाप्रसाद होणार आहे असे गाथा पारायण मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

फोटो क्लिक 

हारूर बंधाऱ्यानजीक अज्ञाताने रविवारी रात्रीच्या दरम्यान दुचाकी वर दगड टाकून दुचाकीची मोडतोड केली आहे.

निधन वार्ता
विठोबा पटेकर


चाफे गल्ली, आजरा येथील श्री.विठोबा सुभाना पटेकर ( वय वर्ष ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

चाफे गल्ली आजरा येथील ग्रामस्थ लेझीम पथकाचे उत्कृष्ट हलगी वस्ताद अशी त्यांची ओळख होती.

उद्या मंगळवारी मंगळवारी रक्षा् विसर्जन आहे.

जनाबाई गुरव

गजरगाव  ता.आजरा  येथील बनाबाई गणपती गुरव ( वय ६६ वर्षे) शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार विवाहित मुले, सूना, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लकमेश्वर मंदिराचे पुजारी व सामाजिक कार्यकर्ते श्याम गुरव यांच्या त्या आई होत.

रक्षा विसर्जन उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता आहे.

मडिलगे येथे ओपन प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निळं वादळ, मडिलगे यांच्यावतीने शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता भव्य ओपन प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७००१/-,५००१/-,३००१/-,२००१/- रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

इतर अनेक वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.स्पर्धेत भाग घेऊन इच्छिणाऱ्या संघाने राहुल कांबळे/७३८५३५१२८९, संतोष कांबळे/७०६६९६४२०२, राकेश कांबळे/९८२३८३३९०९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजचे कार्यक्रम

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या आजरा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ६ एप्रिल २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी (दुपारी ०२.१० पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (७ एप्रिल पहाटे ०२.५६ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : सिद्धि योग (दुपारी ०३.२४ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : बलवा करण (दुपारी ०२.१० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.०३ ते सकाळी ०९.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नईला बंगरूळ कडून पराभवाला सामोरे जावे लागले. बंगळूरने तब्बल २५० धावांचा डोंगर गाठताना चेन्नईला २०७ धावांपर्यंत मजल मारता आली. २५ चेंडूत ७० धावा काढणाऱ्या टीम डेव्हिडला सामनावीर घोषित करण्यात आले .

लखनौ व हैदराबाद लढती मध्ये लखनौने हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला. मोहम्मद शमी सामनावीर ठरला

आजचा सामना :-

कोलकता विरुद्ध पंजाब

स्थळ : कोलकता
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोलिसांना सुट्टीतील कामाचा मोबादला म्हणून महिन्याचा पगार द्या!.

mrityunjay mahanews

तरुणीची आत्महत्या

mrityunjay mahanews

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!