रविवार दि.५ एप्रिल २०२६


निर्दोष…
आंबेओहळ प्रकरणात सहा धरणग्रस्तांना न्यायालयाचा दिलासा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंबेओहोळ धरण प्रकल्पाशी संबंधित प्रकरणात गडहिंग्लज येथील सत्र न्यायालयाने सहा धरणग्रस्तांची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. सचिन पावले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांच्यासह शामराव पुंडपळ, गणपती पावले, सुरेश पावले, राजाराम पावले यांच्यावर दाखल असलेले गंभीर आरोप न्यायालयाने फेटाळले. सत्र न्यायाधीश माधव शिंदे यांनी हा निकाल दिला.
डिसेंबर २०२० मध्ये प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. ‘आधी पुनर्वसन, मगच प्रकल्प’या मागणीसाठी धरणग्रस्तांनी प्रकल्पस्थळी जाऊन आंदोलन केले होते. यावेळी तणाव निर्माण झाल्याची नोंद आहे.
घटनेनंतर तत्कालीन जलअभियंता दिनेश खट्टे यांनी धरणग्रस्तांनी रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०७, ३९५, १४९, ३५३, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकार पक्षातर्फे फिर्यादींचा चालक रमेश परीट, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षातर्फे ॲड. संजय पोवार यांनी युक्तिवाद केला.
सर्व पुरावे व साक्षींचा विचार केल्यानंतर आरोप सिद्ध न झाल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सहा धरणग्रस्तांची निर्दोष मुक्तता केली.

अक्षय चौगुले यांना कडगावमध्ये लष्करी इतमामात अखेरचा निरोप

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र व भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अक्षय विलास चौगुले यांचे दिल्ली येथे झालेल्या अपघातात बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी कडगाव येथे शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.दिल्लीहून त्यांचे पार्थिव सकाळी बेळगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या शववाहिकेतून ते कडगाव येथे दाखल झाले. 522 ASC युनिट, मेरठ येथील सुभेदार डी. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लष्करी पथक उपस्थित होते.
गावात पार्थिव पोहोचताच कुटुंबीयांचा आक्रोश आणि ग्रामस्थांची शोकभावना वातावरणात दाटून आली. लष्कराच्या वाहनातून निघालेल्या अंत्ययात्रेत ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत श्रद्धांजली वाहिली. गावातील विविध संस्था व मंडळांनी डिजिटल फलकांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली होती. महिलांनी व मुलींनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढून आपला आदर व्यक्त केला.
महालक्ष्मी पटांगण येथे अंत्यविधी पार पडला. यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. स्टेशन हेडक्वार्टर, कोल्हापूर यांच्या वतीने जवानाला मानवंदना देण्यात आली. अखेर जवानाचे वडिल विलास चौगुले यांनी भडाग्नी देत अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले.
या वेळी सरपंच अर्चना पाटील, आमदार बंटी पाटील मंत्री हसन मुश्रीफ, सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, जि. प. सदस्य अनिरुद्ध रेडेकर, संग्राम कुपेकर, शैलजा पाटील, प्रकाश पताडे, तहसिलदार ऋषिकेत शेळके, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सारिका बटकडली, ॲड. दिग्विजय कुराडे, संजय बटकडली, नेताजी पाटील, आनंदा पाटील, कुमार पाटील, विठ्ठल पाटील तसेच विविध आजी-माजी सैनिक संघटना, शाळांचे मुख्याध्यापक विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांनी वाहिली श्रद्धांजली…
याप्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ऐन तरुण वयात देशसेवा बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. अशा वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

हत्ती कोवाडे पैकी दाभेवाडीत…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे पैकी दाभेवाडी (ता. आजरा) येथे टस्कराने मोर्चा वळवला आहे. सिरसंगी परिसरात वावरत असलेला दाभेवाडी परिसरात गेला आहे. शेतकरी व ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण आहे.
सिरसंगी (ता. आजरा) परिसरात टस्कर गेले वर्षभर तळ ठोकून आहे. त्याच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले . त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पण गेले दोन दिवसापासून टस्कर दाभेवाडी, निंगुडगे शिवारात गेला आहे. दाभेवाडी येथे संजय देसाई यांच्या ऊसातून तो निंगुडगेकडे गेला. दरम्यान त्यांने संभाजी जगदाळे यांच्या काजूंच्या झाडांचे नुकसान केले आहे. निंगुडगे येथील परिसरातील मका व ऊस पिकाचेही त्यांने नुकसान केले आहे.

भाग्यलक्ष्मी महीला संस्थेवर भावेश्वरी सशक्त आघाडीचे वर्चस्व

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे (ता. आजरा) येथील भाग्यलक्ष्मी महीला सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी भावेश्वरी सशक्त महीला विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. या संस्थेमधील दहा जागासाठी निवडणुक लागली. या दहा जागावर विरोधी आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. सत्ताधारी भावेश्वरी महीला विकास आघाडीला एकही जाग मिळवता आली नाही.
निकाल घोषीत झाल्यानंतर भावेश्वरी सशक्त महीला आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाकड्यांची आतषबाजी केली.
येथील भाग्यलक्षी महीला द्धसंस्थेची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. भाजप प्रणीत भावेश्वरी सशक्त महीला विकास आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ताधारी आघाडी मैदानात होती.
सत्ताधाऱ्यांना एकही जागा मिळवता आली नाही. यामध्ये रेश्मा चाळू कागिनकर, सुरेखा संजय कागिनकर, बेबीताई शिवाजी चिमणे, सुरेखा सुरेश तर्डेकर, सोनाबाई दशरथ तर्डेकर, बंदना उत्तम पारदे, भारती शंकर बुगडे, सोनाबाई महादेव बुगडे, शारदा शिवानंद ग्रव, मंगल इंद्रजीत जाधव यांनी विजय मिळवला.
पंचायत समितीचे सदस्य समीर पारदे यांनी भावेश्वरी सशक्त महीला विकास आघाडीचे नेतृत्व केले.

उत्तूर बसस्थानकात एनसीएमसी कार्ड नोंदणीस सुरुवात; सवलतीच्या प्रवासात डिजिटल प्रणाली लागू

उत्तूर : मंदार हळवणकर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि एबीक्स कॅश प्रा. लि. यांच्या करारानुसार सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी सेवेला उत्तूर बसस्थानकात सुरुवात झाली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना सवलतीच्या प्रवासासाठी अधिक पारदर्शक व विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार आहे.एस.टी. महामंडळाने सवलतीच्या प्रवासाच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल करत डिजिटल पडताळणी प्रणाली स्वीकारली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या प्रवर्गांना मिळणाऱ्या सवलती आता केवळ एनसीएमसी कार्डद्वारेच मिळणार असून, आधार कार्डवरील अवलंबित्व कमी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सवलतींचा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे.
पूर्वी आधार कार्डवरील चुकीच्या जन्मतारखा किंवा अपूर्ण माहितीतून अपात्र व्यक्तींनाही सवलती मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महामंडळावर आर्थिक ताण वाढत होता. या पार्श्वभूमीवर एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात आली असून, यामध्ये प्रवाशांची अचूक डिजिटल ओळख सुनिश्चित केली जाणार आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एका महिन्यात कार्ड उपलब्ध होणार आहे. हे कार्ड बहुपयोगी असून, प्रवासासाठी डिजिटल पेमेंट म्हणूनही वापरता येणार आहे. प्रवासी दरमहा ५० किंवा १०० रुपयांच्या पटीत रक्कम भरून (टॉपअप करून) रोख व्यवहाराशिवाय तिकीट खरेदी करू शकतात.
झालेल्या कार्यक्रमाला आगार प्रमुख प्रवीण पाटील, वाहतूक नियंत्रक मल्लीकार्जुन शेट्टी, आर. पी. चव्हाण, एस. एम. पाटील, अनिल पाटील, विक्रम खोत तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तूर बसस्थानकात ही सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि सवलतींचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असे मत आजरा एस.टी. आगार प्रमुख प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले.

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूल, आजरा येथील विद्यार्थ्यांनी जानेवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रेन डेव्हलपमेंट एक्झाम (BDS)’ या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत सातवी मधील सक्षम जयसिंग खवरे आणि श्रीराम राजेंद्र पटेकर या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच सहावी मधील राधिका संजय नार्वेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत गुणपत्रक व प्रमाणपत्रासोबतच ब्रांझ मेडल मिळवले आहे.
मुख्याध्यापक श्री. ए.एल. तोडकर , उपमुख्याध्यापक सौ . एच.एस.कामत तसेच पर्यवेक्षक श्री. ए. आर.व्हसकोटी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

फोटो क्लिक

आजरा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असे गृहीत धरून शहरात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत परंतु नवीन नळ पाणीपुरवठा योजनेच्या गळत्या पुन्हा आठच दिवसात नवीन रस्ते खुदाईस कारणीभूत ठरू लागल्या आहेत.

आजचे पंचांग
दिनांक : ५ एप्रिल २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया (सकाळी ११.५९ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (६ एप्रिल रात्री १२.०७ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : वज्र योग (दुपारी ०२.४३ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.५९ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : तुळ राशी (सायंकाळी ०५.२७ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.१९ ते सायंकाळी ०६.५२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

मुंबई चारी मुंड्या चित
दिल्लीची सहा गड्यांनी मात
आयपीएल २०२६ च्या स त्रातील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात सहा बाद १६२ धावा करणाऱ्या मुंबईला सहा गडी राखून दिल्लीने नमवले. समीर रिजवी याने ९० धावा काढत सामनावीर पुरस्कार पटकावला.
अटीतटीच्या सामन्यात गुजरातवर राजस्थानचा विजय…
अहमदाबाद येथे पार पडलेल्या व शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या गुजरात विरुद्ध राजस्थान लढतीत राजस्थानने गुजरातचा सहा धावांनी पराभव केला.
आजचे सामने
हैदराबाद विरुद्ध लखनौ
स्थळ : हैदराबाद
वेळ : दुपारी ३.३० पासून
बंगळूर विरुद्ध चेन्नई
स्थळ : बंगळूर
वेळ : सायंकाळी ७.३० पासून



