शुक्रवार दि. १३ मार्च २०२६

बापरे…
जत्रा यात्रासह सण समारंभ करायचे तरी कसे…?
गॅस टंचाईमुळे अनेक अडचणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या जत्रा-यात्रा, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम यावर आता गॅस टंचाईचे सावट जाणवू लागले असून यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील गॅस बुकिंग चा कालावधी ४५ दिवसांचा करण्यात आला आहे मोठ्या कुटुंबांना गॅस वापरताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उज्वला योजनेसारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातही अपवादात्मक काही कुटुंबे सोडल्यास सर्वत्र गॅसचा वापर होत आहे. वन खात्याने वृक्षतोडीवर आणलेल्या मर्यादा, चुलीचा वापर करताना लाकडे व रॉकेलचा प्रश्न प्रश्न कायम आहे.
अनेक गावांमध्ये यापूर्वीच उन्हाळी सुट्टीमुळे यात्रा व विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरांमध्ये परिस्थिती गंभीर होत चालल्याने मुंबई,पुणे येथून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी परतणार आहे. अशा परिस्थितीमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने मोठ्या जेवणावळींवर निश्चितच मर्यादा येणार असे दिसत आहे.

वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे श्री.सुधीर देसाई, सदस्य, जि.प. कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सौ.यशोदा पोवार उपसभापती, पंचायत समिती आजरा, श्री.समीर पारधे,सदस्य, पं.स. आजरा, श्री. अल्बर्ट डिसोजा माजी सभापती, डॉ.श्री.आर. जी. गुरव,तालुका आरोग्य अधिकारी तसेच डॉ.शेख, वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्री.आर. जी.गुरव यांनी मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने HPV लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींना वेळेत लस देण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या या उपक्रमामुळे मुलींच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. महेश कोळेकर यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावधान…
रस्ता काँक्रीटच्या सळ्या ठरत आहेत धोकादायक

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास उत्तूर परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काँक्रीटचे काम सुरू असताना एका बाजूनेच वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काँक्रीट रस्त्याच्या कडेला लोखंडी सळ्या बाहेर काढून ठेवण्यात आलेल्या असल्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना या ठिकाणी अतिशय सावधपणे वाहन चालवावे लागत असून विशेषत रात्रीच्या वेळी किंवा वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी या बाहेर आलेल्या सळ्यांचा अंदाज येत नसल्याने दोन वाहने एकमेकांसमोर आल्यास अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे..मात्र सध्या या ठिकाणी कोणतेही स्पष्ट सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षिततेची उपाययोजना दिसून येत नाही. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या सुरक्षित कराव्यात व वाहनचालकांसाठी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.

धुरळ्यापासून वाचवा…
शहरातील व्यापारी रस्त्यासाठी आक्रमक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील संभाजी चौक ते सोमवार पेठ पर्यंतच्या रस्त्याची नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन, गटर्स व विविध प्रकारच्या केबल टाकण्यासाठी केलेली खुदाई व्यापारी वर्गाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. सध्या धुरळ्यामुळे दुकानांमधील वस्तू, कपडे व इतर व्यावसायिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पावसापूर्वी सदर रस्ता न झाल्यास चिखलाच्या समस्येलाही सामोरे जावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर तातडीने सदर रस्ता करण्यात यावा अशी मागणी व्यापारी असोसिएशन,आजरा यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर, वाय.जी इंजल, अभिजीत रांगणेकर, राजेंद्र विभुते, अनिल पाटील यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
इंधन पुरवठा सुरळीत करा…
हॉटेल असोसिएशनची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इराण इसराइल व अमेरिका दरम्यानचे युद्ध चालू आहे त्यामुळे सध्या गॅस पुरवठ्यामध्ये देते येत असल्याने आजरा तालुक्यातील चहा टपरी हॉटेल चालकाम समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. गॅस टंचाईमुळे व्यवसाय थांबल्यास अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे शहरांमध्ये हॉटेल व्यवसायिकांना गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आजरा तालुका हॉटेल असोसिएशन ने तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना जयसिंग खोराटे, निलेश घाटगे, शिवाजी गुडुळकर, अभिषेक हुक्केरी, राजू विभुते यांच्यासह हॉटेल व्यवसायीक उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यान संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘ महिला विषयक कायदे ‘ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲड. सौ. प्रतिमा सरदेसाई – महागांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांसाठी सध्या अस्तित्वात असणारे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, सायबर कायदा, मोटार वाहन कायदा व पोस्को कायदा या सर्व कायद्याची सविस्तर माहीती दिली. हे सर्व कायदे महिलांच्या संरक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले आहेत पण त्याचा तेवढाच गैर वापर वाढला आहे. तुम्हीही कायद्याचा गैर वापर करू नका असा सल्ला विद्यार्थी – विद्यार्थीनींना दिला. तात्काळ मदतीसाठी काही नंबर ही त्यांनी सर्वांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.ए.एन. सादळे म्हणाले रूढी आणी परंपरामुळे महिलांवरती अनेक निर्बंध लादण्यात आली पण आता कायद्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. या वेळी उपस्थित उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ. वैशाली देसाई व आभार प्रा. व्ही. एम. देसाई यांनी मानले. या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. लता शेटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.

अभिनंदनीय…

ग्राम महसूल अधिकारी या पदावर श्रीधर आनंदा शेटगे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १३ मार्च २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (१४ मार्च पहाटे ०३.०२ पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : व्यातीपात योग (सकाळी १०.३१ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : वाणीजा करण (रात्री ०७.२३ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : कुंभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.१८ ते दुपारी १२.४८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२४ ते दुपारी ०१.१२
सूर्योदय : सकाळी ०६.५०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४६
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत

फोटो क्लिक…

विद्यामंदिराच्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य...

आजरा महागाव रस्ता खुदाईमुळे वाहन चालक त्रस्त… त्यातच भर दुपारी गव्यांचे रस्ता रोको.


