mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि. ९ मार्च २०२६

उत्तुरसह ठीक ठिकाणी रंगपंचमी उत्साहात

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये रंगपंचमी उत्साहात व जल्लोष साजरी करण्यात आली.

युवक, लहान मुले महिला, युवती तसेच जेष्ठ मंडळींनीही उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली.
यंदा पाण्याचा अपव्यय टाळत अनेक ठिकाणी ड्राय कलरचा वापर करत पर्यावरण पूरक सण साजरा करण्यात आला. गावातील विविध भागात तरुणांनी एकत्र येत सणाचा आनंद लुटला. काही ठिकाणी तरुणांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत  जल्लोष केला.

जुन्या एस.टी. स्टँड परिसर, नेहरू चौक, बाजारपेठ, मेन रोड आदी ठिकाणी तरुणांनी रंगपंचमीचे आयोजन केले होते. आदर्श ग्रुप व हिंदवी स्वराज ग्रुपसह अनेक युवकांनी या सणात सक्रिय सहभाग घेतला. पेरणोली व इतर ग्रामीण भागातील उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.

पेरणोली

दरम्यान रंगपंचमी कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता.

नागरी वस्तीत गवा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शहरामध्ये यापूर्वी मंजिरी परिसरात आठवडा बाजारादिवशी हत्तीने प्रवेश करून स्थानिक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली होती. विद्यानगर भागात रान डुकरांनी दर्शन दिले होते. काल रविवारी रात्री मात्र दावल मलिक, डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल परिसरात गव्याने दर्शन दिल्याने स्थानिक नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दुपारी या वस्तीनजीक असणाऱ्या परिसरात आग लागल्यानंतर बिथरलेल्या अवस्थेतील गव्याचे दर्शन आग विझवणाऱ्या मंडळींना झाले होते. हाच गवा शेत जमिनीतून वस्तीत आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लेंड ओहोळ ओढ्यातून तो थेट आंबोली रस्त्याच्या दिशेने निघून गेला. यादरम्यान कोणालाही कोणतीही इजा झाली नसली तरी नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

आजऱ्यात महिला दिन उत्साहात
नगरपंचायतीकडून विविध स्पर्धांचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये पोस्टर मेकिंग व महिला वेशभूषा स्पर्धांचा समावेश होता. नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी दिप प्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन केले.

पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी गटामध्ये कुमारी प्रांजल बाळकृष्ण मडव, कुमारी परिणीता शंकर शिंदे, कुमारी इनाया इमरान अत्तरवाले यांनी अनुक्रमे प्रथम तीन तर कुमारी शुभ्रा गौतम कांबळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. आठवी ते दहावीच्या गटामध्ये कुमारी खतिजा इरफान खान, कुमारी श्वेता महादेव सुतार, कुमारी दीपा रामचंद्र गावडे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले तर कुमारी श्रेया महादेव भादवणकर हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

वेशभूषा स्पर्धेमध्ये सौ. कृष्णा देवेंद्र पाचवडेकर, सौ. वृषाली विक्रांत वाळके, व सौ डिसोजा यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले तर शिवानी प्रथमेश काणेकर यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. सर्व विजेत्या स्पर्धकांना उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे, नगरसेविका निशात चांद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सौ. मुग्धा चराटी, समीर चांद, छाया चराटी यांच्यासह सर्व नगरसेविकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी आभार मानले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात महिला दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पं. दीनदयाळ विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती श्रीमती. शुभांगी निर्मळे यांनी सांगितली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगरसेविका डॉ .सौ स्मिता सुधीर कुंभार यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. सौ. शालन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो, महिलांची पूर्वीची स्थिती व आज महिलांनी गाठलेले प्रगतीचे शिखर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या समाज सुधारकांनी महिलांसाठी केलेले कार्य, महिला आरक्षण, महिला सबलीकरण यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांची वेशभूषा करून आपल्या हक्कांची व आपल्या संधीची आपल्या कर्तृत्वाची ओळख करून दिली.

डॉ.स्मिता कुंभार यांनी २३ फेब्रुवारी १९१७ रशिया देशात शांतता आणि भाकरी यासाठी महिलांनी केलेल्या चळवळीचा उल्लेख केला. झाशीची राणी ,महाराणी येसूबाई ,ताराराणी या महान स्त्रियांनी आपल्याला लढवय्या कसं व्हायचं हे शिकवलं. आपण मुली व स्त्रियांनी आपल्या स्वसंरक्षचे धडे घेतले पाहिजेत. आपल्याला आपली शरीरयष्टी कमवायची असेल तर योगाद्वारे मानसिक व शारीरिक ताकद यावर आपण भर दिला पाहिजे असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे स्वागत सुनीता कुंभार , सूत्रसंचालन विद्या कुंभार व संयोगिता वाळके तसेच आभार तेजश्री बुरुड यांनी मानले.

रवळनाथ कॉलनीत होळी महोत्सवाची उत्साहात सांगता… रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रवळनाथ कॉलनी,आजरा येथे दिनांक ३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या होळी महोत्सवाची सांगता ७ मार्च रोजी भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेने मोठ्या उत्साहात झाली.

महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवात फनी गेम, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची तसेच लहान मुलांची रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली. तसेच पाककला व होम मिनिस्टर स्पर्धांनाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

पाककला स्पर्धेतील विजेते :
१) सौ. माही टोपले –
२) सौ. सुरेखा बचुटे –
३) सौ. मनिषा बुधवंत

होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेते :
१) सौ. गीता पंडीत
२) सौ. सुधा उपासे
३) सौ. सुपर्णा सलामवाडे
या सर्व स्पर्धकांना नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक ( विभागून) – कु. परिणिती केकतपुरे, कु. अनुष्का भंडारी

द्वितीय क्रमांक (विभागून) – के. संतोष, विजय अलासे, नटराज ग्रुप, आशिष पाटील

तृतीय क्रमांक (विभागून) – शुभ्रा ढवळ, सुरज साळगांवकर, दिपक कानडे

चतुर्थ क्रमांक ( विभागून) – कु. शरण्या कुंभार व कु. सिध्दी नाईक, कु. सुहानी ठाकर

रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्यांना श्री. पांडुरंग सावरतकर यांच्या कडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

नगरसेवक श्री. परशुराम बामणे व रवळनाथ कॉलनीचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी या उपक्रमांसाठी संयोजकांना प्रोत्साहन दिले.

निधन वार्ता

बाळकृष्ण धनगर

उत्तुर ता. आजरा येथील बाळकृष्ण रामचंद्र धनगर (वय ७० वर्षे) यांचे रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महेश धनगर यांचे ते वडील होत.

सूर्यकांत पाटील

पारपोली गावठाण, ता. आजरा येथील सूर्यकांत महादेव पाटील (वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नारायण गुरव


मसोली ता. आजरा येथील नारायण गुरव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.

येथील गुरव किराणा मर्चंटचे मालक मनोहर गुरव यांचे ते वडील होत.

आगीचे सत्र सुरूच…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील पारेवाडी हद्दीतील सुमारे पन्नास एकराचा परिसर जळून खाक झाला. आगीच्या ज्वाळांनी परिसर व्यापला होता. साळगाव रस्त्यापर्यंत आग पसरत आली होती. आग पुढे सरकण्यास जागा नसल्याने येथे आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण समजलेले नाही.

आजरा तालुक्यात आगीचे सत्र सुरुच आहे. पारेवाडी परीसरातून आग पुढे सरकत आजऱ्याकडील साळगाव रस्त्याकडे आली. उन्हाचा तडाखा व वाळलेले गवत यामुळे आग पसरत गेली.आग वेगाने पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.

चार दिवसांपूर्वी याच परिसरात लागलेल्य आगीत वनौषधी पार्कचा परिसर जळून गेला होता. या वेळीही काजूची बाग, अन्य झाडांना आगीचा फटका बसला आहे.

गव्याने काढला पळ

पोवार इंडस्ट्रीजवळ असलेल्या दाट झुडपात एक गवा लपून बसला होता. आग पसरत झुडपाजवळ आल्यावर गव्याने जीव वाचवण्यासाठी झुडपातून पळ काढला. तो साळगाव रस्त्यावर आला व पळत तो रामतीर्थ जंगल परिसरात गेल्याचे उदय चव्हाण यांनी सांगीतले.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोधमध्ये पार्वती- शंकर विद्यालयाचे यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व जिल्हा विज्ञान समिती यांचेद्वारा आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत पार्वती- शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयाचे ७ विद्यार्थी यंदा प्रज्ञापात्र ठरले.विद्यामंदिरमधील इ.६‌ वी मधून ९ विद्यार्थी प्रावीण्यपात्र ठरले होते. श्रेयश प्रमोद पाटील ,अथर्व संतोष कुंभार राहत इम्रान तासेवाले यांनी यश संपादन केले. इयत्ता ९ वी मधून २३ विद्यार्थी प्रावीण्यपात्र ठरले होते यामध्ये श्रावणी विकास पाटील ,राजनंदिनी भरत सुतार , अंतरा सुनील पाटील , घेऊन शिल्डपात्र ठरले ,शौर्या समीर पाटील यांनी यश संपादन केले.

या विद्यार्थ्यांना पंडित वंजारे , भारती शिवणे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

जोमकाईदेवी यात्रेनंतर उत्तूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

होळी पौर्णिमेनिमित्त जोमकाईदेवी मंदिरात पार पडलेल्या यात्रेनंतर परिसरात साचलेल्या कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी उत्तूर विद्यालय, उत्तूर येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. हा उपक्रम विद्यालय २८ वर्षांपासून सतत राबवत आहे. प्राचार्य आर श.डी.महापूरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची मोहिम यशस्वीपणे राबवली.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने परिसरातील प्लास्टिक पिशव्या, कागद, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर कचरा गोळा करून मंदिर परिसर स्वच्छ केला.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे जोमकाईदेवी मंदिर परिसर स्वच्छ झाला. यावेळी शिक्षक , पालक विद्यार्थी उपस्थित होते .


“सारथी” संस्था व “आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास” महामंडळ या दोन्ही संस्थेला आधिक निधी द्या.
मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राजर्षी शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास (सारथी) संस्थेच्या वतीने मराठा समाजातीला सुरू ९० टक्के शैक्षणिक योजना बंद पाडल्या असून सारथीच्या शैक्षणिक कामकाजाचा बोजवारा उडालेला असून गेल्या ८ महिन्यात एक दमडीचा निधी सारथी संस्थेला न दिल्याने काम ठप्प झाले आहे. राजर्षी शाहूंच्या नावाने सुरु असलेल्या सारथी संस्थेचे संचालक मंडळाची नेमकी काय भूमिका आहे. मराठा समाजातील गरीब विदयाथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे विविध योजनांसाठी तातडीने निधी द्यावा अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती महत्वाच्या २०० उच्च शिक्षण संस्थामध्ये ३०० विदयाथ्यांसाठी सुरु केलेली होती. परंतु हि शिष्यवृत्ती योजना पध्दतशीरपणे बंद पाडण्याचे षडयंत्र सुरु आहे तरी शिष्यवृत्ती योजना विशेष म्हणजे या वर्षासाठी ४ कोटी ५७ लाखाची तरतूद असताना जाहिरात प्रसिदध का होत नाही? यांचे गौडबंगाल नेमके काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण ९ ची ते १० वी विद्यार्थ्यांना ४ वर्षासाठी शिष्यवृ‌त्ती सुरु होती परंतु लाखो विदयाथ्यांची शिष्यवृत्ती मध्येच बंद करण्याचे पाप संस्थेने केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास योजना संपूर्ण राज्यात पूर्णपणे ठप्प आहे.पि.एच.डी.ची फेलो शिपही वेळेवर मिळत नाही, या मध्ये त्रुटी दाखवून अनेकांची शिष्यवृत्ती यांववली जात आहे.

सारथी संस्थेला ५०० कोटी व आण्णासाहेब महामंडळाला ७०० कोटींची तातडीने तरतूद करुन दोन्ही संस्थेचे कामकाज तातडीने सुरळीत करावे अन्यथा उग्र आंदोलन करणे भाग पडेल असा इशाराही मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबतचे लेखी निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार शिवाजीराव पाटील यांना देण्यात आले आहे. मराठा महासंघाचे आजरा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

आजचे पंचांग

♦ दिनांक : ९ मार्च २०२६
♦ वार : सोमवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : षष्ठी तिथी (रात्री ११.२७ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
♦ नक्षत्र : विशाखा नक्षत्र (दुपारी ०४.११ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
♦ योग : व्याघात योग (सकाळी ०७.३५ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
♦ करण : गराजा करण (सकाळी १०.१६ पर्यंत) वाणीजा करण
♦ चंद्र राशी : तूळ राशी (सकाळी ०९.२९ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.२२ते सकाळी ०९.५१ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२५ ते दुपारी ०१.१३
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५३
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४५
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

mrityunjay mahanews

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!