mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दि.३ मार्च २०२६

श्री. जोमकाई देवीची यात्रा उत्साहात…
भाविकांची अलोट गर्दी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर येथील श्री जोमकाई देवीची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

यात्रेनिमित्त मुंबईसह विविध ठिकाणांहून माघारणी, पाहुणेमंडळी व मित्रमंडळी मोठ्या संख्येने श्री. जोमकाईदेवीचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.

रविवारी रात्री साडेआठ वाजता श्री. उत्तूर गावचे सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते अभिषेक करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

डोंगर परिसरात विविध प्रकारचे खेळणी, खाण्याचे पदार्थ तसेच अन्य आकर्षक स्टॉल लागले होते. लहान मुलांसाठी खेळणी व खाद्यपदार्थांचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले. पाळणे व विविध मनोरंजनाची साधनेही उपलब्ध होती.

आजऱ्यातील “कमलकुंज” पूर्णत्व दाखला प्रकरणी अन्याय निवारण समिती आक्रमक…
सदनिका धारकांचा उपोषणाचा इशारा…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत हद्दीतील आजरा–साळगाव मार्गावरील कमलकुंज आवारातील वाढीव ‘ए’ व ‘बी’ विंग इमारतीस देण्यात आलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून हे प्रकरण चांगलीच तापले आहे . इमारतीस आवश्यक नागरी व सुरक्षिततेच्या सुविधा पूर्ण झाल्या नसताना हा पूर्णत्वाचा दाखला कशाच्या आधारे देण्यात आला, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व कमलकुंज इमारतीतील सदनिका धारकांनी केली आहे.

अन्याय निवारण समिती व रहिवाशांनी आजरा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संबंधित इमारतीतील सदनिकांची खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण झाले असले तरी त्यानंतर विकासकाने त्याच ठिकाणी वाढीव विंगचे बांधकाम केले आहे. मात्र या वाढीव बांधकामात अनेक आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे खालील बाबींची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

इमारतीस नियमित व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे का?
सांडपाणी निचरा (ड्रेनेज) व रेनवॉटर हार्वेस्टिंगची योग्य व्यवस्था आहे का?
लिफ्ट बसविण्यात आली असल्यास ती बंद पडल्यास बॅटरी बॅकअप किंवा पर्यायी व्यवस्था आहे का? कमर्शियल व निवासी भागासाठी आवश्यक त्या प्रमाणात कॉमन टॉयलेट व बाथरूमची सुविधा आहे का? इमारतीभोवती अग्निशमन वाहन फिरू शकेल इतकी जागा व रस्ता उपलब्ध आहे का? फायर फायटिंग सिस्टम व स्वतंत्र पाण्याची पाइपलाईन बसविण्यात आली आहे का? सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था तसेच सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करण्याबाबत कार्यवाही झाली आहे का?
वरील सर्व सुविधा पूर्ण नसताना इमारतीस पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला असल्यास तो चुकीच्या माहितीच्या आधारे मिळविण्यात आला असण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.

त्यामुळे कमलकुंज येथील वाढीव ‘बी विंग’ इमारतीस देण्यात आलेला पूर्णत्वाचा दाखला तात्काळ रद्द करून संबंधित विकासकास सर्व नियमबद्ध व आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी व याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण नागरिकांना लेखी स्वरूपात द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात दहा दिवसांच्या आत कार्यवाही करून लेखी अहवाल अन्याय निवारण समिती व सदनिका धारकांना सादर करावा, अन्यथा सर्व सदनिका धारक कुटुंबीयांसह नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अन्याय निवारण समितीचे सदस्य व कमलकुंज सदनिका धारकांच्या सह्या आहेत.

वापरण्यापूर्वी सदनिका विकण्यास सुरुवात…

शहरात ठीकठिकाणी अपार्टमेंटसचे बांधकाम सुरू असून घाई गडबडीने सदनिका/ खरेदी केलेल्या मंडळींची ना पाणी, ना वीज, ना ताबा अशी विचित्र अवस्था झाली आहे . विकसकांनी खरेदीपूर्वी दाखवलेले सुंदर सदनिकेचे स्वप्न प्रत्यक्षात स्वप्नच ठरत असल्यानेअनेकांनी सदनीका /फ्लॅट्स वापरापूर्वीच विक्रीस काढण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यात दणक्यात शिमगा..‌
धुळवडीनिमित्त आज विविध कार्यक्रम


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यामध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून काल सोमवारी घरगुती व सार्वजनिक होळ्यांचे विधीवर पूजन करून त्या पेटवण्यात आल्या. ठीक ठिकाणी होळीला पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

आज धुळवडीनिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सौ.हौसाबाई राजाराम यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सन्मित्र पतसंस्था, वाटंगी शाखा आजराचे शाखाधिकारी श्री. विलास पांडुरंग राजाराम यांच्या आई हौसाबाई पांडुरंग राजाराम ( वय -७३ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे. 

महामार्ग बाधित शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचितच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५८ चे काम पूर्ण होऊनही रुंदीकरणासाठी आजरा तालुक्यातील सुलगाव,गवसे,हाळोळी, घाटकरवाडी, मसोली,वेळवट्टी, पेठेवाडी, खेडे, मुंगुसवाडी, मालवण,मडीलगे, खोराटवाडी, आजरा या १३ गावातील जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु संपादन क्षेत्राप्रमाणे अनेकांना प्रत्यक्ष मोबदला मिळालेला नाही. याबाबत आता शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत.

यापूर्वी २७ जानेवारी २०२५ च्या पत्राने उपविभागीय अधिकारी यांनी दोन टप्प्यात अंतर्गत घोषित झालेल्या निवाड्यांच्या पार्श्वभूमीवर कांही गटामध्ये एकापेक्षा अधिक हितसंबंधित आहेत. सदर गट सामाईक असल्याने हित संबंधितांमध्ये एकमताने संमती होण्यास अडचणी उद्भवत असल्याने प्रत्यक्ष वहिवाटीनुसार संपादन क्षेत्राप्रमाणे मोबदला मिळण्याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेले होते.

अद्यापही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. सदर निवडतील हितसंबंधितांना भूमी राशी प्रणालीद्वारे मोबदला वितरीत करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. मात्र प्रस्ताव संदर्भात कांही गटामध्ये एकमताने संमती होण्यास अडचणी उद्भवत असल्याने प्रत्यक्ष वहीवाटीनुसार संपादन क्षेत्राप्रमाणे मोबदला मिळण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

 छायावृत्त


पंडित दीनदयाळ विद्यालयाचे शिक्षक भरत परसू बुरुड यांना ‘कोजिमा प्रेरणा’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

आजचे पंचांग

♦ दिनांक : ३ मार्च २०२६
♦ वार : मंगळवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : पौर्णिमा तिथी (सायंकाळी ०५.०७ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
♦ नक्षत्र : मघा नक्षत्र (सकाळी ०७.३१ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
♦ योग : सुकर्मा योग (सकाळी १०.२४ पर्यंत) त्यानंतर धृति योग
♦ करण : भाव करण (सायंकाळी ०५.०७ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
♦ चंद्र राशी : सिंह राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.१५ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२७ ते दुपारी १.१४
♦ सूर्योदय : सकाळी ६.५८
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४३
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

साळगाव येथे गव्याच्या धडकेत तरुण जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अजातशत्रू ‘ दादा ‘

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!