mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.१ मार्च २०२६

चोरीचे मोबाईल पुन्हा वापरात…
पोलिसांना परत मिळवण्यात यश

CEIR तंत्रज्ञानाची कमाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या आजरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या वेगवेगळ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने गेले काही दिवस विशेष लक्ष देऊन CEIR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नंबर बदलून वापरात असणारे १० मोबाईल वापरकर्त्यांकडून ताब्यात घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत. तक्रारी दाखल झाल्यानंतर CEIR पोर्टलवर माहिती भरून गहाळ मोबाईल संदर्भात धागेदोरे सापडतात का याचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये पोलिसांना यश आले. अनेक मोबाईल मधील सिम कार्ड बदलून ते अन्य नंबरद्वारे पुन्हा वापरात असल्याचे निदर्शनास आले. या वापरातील नंबरच्या सहाय्याने मोबाईल वापरणा-यांचा शोध घेण्यात आला व त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले व ते मूळ मालकांना परत देण्यात आले.

मोबाईलचे तपास लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस अंमलदार ओंकार पाटील आदींनी विशेष प्रयत्न केले.

तालुक्यात विकास कामे आणण्यास बांधील : सुधीर देसाई


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांनी मोठ्या विश्वासाने आपणाला निवडून दिले आहे. तो विश्वास सार्थ ठरवून जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून मतदार संघात विकास कामे आणण्यास आपण बांधिल आहोत असे प्रतिपादन नूतन जि.प. सदस्य सुधीर देसाई यांनी केले. उचंगी येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख व माजी पंचायत समिती सभापती अल्बर्ट डिसोजा होते.

उपस्थितांचे स्वागत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक विठ्ठलराव देसाई यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते जि.प.सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य सौ. जयश्री गाडे, सौ. यशोदा पोवार, विकास चोथे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी देसाई यांनी आपण शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले.

जि.प.सदस्य शिरीष देसाई म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्यासारख्या नेता दोन्ही जि.प. मतदारसंघात पाठीशी असल्याने जास्तीत जास्त निधी मिळवून विकास कामे पूर्णत्वास नेण्याचा आपला प्रयत्न राहील. एक मतदारसंघ कमी झाला असला तरीही विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात आपण मागे राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणात अल्बर्ट डिसोजा यांनी सुधीर देसाई व मंत्री मुश्रीफ यांचे निकटचे संबंध असल्याने याचा फायदा निश्चितच मतदारसंघाला होईल. देसाई यांच्यासारखा तरुण व धडाडीचा कार्यकर्ता सदस्यपदी विराजमान झाल्याने या भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे  स्पष्ट केले.

यावेळी राजू होलम, युवराज पोवार यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रम प्रसंगी आजरा साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई, तालुका संघाचे उपाध्यक्ष डी.ए.पाटील, धनाजी शिंदे, गणपतराव देसाई, अशोक कळेकर, दिलीप देसाई, विलास देसाई, संदीप कळेकर, संजय कांबळे, संभाजी देसाई, रमेश देसाई, अनिल निंबाळकर, रघुनाथ देसाई, राजेश देसाई, सौ. संगीता कांबळे, सौ.जयश्री कळेकर, संजय कांबळे, उत्तम देसाई, बाबुराव गिलबिले, विजय देसाई, जयसिंग नित्तवडेकर, जयसिंगराव देसाई, संजय गाडे, मनोहर देसाई यांच्यासह उचंगी, शृंगारवाडी, हुडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

पुन्हा शॉर्ट सर्किट…
काजू बागा भक्षस्थानी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शेतातून गेलेल्या विजेच्या पोल वरील वायर शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत आल्याची वाडी व गवसे येथील सुळे टेक आणि कोलेरांगी टेक नावाच्या शेतामधील काजूच्याबागा,गवत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये श्रीपती पेडणेकर, गणपती पेडणेकर, लक्ष्मण सोले, नंदकुमार पाटील, गणपती पाटील, रेमेत फर्नांडिस, बाळासाहेब माडभगत,अंकुश पेडणेकर, महादेव पेडणेकर, बाळु फराकटे, शंकर माडभगत, महादेव परीट इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आग विझविण्यासाठी गणेश इलगे, रुपेश माडभगत, लक्ष्मण सोले, श्रीपती पेडणेकर, बाळू माडभगत, संजय माडभगत, संभाजी नवार, लक्ष्मी इलगे, नामदेव माडभगत, शामराव माडभगत इत्यादी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले.


आजरा महाविद्यालयात बांबू प्रशिक्षण कार्यशाळा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर, अग्रणी महाविद्यालय योजना, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी क्लस्टर अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा झाली. आजरा महाविद्यालय वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्र व आजरा बांबू क्लस्टरच्यावतीने याचे आयोजन केले होते.

बांबू प्रशिक्षणात १२० जणांनी सहभाग घेतला. यामध्ये गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील आठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी विद्यार्थी व २२ महीला बचत गटांचे सदस्य सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते. कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील, महीला बचत गटाच्या समन्वयक उषा पाटील, आजरा बांबू क्लस्टरचे रणजित कालेकर, कृष्णा वरेकर, शिवाजी येसणे, बांबू तज्ञ सतीश कांबळे, मनीषा कांबळे, बांबू इंजिनिअर प्राची कांबळे प्रमुख उपस्थित होते.प्रा. राजीव कर्पे यांनी स्वागत तर प्रा. मल्हारराव ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले.

प्राचार्य डॉ . सादळे म्हणाले, बांबूला पर्यावरणीय महत्व आहे. पण त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टीकोनातून याचा वापर समाजात वाढला पाहीजेत. आजरा महाविद्यालयाच्यवतीने महीलांना हस्तकलेच्या प्रशिक्षणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शिवाजी येसणे म्हणाले, हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठी व्यावसायिक बांबू लागवड करणे गरजेच आहे. रणजित कालेकर यांनी बांबूची शेती व बाजारपेठ याची माहीती दिली. बांबू तज्ञ सतीश कांबळे यांनी हस्तकला प्रशिक्षणाबाबत माहीती दिली.

या वेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे, प्रा. शुभांगी सावंत- सरदेसाई, आयएसईसीचे दत्ता पाटील, हर्षद देसाई, प्रा. ज्योती कुंभार, डा. लता शेटे, डा. शिवानंद गजरे, प्रा. अभिजीत कांबळे, प्रा. बाबासाहेब मोहीते यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकत्तेर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. मल्लीकार्जुन शिंत्रे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. स्वप्नील जाधव यांनी आभार मानले.

प्लॅन्टर, फुलदाणीसह शोभेचे दिवे…

महीला व विद्यार्थीनी प्लॅन्टर, पेन स्टॅण्ड, फुलदाणी, चटई, शोभेचे दिवे यासह विविध वस्तू बनवण्यात आल्या. 

श्री जोमकाई देवीची यात्रा आजपासून ; सोमवारी मुख्य दिवस

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर व चव्हाणवाडी गावाचे आराध्य दैवत श्री जोमकाई देवीची यात्रा आज रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी जागराने सुरू होत आहे. सोमवार दिनांक २ मार्च २०२६ रोजी ओटी भरणे व यात्रेचा मुख्य दिवस साजरा करण्यात येणार आहे.

होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेस देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी उत्तूर गावातून देवीची पालखी मिरवणुकीने चव्हाणवाडीत जाते व तेथून देवीच्या डोंगरावर नेण्यात येते. येथे देवीचे मानपान झाल्यानंतर पालखी पुन्हा उत्तूर गावात परतते.

या सोहळ्यास जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित राहून देवीची ओटी भरतात व नवस फेडतात. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिला जाणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार यावर्षी ग्रामीण रुग्णालय आजराला प्राप्त झाला. मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आरोग्य मंत्री ना. प्रकाश रावजी आबिटकर यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरोग्य रत्न पुरस्काराकरिता रुग्णालयाचे एकूण गुणात्मक आणि धोरणात्मक कामकाज पाहण्यात आले. यामध्ये डी एच आय एस -२ व एच एम आय एस या संकेतस्थळावरील एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ च्या रिपोर्टिंग वरती सर्व ग्रामीण रुग्णालयांना गुण देण्यात आले. तसेच बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, बी ओ आर, स्वाभाविक प्रसुती, सिझेरियन प्रसूती, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेले शस्त्रक्रिया शिबिर, इतर शस्त्रक्रिया, स्वच्छता, एनसीडी क्लिनिक, एमजेपी जेवाय कामकाज यावरही गुण देण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय या श्रेणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आजरा या संस्थेने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती आजरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी दिली.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथालयातील नवीन मराठी पुस्तकांचे व कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आजरा शहरातील विविध शाळातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ग्रंथालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, संभाजीराव इंजल, डॉ अंजनी देशपांडे, कृष्णा सडेकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार व शालेय विद्यार्थी उपस्थीत होते.

आजचे पंचांग

♦ दिनांक : १ मार्च २०२६
♦ वार : रविवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : त्रयोदशी तिथी (रात्री ०७.०९ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
♦ नक्षत्र : पुष्य नक्षत्र (सकाळी ०८.३३ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
♦ योग : शोभन योग (दुपारी २.३२ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
♦ करण : कौलव करण (सकाळी ७.५४ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण (रात्री ७.०९ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
♦ चंद्र राशी : कर्क राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ५.१५ ते सायंकाळी ६.४३ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त :
अभिजित : दुपारी १२.२७ ते दुपारी ०१.१५
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५९
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४३
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२
♦ शक संवत: १९४७

 

संबंधित पोस्ट

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!