mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दि.२१ फेब्रुवारी २०२६

आणखी एकाला अटक
तीन दिवसांची पोलीस कोठडी
तीन गुन्हे उघडकीस…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वझरे (ता. आजरा) येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना पोलीस तपासात चिमणे ता.आजरा येथील दत्तात्रय तुकाराम चव्हाण हा देखील यापूर्वीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका काजू प्रक्रिया उद्योगातील चोरीसह अन्य दोन गुन्हयांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे समजते.

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दत्तात्रय मांडरे ( रा. कर्पेवाडी ता. आजरा ). प्रेम अनिल कांबळे ( रा. वझरे ता. आजरा ) व अभिजीत अमृत आरेकर ( रा. उत्तुर ता. आजरा ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फॉर्म्युला ठरला...
अडीच वर्षासाठी उपसभापतीपदाची दोघांना क्रमाने संधी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा पंचायत समिती पदाधिकारी निवडीचा फॉर्म्युला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवला असून त्यानुसार सभापतीपदी सौ. जयश्री संजय गाडे या पहिल्या अडीच वर्षाकरिता राहतील. या अडीच वर्षांमध्ये पहिल्या सव्वा वर्षाकरिता अनुक्रमे सौ. यशोदा युवराज पोवार या तर पुढच्या सव्वा वर्षाकरिता विकास चोथे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येणार आहे.

त्यानंतर उर्वरित अडीच वर्षाकरिता पोवार किंवा चोथे यांच्यापैकी एकाला तत्कालीन परिस्थितीनुसार सभापती पदाची संधी दिली जाईल व ज्याला ही संधी मिळणार नाही त्या सदस्याला उपसभापती पदाची संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मेंढोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार : जयवंत सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मेंढोली ग्रामस्थ गटतट विसरून विकासासाठी निवडणुकीत आपल्या पाठिशी राहिले याची जाणीव ठेवून मेंढोली गाव दत्तक घेतले आहे. या पाच वर्षात गावचा चेहरामोहरा बदलून गावच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत मेंढोली येथील साकव भुमिपुजन प्रसंगी जयवंत सुतार यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी आजरा नगराध्यक्ष अशोक चराटी होते.

स्वागत लक्ष्मण शिंत्रे यानी केले. यावेळी सुतार यांनी साकवासाठी आमदार शिवाजीराव पाटील याच्या माध्यमातून ओढ्यावरील साकव व गावातील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याचे तसेच सरपंच विलास जोशिलकर याच्यासह गावकरी सोबत राहिल्याने गावच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे सागितले.

पंचायत समिती सदस्य समिर पारदे यानी पंचायत समितीच्या माध्यमातून या गावासाठी काम बाकी ठेवणार नसल्याचे आश्वासन
दिले.

यावेळी संभाजीराव सरदेसाई, सरपंच विलास जोशिलकर, विकास सेवा संस्था माजी चेअरमन आप्पासो चौगले, जितेंद्र नांदवडेकर, ग्रामपंचायत सदस्य मंबई मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार आनंदा कातकर यांनी मानले.

मातोश्री पाणंद योजनेतून जाधेवाडी पाणंद रस्ता कामास प्रारंभ


ऊत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जाधेवाडी ता. आजरा येथील भूतेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन जि. प. सदस्य शिरीष देसाई, सुधीर देसाई, पं. स. सदस्य जयश्री गाडे व विकास चोथे यांच्या हस्ते संपन्न झाले.

सदर १ कि.मी. लांबीचा रस्ता मातोश्री पाणंद योजनेतून करण्यात येणार असून त्यासाठी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी जाधेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. आभार मांगले यांनी मानले.

कार्यक्रमास प्रभाकर सावंत, अश्विनी गेंगे, पांडूरंग रावण, अश्विनी भुजंग, बापू भुजंग, गणपती सावंत, विश्वास करडे, सुधाकर आजगेकर, शंकर सावंत, राऊ भुजंग, सुभाष भुजंग, रोशन मांगले, मंगेश देसाई, दादा समनजी, तानाजी डोंगरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भावेश्वरी मंदिर जीर्णोध्दोरासाठी मुम्मेवाडीकर पुन्हा एकवटले

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुम्मेवाडी ता .आजरा येथील मुम्मेवाडीकरांचे श्रध्दास्थान व जागृत देवस्थान श्री .भावेश्वरी मंदीर बांधकामासाठी वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अडीच कोटीचा निधी मंजूर केला आहे . मार्च २०२५ मध्ये गावकऱ्यांनी पाळक पाळून श्रमदान केले . यावेळी मंदिर परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात आला होता .सध्या मंदिराच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाले आहे . जुन्या मंदिरातील दगडांची भर घालण्यासाठी पुन्हा श्रमदान करण्यात आले . भावेश्वरी देवीच्या नावानं चांगभलं चा गजर करत चारशेहून अधिक ग्रामस्थांनी श्रमदानात भाग घेतला.

गावातील अबालवृद्ध श्रमदानात सहभागी झाले होते.

निधन वार्ता 

अनुसया थोरवत 

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

उत्तूर ता. आजरा येथील अनुसया विष्णू थोरवत  ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन रविवार दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता उत्तूर येथे आहे. राजेंद्र थोरवत यांच्या त्या आई होत.

उत्तुर येथे शिवजयंती दणक्यात साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री. छत्रपती युवा ग्रुप उत्तूर यांच्यावतीने संयुक्त शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नाम. हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळ, स्वराज्य ढोल ताशा पथक उत्तूर हलगी वादन, लाईट शो आकर्षक महाराजांची मूर्ती, महाप्रसाद असे ग्रुपच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उत्तूर पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिक, भागातील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो क्लिक 

मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्यास सुरुवात झाली असल्याने शहरात ठीक – ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!