बुधवार १८ फेब्रुवारी २०२६



वझरे येथे रात्री चोरी करताना दोघे संशयित ताब्यात…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वझरे येथे मुख्य रस्त्याशेजारील बंद घराचा कडी कोंयंडा उचकटून चोरीच्या उद्देशाने प्रवेश केलेल्या वझरे व कर्पेवाडी येथील दोघा संशयितांना स्थानिक ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. वझरे परिसरात झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी दक्षता घेण्यास सुरुवात केली असून याचाच परिणाम म्हणून काल दोन संशयित बंद घरात चोरीच्या उद्देशाने गेले असता त्यांना ताब्यात घेण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा सदर प्रकार घडल्याने आज बुधवारी याबाबत पोलिसांतून अधिक माहिती मिळू शकते.

मतदारांच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही : सुधीर देसाई
माद्याळ येथे सत्कार समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महिला बचत गट सक्षमीकरणासह आरोग्य, शिक्षण, युवकांसाठी रोजगार, क्रीडांगणे, वाचनालये यासाठी आपला प्रयत्न कायम राहील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा आपला संकल्प आहे मतदारांनी ज्या विश्वासाने आपणाला सभागृहात पाठवले आहे त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही देवर्डे व माद्याळवासीयांनी तर आपणाला भरभरून प्रेम दिले आहे.याची दखल आगामी काळात निश्चितच घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुधीर देसाई यांनी केले. माद्याळ येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा कार्यकर्ते देवदास बोलके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, तालुक्याने सुजित देसाई यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची दखल घेत राष्ट्रवादीच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळींनी त्यांच्यावर गटनेत्याची जबाबदारी दिली आहे हा संपूर्ण आजरा तालुका वाशी यांचा सन्मान आहे असे म्हणावे लागेल. भागातील प्रश्नांची असणारी जाण, स्व. राजारामबापूंसारख्या सहकारातील आदर्शवत व्यक्तीचा असणारा वारसा निश्चितच त्यांना भविष्यात उपयोगी पडेल.
नूल जिल्हा परिषद मतदार संघाचे नूतन सदस्य अनिरुद्ध रेडेकर म्हणाले, गत निवडणुकीत आपल्या आई अंजनाताई यांच्या पराभवाने आपण खूप काही शिकलो. सर्वसामान्यांकरता वेळोवेळी उभा राहिलो याचा निश्चितच या निवडणुकीत फायदा झाला. सुधीर देसाई यांच्या जोडीने आपण आजरा तालुक्यासाठीही विकास कामे आणण्यासाठी प्रयत्नशील राहू स्व. केदारी रेडेकर यांची पाठीशी असणारी पुण्याई , सर्वसामान्यांसाठी केलेले काम, व सर्वसामान्य नागरिकांनी दिलेली साथ यावेळी आपणाला विजयापर्यंत नेऊ शकले
कार्यक्रम प्रसंगी संतोष पाटील युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी श्री.सुधीर देसाई, श्री. अनिरुद्ध रेडेकर, सौ. राजश्री गाडे, यशोदा पोवार, संजय गाडे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, राजू होलम, शिवाजीराव नांदवडेकर, गोविंद पाटील, संजय गुरव, देवदास बोलके, सिद्धार्थ तेजम,पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार, सरपंच सौ. कल्पना चाळके विठ्ठल बोलके, अशोक बोलके, संदीप बोलके, गणपती कांबळे, प्रभाकर देसाई, वंदन पाटील. शिवाजी बोलके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्रावण जाधव यांनी आभार मानले.
आजऱ्याचे तीन जि.प. सदस्य
मतदारसंघाच्या रचनेत आजऱ्याचा एक जिल्हा परिषद मतदार संघ कमी झाला असला तरीही नूल मतदारसंघातून आपण निवडून आलो असून आजऱ्याचे तीन सदस्य सभागृहात कायम आहेत असे यावेळी अनिरुद्ध रेडेकर यांनी सांगितले.

उत्तूर–कडगाव मार्गाचे काँक्रिटिकरण सुरू; रखडलेल्या कामाला अखेर गती

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दीर्घकाळ रखडलेल्या उत्तूर–कडगाव मार्गाच्या काँक्रिटिकरण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. योग्य नियोजनाअभावी सुमारे सव्वा वर्ष हा प्रकल्प थांबलेला होता.
लोकभावना तीव्र झाल्याने सर्वपक्षीय नेते आंदोलनाच्या तयारीत असतानाच काम सुरू झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी जानेवारीत रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. मात्र टप्प्याटप्याने काम पूर्ण न करता काही ठिकाणी खडी टाकून माती भरल्याने काम अपूर्ण राहिले. त्यानंतर यात्रा, पावसाळा, झाडतोड आणि विविध तक्रारींमुळे काम थांबले. परिणामी रस्त्यावर खड्डे व धुळीचे प्रमाण वाढले होते. यामुळे धुळीच्या त्रासाचे रुग्ण वाढणे तसेच किरकोळ अपघात घडणे, अशा समस्या नागरिकांना भेडसावत होत्या.
काल मंगळवारपासून सायंकाळी ४ ते सकाळी ७ या कालावधीत सलग सुमारे १३ तास काम सुरू राहणार आहे. दररोज अंदाजे ४०० ते ५०० मीटर काँक्रिटिकरण करण्याचे नियोजन असून १० मार्चपूर्वी काम पूर्ण करण्याचा उद्देश आहे. रस्त्याची रचना १० मीटर रुंद काँक्रिट मार्ग आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी १ मीटर साईड पट्टी अशी आहे.कामासाठी एक्सप्रेस वे व विमानतळ धावपट्ट्यांमध्ये वापरली जाणारी पीक्यूसी (PQC) यंत्रणा वापरली जात आहे. ही यंत्रणा काँक्रिट समसमान पसरवून त्याला कंपन देते, त्यामुळे थर घट्ट बसून पृष्ठभाग गुळगुळीत व मजबूत तयार होतो. सुमारे पाऊण ते एक फूट जाडीच्या थरात डॉवेल बार, टाय बार आणि काही ठिकाणी स्टील मॅट वापरून रस्त्याची मजबुती वाढवली जात आहे.
सध्या अधिकाऱ्यांसह सुमारे ३० कर्मचारी कामात कार्यरत असून आवश्यक कच्चा माल उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काम पुन्हा खंडित होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी सुरू झालेल्या कामाचे स्वागत केले आहे.

सरपंच परिषदेच्या कायदेशीर लढाईला यश : राजू पोतनीस
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतींच्या अस्तित्वासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र’ जी लढाई लढत आहे. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि सर्व राज्य विश्वस्त ,विभागीय आणि जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी मोठा पाठपुरावा केला त्याला आता मोठे यश येताना दिसत आहे.
सरपंच परिषदेने शासनाकडे अत्यंत स्पष्ट आणि ठाम मागणी केली होती की, तातडीने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या अन्यथा, लोकशाहीचा आदर राखून आजी-माजी सरपंच किंवा संपूर्ण बॉडीचीच ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती करा.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत आदेश निर्गमित केला आहे. हा संघर्षाचा आणि एकजुटीचा पहिला मोठा विजय आहे.
शासकीय आदेशानुसार प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
नकाशे अंतिम करणे: तहसिलदारांनी गुगल अर्थच्या मदतीने गावाचे नकाशे २०/०२/२०२६ पर्यंत अंतिम करणे अनिवार्य आहे.
प्रभाग निश्चिती: तलाठी आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रभाग आणि सीमा निश्चितीची कार्यवाही २७/०२/२०२६ पर्यंत पूर्ण करायची आहे.समिती तपासणी: तहसिलदार, गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या समितीने ०५/०३/२०२६ पर्यंत प्रभाग रचनेची तपासणी करणे आवश्यक आहे.
आयोग मान्यता: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून २३/०३/२०२६ पर्यंत त्याला मान्यता मिळवणे अपेक्षित आहे.
हरकती व सूचना: प्रारुप प्रभाग रचनेवर ०७/०४/२०२६ ते १३/०४/२०२६ या कालावधीत हरकती नोंदवता येतील.
अंतिम प्रसिद्धी: सर्व सुनावणी पूर्ण करून ०४/०५/२०२६ रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील.
आपण केवळ पत्रांवर अवलंबून न राहता माननीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी झाली असून, न्यायालयाने पुढील तारीख २४ फेब्रुवारी निश्चित केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.प्रशासकीय दिरंगाईला छेद देऊन प्रक्रियेला गती मिळणे, हे आपल्या दबावाचे फळ आहे. जोपर्यंत लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती येत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असे
सरपंच परिषद, मुंबई चे प्रदेश सरचिटणीस यांनी सांगितले.

नवजीवन दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे येथील नवजीवन सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
नूतन संचालक पुढीलप्रमाणे…
उदय नारायण नेवगे, उदयराज गोविंद पाटील, गिरीश सूर्याजी पाटील, रवींद्र शामराव पाटील,जयवंत राघो शेटगे शिवराज चंद्रकांत पाटील, सविता दयानंद डोंगरे, रेखा दशरथ पेडणेकर, पांडुरंग महादेव गुरव, सुरेश गणपती कांबळे
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहदेव नेवगे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, रवींद्र सखाराम पाटील व मारुती डोंगरे यांनी विशेष प्रयत्न केले.

दाभिल येथे गुरूवारी दशावतारीसह विविध कार्यक्रम
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल येथे उद्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दाभिल येथील स्थानिक कलाकार शंभू महादेव दशावतार नवनाट्य मंडळ दाभिलचा ‘देव झाला गुराखी’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. गुरूवारी रात्री १० वाजता नाटकाला सुरवात होणार आहे. यामध्ये गुरूवारी सकाळी शिवज्योत आगमन, सकाळी ८ वाजता मुर्तीपूजन होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता संगणकाच्या युगात जुन्या खेळांचा विसर पडला आहे. त्यासाठी जून्यां खेळांचा सजीव देखावा दाखविण्यात येणार आहे. यानंतर १० वाजता शिवगर्जना स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यानंतर दशावतारी नाटक सादर होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

छाया वृत्त

आजरा नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेली आग नगरपंचायत कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या कष्टाने विझवली. वारंवार लागणाऱ्या या आगीमुळे नगरपंचायत प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे .

तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकालाचे रोखठोक विश्लेषण खालील लिंक वर पहा…

फोटो क्लिक

नळ पाणीपुरवठा योजना नवी असली तरीही गळतीचे प्रश्न जुनेच आहेत. काँक्रीटचा रस्ता झाला …गटर्स झाल्या…
आता ही गळती काढणार कशी…?
कनेक्शन्सना चाव्या बसणार तरी कधी..?




