mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६

नूतन नगरसेवकांनी पहिलीच सभा गाजवली

पाणीपुरवठा योजनेबाबत अधिकारी धारेवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहराची नवीन पाणीपुरवठा योजनेमु‌ळे शहरवासीयांची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे शहरवासीयांना पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे सर्वत्र रस्त्याची खुदाई यामु‌ळे हालात भर पडली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराचे पुढचे देणे देखील सभागृहात चर्चा झाल्याशिवाय देण्यात येवू नये. ठेकेदाराने रस्ता खुदाई करून केलेले पॅचवर्क म्हणजे या योजनेतील मोठा भ्रष्टाचार आहे. रस्ते करणारच आहात तर पॅचवर्कचा खर्च कशासाठी ? असा सवाल करत तातडीने रस्त्याचे पॅचवर्क थांबवावे अशा सूचना नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना केल्या. या वेळी पाणी पुरवठा योजनेच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नगरपंचायतीची पहीली तहकुब सभा आज झाली.नगराध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते. या वेळी नगरसेवक असिफ पटेल, निसार दरवाजकर, अभिषेक शिंपी, परशराम बामणे यांच्यासह परेश पोतदार यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार नगरसेवकांच्याबरोबर सभ्य भाषा वापरत नसल्याने त्यांने सभागृहासमोर माफी मागावी. योजनेचे संपूर्ण आराखडा सभागृहासमोर मांडावा. अशी मागणीही केली. आठवडा बाजार ठेक्याचा प्रश्न स्मिता कुंभार यांनी मांडला. आठवडा बाजाराचा जमा होणार कर व प्रत्यक्षात होणारा लिलाव यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास येते. त्यामु‌ळे येणारा लिलावात  अभ्यास करून लिलाव रक्क्म ठरवावी अशा सूचना त्यांनी केल्या. सभेमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबतही जोरदार चर्चा झाली. लाखो रुपये खर्चुन कचरा वेळेत उचलला जात नसेल तर एखा‌द्या कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका देण्याएवजी ही यंत्रणा नगरपंचायती मार्फत राबविता येते का याची चाचपणी करण्याच्या सूचना नगरसेवक परशुराम बामणे यांनी केल्या.

चार वर्ष क्रीडा संकुलची इमारत बांधूनही अद्याप वापरात नाही. ती वापरात आणणे गरजेचे आहे. असे सभेत सुचविण्यात आले. बांधकाम विभागाकडून बांधकाम परवानगीसह बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतांना पन्नास हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची चर्चा शहरात आहे. बांधकाम परवाने दिल्यावर बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाहीत. पूर्णत्व दाखले देण्यासाठी बड्या बिल्डरांकडून प्रती सदनीका दहा हजार रुपये घेतले जात असल्याचीही जोरात चर्चा असल्याचा आरोप परेश पोतदार यांनी केला.

सभेतील नगरसेवकांच्या सूचना…

🔳नगरपंचायत मालकीच्या दुकान गाळ्यांचे भाडे प्रति महिना किमान दहा हजार रुपये करावे.
🔳 ‘पे अँड यूज’ तत्वावर उभा करण्यात आलेली स्वच्छता करणे पाण्याच्या सोयीसह खुली करावीत.
🔳 आठवडा बाजार ठेक्याची किमान निलाव रक्कम २० लाख रुपये करावी.
🔳 थकीत घरफाळ्यात मिळकत धारकांना सूट देऊन वसूल करावा व महसूल वाढवावा.
🔳 गटर्सवर असणारी बांधकामावर तातडीने कारवाई करावी.
🔳 जनावरांचा बाजार परिसरातील अतिक्रमणे हटवून तेथे चार चाकी साठी ‘ पे अँड पार्क’ सुविधा करावी.
🔳 आठवडा बाजारादिवशी वाडा मशिद समोर रिकाम्या जागेत चार चाकी ऐवजी दुचाकी पार्कीग व्यवस्था करावी.
🔳 शिवाजीनगर येथील एसटीपी प्लांट अन्यत्र जागा संपादित करून हलवावा.

यावेळी झालेल्या चर्चेत असिफ सोनेखान, रेहमत खेडेकर, डॉ.स्मिता कुंभार, अनिकेत चराटी, आसावरी खेडेकर,पूनम लिचम, विक्रम पटेकर यांनी भाग घेतला. यावेळी उपनगराध्यक्षा सौ.पुजा डोंगरे, सौ.अश्विनी चव्हाण, सौ.अन्वि केसरकर, डॉ. इंद्रजीत देसाई, सौ. बुड्डेखान, श्रीमती कांबळे यांच्यासह मुख्याधिकारी सुरज सुर्वे, निहाल नायकवडी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

साहेब धुळीचा बंदोबस्त करा…

आजऱ्यातील धुळीच्या त्रासाने व्यापारी हैराण


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून, याचा मोठा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशन‘च्या वतीने आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी आणि उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.

​निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या आजरा शहरात रस्त्याची कामे, पाणी योजना, पाईपलाईन आणि गटारींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सर्वत्र खुदाई झाल्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेतील दुकानांमधील मालावर होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सततच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढले असून नागरिक आजारी पडत असल्याचेही असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने दिवसातून २ ते ३ वेळा पाणी मारण्यात यावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यावेळी व्यापारी असोसिएशनचे ​महेश नार्वेकर (अध्यक्ष),​वाय. जी. इंजल (उपाध्यक्ष),​ राजेश विभूते (सचिव),​संजय हरेर (खजिनदार), ​सचिन इंदुलकर, वृषाल हुक्केरी, मल्लिकार्जुन तेरणी, महान्तेश गुंजाटी, दाऊद लमतुरे, बाळू पाचवडेकर (सदस्य), अभिजीत रांगणेकर, शरीफ खेडेकर उपस्थित होते.

आजऱ्यात गव्यांच्या कळपाचा वाढला उपद्रव…
शेतकरी हैराण


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात गव्यांच्या कळपांचा उपद्रव वाढला आहे. शेतातील पिकात हे कळप धुडघुस घालत आहेत.पिकांसह शेतातील जलवाहीन्याचे नुकसान होत आहे. यामु‌ळे शेतकरी हैराण झाले आहेत. गव्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

जंगल परिसराकडील पडिक जमिन व शेतवडीत वावरणारे गव्यांचे कळप नागरी वस्ती व गावाकडे सरकत आहेत. उन्हाळा सुरु झाल्याने जंगलातील खाद्य व पाण्याचे साठे कमी होत चालले आहे. खा‌द्यासाठी व पाण्यासाठी हे कळप शिवारात व नदीकाठी फिरतांना दिसतात. गव्यांच्या कळपात पंधरा वीस लहान मोठे गवे असतात. त्यांची संख्या अधिक असल्याने शिवारातील पिक तास दीड तासात फस्त केले जाते. पण त्यांच्या वावराने उभी पिके तुडवली जात आहेत. सध्या रब्बीची पिक काढणीला आलेली आहेत. त्याचबरोबर उन्हाळी भुईमुग व भाजीपाल्याची पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. गव्यांचे कळप पिकांचे तुडवूनही मोठे नुकसान करीत आहेत. पिकांच्या बरोबर शेती उपयोगी साहित्याचे नुकसान होत आहे. शेतातील जलवाहीन्यांचेही तुडवल्या गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामु‌ळे गव्यांच्या कळपांचा वनविभागाने बंदोबस्त करावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांबरोबर वाहन चालकही भीतीच्या छायेखाली…

गडहिंग्लज – आंबोली मार्गावर प्रवास करताना रस्ता ओलांडणारे गवे अचानक समोर येत असल्याने वारंवार अपघात होत असून यामुळे वाहन चालक देखील गव्यांच्या दहशतीखाली आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटर सायकलवरच हृदयविकाराचा झटका… आज-यातील एकाचा मृत्यू…  

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!