mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार दि. १०  डिसेंबर २०२५

आता लक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांकडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे नगारे वाजू लागल्याने या निवडणुकांकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. निवडणुक कार्यक्रम लवकरच जाहीर होईल असे गृहीत धरून अनेकांनी मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवला आहे.

नवीन मतदारसंघ रचनेत आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन मतदारसंघ रद्द झाले आहेत. संपूर्ण तालुक्यात केवळ दोन जिल्हा परिषदेचे तर चार पंचायत समितीचे मतदार संघ असून मतदारसंघांचा विस्तार प्रचंड आहे. उत्तुर व पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये जिल्हा परिषदेकरीता इच्छुकांची संख्या मोठी आहे.

सद्यस्थितीत पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाकरिता जयवंत सुतार, अल्बर्ट डिसोजा, विष्णुपंत केसरकर, संदीप चौगले, राजू होलम, सुधीर देसाई, रणजीत सरदेसाई, सुधीर सुपल, राघव सरदेसाई आदींची नावे चर्चेत आहेत. तर उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रीय काँग्रेस मधून उमेश आपटे यांची उमेदवारी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून मात्र अद्याप निश्चिती झाली नसून वसंतराव धुरे, दीपक देसाई, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, यांची नावे आघाडीवर आहेत. ऐनवेळी अन्य नावांची यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

मतदारसंघांचा असणारा प्रचंड विस्तार व त्यामुळे निवडणुका लढवताना येणाऱ्या आर्थिक मर्यादा याची उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अनेकांनी केवळ मतदारसंघाचा विस्तार पाहून या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवाऱ्या देताना मोठ्या अडचणी निर्माण होणार असून निवडणुका तूर्तास महायुती व महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची प्राथमिक तयारी सुरू केली असली तरीही दोन मतदारसंघ व नेतृत्व करणारे दोन कॅबिनेट मंत्री आणि एक आमदार तेही वेगवेगळ्या पक्षांचे अशी स्थिती असल्याने जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक जण सवतासुभा मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समिती गणामध्ये तडजोड शक्य आहे परंतु जिल्हा परिषद गटामध्ये ही तडजोड करताना नेतेमंडळींची चांगलीच दमछाक होणार असे दिसत आहे.

विशेषता पेरणोली मतदारसंघांमध्ये पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आमदार शिवाजीराव पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग मोठा आहे या मतदारसंघाकरिता आम. शिवाजीराव पाटील आग्रही राहण्याची शक्यता असून त्यांनी आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तर उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघावर मंत्री हसन मुश्रीफ यांचे एकहाती वर्चस्व असल्याने तिथे पालकमंत्री आबिटकर व आमदार शिवाजीराव पाटील फारसा हस्तक्षेप करतील असे दिसत नाही.

एकीकडे मंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे आमदार शिवाजीराव पाटील यामुळे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांची मोठी अडचण होणार असे दिसत आहे. ऐनवेळी हे तिघेही स्वतंत्र भूमिका घेऊन आपापल्या कार्यकर्त्यांना दोन्ही मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील अशी शक्यताही पुढे येत आहे.

सरपंचपद परवडले…

पंचायत समित्यांबाबतची गेल्या काही वर्षातील शासनाची धोरणे पाहिली तर पंचायत समितीमध्ये काम करणे हे अडचणीचे आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे . स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच पद परवडले परंतु पंचायत समितीचे सदस्यपद नको असे म्हणणाऱ्यांची संख्या ही अलीकडे वाढली आहे.

हरपवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.नंदा गुरव

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हरपवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. नंदा चंद्रकांत गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच शिवाजी कांबळे यांच्या निधनानंतर सदरची जागा रिक्त होती. सौ. नंदा गुरव यांचे उपसरपंच पदासाठी नाव सदस्य गोविंद गुरव यांनी सुचवले.

यावेळी सरपंच सागर यशवंत पाटील यांच्यासह सदस्य आनंदा पांडुरंग कदम, रेश्मा सर्फराज मुल्लाणी, संगीता मारुती जाधव, गोपाळ लक्ष्मण गुरव, पुनम अमोल पवार व ग्रामसेवक अभिजीत सावंत उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयात ज्युनिअर वाणिज्य मंडळामार्फत आर्थिक साक्षरता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सेबी इंडियाचे संसाधन व्यक्ती आर्थिक ज्येष्ठ गुंतवणूक तज्ञ सल्लागार  हेमंत जांभळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येत नाहीत. भविष्यातील आपल्या गरजा जाणून पैशाची बचत व गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला फायदेशीर पर्याय निवडून रकमेची योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक संकटांना सामोरे जाता येते. विद्यार्थ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून सुरक्षित भविष्यासाठी बचत व गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी पैसा मिळवणे यापेक्षा टिकवणे कठीण आहे. यासाठी पैशाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आर्थिक गुंतवणूक व सल्लागार म्हणून श्रीमती वैशाली चौगुले या उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना आर्थिक गुंतवणुकीबाबत  मार्गदर्शन केले.

उपप्राचार्य डी.पी.संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील,  प्रा. विठ्ठल हाके,  प्रा. मलिकार्जुन शिंत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.अर्चना चव्हाण यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.शोभा फड यांनी करून दिली सूत्रसंचालन प्रा.रूपाली पिळणकर यांनी केले तर  आभार प्रा.वैशाली देसाई यांनी मानले.

जनआरोग्य सेवा म्हणजे ऋणानुबंधाचा ठेवा ‘ : सरपंच किरण आमणगी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनआरोग्य सेवा म्हणजे ऋणानुबंधाचा ठेवा असून निस्वार्थी सेवेनेच जनतेचा विश्वास संपादन करता येतो असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी यांनी व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत शर्मा यांच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिषकुमार देसाई यांनी डॉ. शर्मा यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करताना प्राथमिक आरोग्य केंद्राची उंचावलेली कामगिरी त्यांच्या समर्पणाचा उत्तम नमुना असल्याचे सांगितले. उत्तूरवासियांच्या वतीने डॉ. शर्मा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना डॉ. शर्मा म्हणाले, उत्तूरवासियांचे प्रेम आपण कधीच विसरणार नाही. सामान्य रुग्णांसाठी वेळ आणि परिस्थितीची पर्वा न करता काम केले. त्याचेच फलित म्हणून दिवसाला ३०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.

कार्यक्रमाला डॉ. सौरभ कसबे, डॉ. अर्चना देशमाने, संभाजी कुराडे, संजय गुरव, अनिता घोडके, बाळू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सौरभ वांजोळे, शिवाजी कांबळे, महेश करंबळी व रेश्मा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

समारंभाचे नियोजन विजय पाटील, प्रदीप लोकरे आणि महेंद्र मिसाळ यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्रविण लोकरे यांनी केले तर आभार मंदार हळवणकर यांनी मानले.

आजरा हायस्कूलमध्ये हसत खेळत विज्ञानाची धमाल कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील आजरा हायस्कूलमध्ये ‘ हसत खेळत विज्ञानाची धमाल कार्यशाळा ‘ हा कार्यक्रम पार पडला डॉ.संजय चराटी हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

कार्यक्रमांमध्ये डॉ .संजय पुजारी, प्रा.किरण प्रधान, मीना शिरगुपे आदींनी आपल्या भेटीला न्यूटन, आईन्स्टाईन, आणि विज्ञानाचे मूलभूत प्रयोग, जादूचे प्रयोग, पपेट शो गाणी आणि नृत्य अशा मनोरंजनातून विज्ञानातील वेगवेगळे प्रयोग सादर केले.

कार्यक्रमाचे प्रसंगी मुख्याध्यापक ए. एल. तोडकर,उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आज तालुक्यात…

रामानंदाचार्य नरेंद्रचार्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या पादुकांच्या दर्शन सोहळा सरोळी ता. आजरा येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्य गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

आजरा अर्बन बँकेला १० कोटी ८१ लाख रु.नफा.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!