mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार ८ नोव्हेंबर २०२५

निलमचा मृत्यूशी संघर्ष संपला…
प्रदीर्घ लढ्यानंतर घेतला अखेरचा श्वास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील भावेवाडी येथील निलम महादेव सांबरेकर हिचे  नुकतेच निधन झाले. तिला जगवण्यासाठी सुरू असलेली नातेवाईकांची व कुटुंबियांची धडपड अखेर थांबली. कोरोनानंतर गेले कांही महिने तिला पांढऱ्या पेशी कमी होण्याचा त्रास सुरू झाला होता. कोरोना कालावधीत घेतलेल्या लसीचा हा परिणाम असल्याचेही बोलले जात होते. अतिशय खेळकर व हसमुख असणाऱ्या २२ वर्षाच्या निलमने अतिशय गरिबीमधून लॅब टेक्निशियन चा कोर्स खाजगी नोकरी करत पूर्ण केला होता.

गेली चार वर्षे तिला तब्येतीचा त्रास सुरू होता. ऐन तारुण्यातच गेली चार वर्षे ती मृत्यूशी झुंज देत होती. कुटुंबीयही तिला जगवण्यासाठी शेवटपर्यंत धडपडत होते. पुन्हा एक वेळ पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निमित्त झाले आणि अखेर तिला मृत्यूने कवटाळले.

तिच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

लाख रुपयांच्या मोटरींवर चोरट्यांचा डल्ला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वेळवट्टी येथील क्षत्रिय कन्स्ट्रक्शन ड्रम मिक्स प्लांट मधील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या तब्बल ८ पाण्याच्या मोटर्सवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सदर प्लांट बंद असल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा उचलला.

याबाबतची फिर्याद पांडुरंग राजाराम तोडकर यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला असून हवालदार अनिल सरंबळे पुढील तपास करत आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्यपदी दशरथ अमृते

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्यपदी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ आनंद अमृते यांची नियुक्ती केली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड…
वृक्षप्रेमीं कडून बैठक बोलवण्याची मागणी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

विकासाच्या नावाखाली आजरा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. विशेषतः संकेश्वर ते बांदा महामार्ग तयार करताना रुंदीकरणात प्रत्यक्षात नसलेले वृक्षही ठेकेदारांचे बळी ठरले. सदर वृक्षतोडीनंतर वृक्ष लागवड व संगोपन करण्यात आलेले नाही. हाच प्रकार हलकर्णी- आजरा- चंदगड रस्ता रुंदीकरणाच्या वेळी होऊ नये त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणानंतर जी वृक्ष लागवड केली जाते त्या वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे याबाबत काय उपाययोजना केली यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. यासाठी वनविभाग, अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ता रुंदीकरण काम ज्यांनी घेतले आहे त्या कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी आजरा येथील वृक्षप्रेमी समूहाच्या वतीने तहसीलदाराकडे करण्यात आलेली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून यावेळी डॉ.धनाजी राणे, डॉ.अंजनी देशपांडे, दत्तराज पाटील, वृषाल हुक्केरी, डॉ. गौरी भोसले, सी.आर.देसाई, संतोष चौगले, रणजीत कालेकर उपस्थित होते.

उत्तूर बाजारपेठेत रस्त्याची दयनीय अवस्था :पाईपलाईननंतरही डांबरीकरण नाही
व्यापाऱ्यांना नाहक त्रास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ता. आजरा येथील मुख्य बाजारपेठेतील  शनिवारचा पारंपरिक आठवडी बाजार भरणारा  रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी उखडण्यात आला होता. मात्र, पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन तब्बल सात महिने उलटून गेले तरी आजतागायत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. परिणामी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बाजारपेठेतील हा रस्ता परिसरातील आर्थिक केंद्रबिंदू मानला जातो. आठवडी बाजारात दर शनिवारी अनेक शेतकरी, व्यापारी व ग्राहक दूरवरून व्यापार आणि खरेदीसाठी येतात. परंतु सध्या या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट असून सर्वत्र खड्डे, दलदल आणि चिखल दिसतो. विशेषतः गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांना चिखल व पावसाच्या पाण्यात बसून व्यापार करावा लागला. याचा थेट परिणाम त्यांच्या विक्रीवर झाला असून व्यापार मोठ्या प्रमाणात घटला आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही दरवर्षी ग्रामपंचायतीला कर नियमितपणे भरतो. मात्र, त्या बदल्यात आम्हाला कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कर लाखावर आणि सुविधांचा पत्ता नाही अशी आमची अवस्था झाली आहे.ग्राहकांनाही दलदलीमुळे बाजारात फिरणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे ग्राहकांचा ओघही कमी झाला आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर जाणवतो.

याबाबत ग्रामपंचायतीने व स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करावे, तसेच व्यापारी व ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.

व्यंकटरावच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी साकारले भव्य “वंदे मातरम्”


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यंकटराव शिक्षण संकुलात अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य श्री.एम. एम.नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.आर. व्ही.देसाई यांची प्रेरणा तसेच कलाशिक्षक श्री. कृष्णा दावणे व एन.सी.सी. ऑफिसर श्री.महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रशालेच्या मैदानात इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील ५०० विद्यार्थ्यांनी मिळून “वंदे मातरम” व शाळेचा नवीन प्रतिक/चिन्ह साकारले. कु.शलाका गिरी हिने श्री पी. व्ही पाटील,सौ.ए.एस.गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार आवाजात “वंदे मातरम”  सादर केले. 

या उपक्रमांचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यातून कौतुक होत आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा छेडछाड प्रकरणी दोघाना अटक. – दोन दिवसांची पोलीस कोठडी.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

BREAKING …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!