सोमवार दिनांक १९ मे २०२५




वीजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वीजेचा धक्का बसून कोवाडे येथील आप्पा रामचंद्र पोवार (वय ६५) व रवींद्र आप्पा पोवार (वय ३५) या बाप-लेकाचा मृत्यू झाला. कोवाडे येथील पोवारची मळवी नावाच्या शेतात ही दुर्घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रवींद्र हा १५ दिवसांपूर्वी मुंबईहून सुट्टीसाठी घरी आला आहे. सोमवारी सकाळी घरातून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोवार बाप-लेक शेताकडे जाऊन येतो म्हणून घरातून निघाले. दुपारपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे त्यांना घरातून मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोणताही प्रतिसाद येत नसल्याने घरच्या मंडळींनी शेतात जाऊन पाहिले असता पिकाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्यामुळे वीजेचा धक्का लागून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

घरची परिस्थिती बेताची असलेल्या पोवार कुटुंबियांचा रवींद्र हा एकुलता मुलगा, ते मुंबई येथे खाजगी आस्थापनेत नोकरी करीत होते. वडरगे तसेच चव्हाणवाडी येथील यात्रेकरीता रवींद्र हा पंधरा दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आला होता. रवींद्र याच्यासह वडील आप्पा यांचा मृत्यू झाला. घरच्या दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे पोवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरच्या कर्त्या पुरूषांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कोवाडेसह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत.




