mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५       

घटनेच्या शिल्पकारास अभिवादन…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.शहरासह ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भिमोत्सव साजरा करण्यात आला.

      येथील जय भीम तरुण मंडळाच्या वतीने शहरातून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीमध्ये आजरा शहरातील डॉ. आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आजरा च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

.       राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आजरा च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बौद्धिक घेण्यात आले.

      या बौद्धिकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रप्रेमाचे विविध पैलू प्रभावी शब्दांत उलगडण्यात आले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी भारताला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्ये दिली. ही मूल्ये केवळ सामाजिक परिवर्तनाची नव्हे, तर राष्ट्र उभारणीचीही ग्वाही देणारी आहेत.

      त्यांचे विचार, कार्य आणि दूरदृष्टी यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्तीचा गाभा होता. डॉ. आंबेडकर हे केवळ एका वर्गाचे नव्हते, तर संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आणि निश्चयाच्या बळावर देशाच्या उन्नतीसाठी झिजण्याचा आदर्श घालून दिला.

      या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि बाबासाहेबांच्या विचारांना नवीन प्रेरणा मिळाली.

आजरा कारखान्यात डॉ‌.आंबेडकरांना अभिवादन…

       वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम के. डी.सी.सी. बॅंक संचालक व कारखान्याचे बॅंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

      यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई साहेब, तज्ञ संचालक श्री. रशिद पठाण कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

       आजरा महाविद्यालय, आजरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

       प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

       या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. केशव देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा आणि विचारांचा सखोल परामर्श घेतला.

       देशमुख म्हणाले,आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता, त्यांचे आचरण आपल्या जीवनात उतरवावे. बाबासाहेबांनी सांगितलेली समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव ठेवून आपण समाजात बदल घडवू शकतो.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रणजीत पवार यांनी केले, सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल हाक्के यांनी व्यक्त केले.

    कार्यक्रमासाठी श्री. योगेश पाटील, डॉ. राजीव करपे, प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. शुभांगी सावंत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यंकटराव हायस्कूल येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न..

      व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सचिव श्री अभिषेक शिंपी, संचालक श्री सचिन शिंपी उपस्थित होते.

      वासुदेव कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मांडला.संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशात व परदेशात शिक्षण घेतले आणि या घेतलेल्या शिक्षणाचा, अभ्यासाचा देशाची घटना लिहिण्यासाठी त्यांनी वापर केला.. न्याय, समता व बंधुता यावर आधारित लिहिलेली भारतीय घटना ही जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करून आदर्शपणे साकारली आहे.

      या कार्यक्रमांसाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य पन्हाळकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गिरणीकामगार संघटनेच्या वतीने अभिवादन

      डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार ऑफिस मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन करून, बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी काशिनाथ मोरे यांनी साध्या सोप्या भाषेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबांनी शिक्षणातून गुणवत्ता मिळवत मानवतेचा संदेश संविधानाच्या मधून दिला आहे असे मत व्यक्त केले. यावेळी शांताराम पाटील,काॅ. शांताराम हारेर , मनप्पा बोलके, सुरेश दिवेकर ,महादेव होडगे, हिंदूराव कांबळे, निवृत्ती राणे याच्यासह गिरणीकामगार उपस्थित होते.

आभार संजय घाटगे यांनी मानले.

यरंडोळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

      यरंडोळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

      सरपंच सरीता सुभाष पाटील , उपसरपंच भीमराव माधव, सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य, आप्पा शंकर पाटील व तसेच काशिनाथ कांबळे, शामराव कांबळे, पांडुरंग कांबळे, संतोष कांबळे, संजय कांबळे, वैभव कांबळे, साहिल कांबळे व महिला मंडळ उपस्थित होते.

      सूत्रसंचालन घुमकर यांनी केले.

         अनंतराव आजगावकर यांचे निधन

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगावकर (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी एक संस्कारक्षम पिढी घडवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उत्तूरमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

      त्यांच्या अंत्ययात्रेला गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, ‘शिवराज’चे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, निवृत्त शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, सरपंच किरण आमणगी, योगेश परुळेकर, विठ्ठल उत्तूरकर आदीं उपस्थित होते.

भादवण सरपंच मानधनातून नवीन प्रवेशद्वार फलक लोकार्पण…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भादवण ग्रामपंचातीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच हरीजन वसाहत समाजमंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी रणजित गाडे यांच्या हस्ते संपन्न झाले .

      हरिजन वसाहत येथील प्रवेशद्वार कमानीचा नवीन बोर्ड व कमान रंगकाम येणारा खर्च सरपंच मानधनातून करण्यात आला . यावेळी कमानीचे लोकार्पण लोकनियुक्त सरपंच सौ.माधुरी रणजित गाडे, आजरा साखर कारखाना संचालक राजेश जोशीलकर, संस्कार कॉलेजचे प्राचार्य रणजीत गाडे , श्री जयसिंग पाटील,श्री अर्जुन दोरुगडे, श्री तुकाराम सुतार गुरुजी,श्री स्वप्निल शिंदे, श्री संदीप सुतार श्री अंकुश खवरे, श्री आकाश जोशिलकर, श्री समिर शिवगंड, श्री मारुती मांडेकर,श्री शंकर कांबळे , श्री दिलीप कांबळे , श्री राहुल कांबळे, श्रीधर कांबळे व सर्व भीमसैनिक व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिव व भीमसैनिकांकडून बस स्थानकावर पाणी बाटल्यांसह जिलेबी वाटप

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंतीनिमित्त आजरा बस स्थानकावर दरवर्षीप्रमाणे उन्हाच्या कडाक्यामध्ये आपले कर्तव्य बजावत असणारे पोलीस बांधवांना तसेच आजरा बस स्टॅन्ड कंट्रोल रूम तसेच प्रवाशांना थंड पाणी बाटल्या व जिलेबी वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

      यावेळी सुभाष कांबळे मित्र परिवार जितेंद्र कांबळे गांधीनगर.तसेच शिवराज लोखंडे (वझरे) राज मांढरे (उतुर)विनायक कांबळे. ब्लू स्टार युवा मंच बुरुडेचे ऋषिकेश कांबळे कुणाल कांबळे .मयूर कांबळे .स्वप्निल कांबळे .संकेत कांबळे. शुभम कांबळे, सिद्धार्थनगर आजरा. सचिन कांबळे, नितीन यादव, ठाकूर विशाल कांबळे,अक्षय माळी, जयदीप कांबळे, हाळोलीचे अभिजीत कांबळे त्याचबरोबर शिव व भीमसैनिक उपस्थित होते.

मेढेवाडी येथे आगीत काजू बागेचे नुकसान

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        मेढेवाडी (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत गणेश नार्वेकर यांची काजूची झाडे जळाली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. शार्ट सर्कीटने सदर आग लागल्याचे श्री. नार्वेकर यांनी सांगीतले.

        नार्वेकर यांचे वाटेवरचा नंबर नावाचे शेत आहे. या शेतामध्ये काजूची झाडे लावली आहेत आगीमध्ये झाडे होरपळून गेली आहेत.

महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेच्या आजरा तालुकाध्यक्षपदी बाळकृष्ण सुर्यवंशी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेच्या आजरा शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी बाळकृष्ण सुर्यवंशी यांची तर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुमित्रा देवेकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त शिक्षण सेवकांना प्रेरणा देण्यासाठी शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सत्यवान सोन्ने होते.

      प्रास्ताविक सुर्यवशी यांनी केले. तसेच सरचिटणीसपदी गिरीवर रेहेकर, कार्याध्यक्षपदी विठ्ठल धनये, कोषाध्यक्षपदी शशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी सुप्रिया पाटील, जिल्हाप्रतिनिधी म्हणून आशाताई कोंडूसकर यांची निवड करण्यात आली. तसेच सुरेश देशमुख व सत्यवान सोन्ने पांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. तर संजय भोसले यांची राज्य प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी प्रकाश बड़े, दीपक कांबळे, सुहासिनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. निवड निरीक्षक म्हणून आनंद पाटील यांनी काम पाहिले सूत्रसंचलन गिरीष रेडेकर यांनी केले तर संजय भोसले यांनी आभार मानले.

रिक्षा स्टॉप कमिटी अध्यक्षपदी
प्रकाश रेडेकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील रिक्षा स्टॉप कमिटीची नुकतीच घोषणा झाली असून अध्यक्षपदी प्रकाश रेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे…

उपाध्यक्ष-तनवीर मकानदार
सेक्रेटरी-सलमान पटेल
खजिनदार- समीर चौगले

कमिटी सदस्य :-

अजित नाईक, इरफान शेख,राहुल सुतार,नईम मुल्ला,विश्वास जाधव,निवृत्ती कडूकर,पांडूरंग निर्मळे

प्रज्ञाशोध परीक्षेत खेडे विद्यामंदिरचे यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ऋणानुबंध प्रकाशन भुदरगड यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यामंदिर खेडे येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये इयत्ता पहिली मधील स्वरूपा कांबळे तालुक्यात प्रथम, अदविका कुराडे तालुक्यात तृतीय इयत्ता दुसरीमधील आदिती दिवेकर तालुक्यात तृतीय, इयत्ता तिसरी मधील मेहूल लकमले, कृष्णराज पालकर, ऋतुजा पोवार, सिद्धी पाटील, आरूष मोरे, आयुष मांगले यांनी यश संपादन केले.

      या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळू येसणे, शिक्षक बाळकृष्ण सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे  प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!