बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५



दुचाकीस्वारास काठी व दगडाने मारहाण करून मोबाईल सह दुचाकीची चावी लंपास

चाफवडे – वाटंगी मार्गावरील उचंगी हद्दीतील हूडे ते कुपटे वसाहत येथे आजऱ्याच्या दिशेने तलाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या विनायक पांडुरंग तेजम या चाफवडे येथील हॉटेल व्यावसायिकास अज्ञात तिघांनी दगड व काठीने मारहाण करून जखमी करत त्यांच्या जवळील मोबाईलसह दुचाकीची चावी लंपास केल्याची फिर्याद तेजम यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तेजम हे आपल्या दुचाकीवरून आजऱ्याच्या दिशेने येत असताना हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल वरून आलेल्या तिघांनी त्यांना कुपटे वसाहती नजिक अडवले. आमच्या बहिणीला तू मेसेज करतोस काय… असे म्हणत त्याला दगड व काठीने मारहाण केली आणि विनायक यांच्या जवळील दुचाकीच्या चावीसह मोबाईल घेऊन तिघेजण मोटरसायकल वरून निघून गेले.
सदर घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी तातडीने आजरा पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
२३ ठिकाणी सर्वसाधारण सरपंच, ३७ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज
सरपंचपद आरक्षणाचे चित्र स्पष्ट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आजरा तालुक्यातीकरीता ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.यामध्ये चार जागा अनुसूचित जाती करिता, चार जागा अनुसूचित जाती महिलांकरता, नऊ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता, दहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरीता, २३ जागा सर्वसाधारण महिलांकरता तर 23 जागा सर्वसाधारण करिता आरक्षित करण्यात आल्या.
यावेळी आजरा साखर कारखाना संचालक उदयराज पवार, एम. के. देसाई, अनिल फडके, राजू मुरकुटे, दिगंबर देसाई, विजय केसरकर, मनसे तालुकाप्रमुख आनंदा घंटे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, दशरथ अमृते, उत्तम रेडेकर, मसणू सुतार, शिवाजी गिलबिले, राजू पोतनीस, लहू वाकर, संतोष पाटील, संदीप चौगुले, संतोष चौगुले, राजू होलम, विलास पाटील, रणजित सरदेसाई, संभाजी सरदेसाई, लक्ष्मण पाटील, सुधीर सुपल, देवदास गुरव यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जाहीर आरक्षण पुढील प्रमाणे :
अनुसूचित जाती :
देऊळवाडी, होन्याळी, सुळे, मडीलगे.
अनुसूचित जाती महिला :
हरपवडे, हाजगोळी खुर्द, उत्तूर, मेंढोली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : धामणे, पेंढारवाडी, होणेवाडी, चितळे, भादवण, महागोंड, मुमेवाडी, वडकशिवाले, हाजगोळी बु.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला :
किटवडे, चिमणे, पेद्रेवाडी, निंगूडगे, बेलेवाडी हू, साळगाव, हाळोली, कोळीद्रे, भादवणवाडी, सुलगाव
सर्वसाधारण :
खोराटवाडी, मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, गवसे, एरंडोल, हात्तीवडे, किणे, कासार कांडगाव, लाकूडवाडी, सरबंळवाडी, वझरे, पारपोली, कानोली, पोळगाव, सोहाळे, इटे, चांदेवाडी, बुरुडे, आरदाळ, खानापूर, पेरणोली, बहिरेवाडी.
सर्वसाधारण महिला :
सरोळी, शिरसंगी, हालेवाडी, देवर्डे, कोवाडे, वाटंगी, मुरुडे, देवकांडगाव, कोरिवडे, लाटगाव, दाभिल, सुळेरान, आवंडी, शेळप, मासेवाडी, शृंगारवाडी, गजरगाव, चाफवडे, करपेवाडी दुll., झुलपेवाडी, वेळवट्टी, मसोली, खेडे
सदर आरक्षण सोडत प्रसंगी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मंडल अधिकारी सुंदर जाधव यांच्यासह संभाजी गाडीवड्ड, संभाजी माळी, मारुती कुरबेट्टी, चंद्रकांत पालकर उपस्थित होते.
देऊळवाडी सरपंच पद रिक्त रहाण्याची शक्यता
जाहीर आरक्षणामध्ये देऊळवाडी ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. परंतु सदर प्रवर्गातील एकाही व्यक्तीचे मतदार यादीत नाव नसल्याने सदर पद रिक्त रहाण्याची शक्यता आहे.

कुत्रे दुचाकीच्या आडवे… गाडीवरील एकाचा मृत्यू… चालकावर गुन्हा नोंद

१२ मार्च रोजी करपेवाडी ते उत्तूर मार्गावर जाणारे रोडवर धुतीचा आप्पा मंदीराजवळ कुत्रे दुचाकीच्या आडवे आल्याने बाबु तुकाराम भोसले या ७७ वर्षीय धामणे येथील वृद्धाचा मृत्यू झाला होता. याबाबत बाळकृष्ण बाबू भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून होन्याळी येथील सचिन विठ्ठल मुळीक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सचिन हा फिर्यादीचे वडील बाबु भोसले यांना आपले मोटर सायकल (MH-09-F1-3500) वर मागे बसवून घेवून धामणे ता.आजरा येथे जात असताना करपेवाड़ी ते उत्तुर मार्गावर धुतीचा आप्पा मदीरा जवळ भरधाव वेगाने हयगयीने, निष्काळजीपणाने परिस्थीतीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवून रस्त्यावर गाडीचे आडवे अचानक कुत्रे आल्याने अचानक ब्रेक लावल्याने खाली पडून बांबू भोसले यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झालेने त्यांचा मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी काल मंगळवारी सचिन याच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.

आजऱ्यात गारपीटीसह जोरदार पाऊस
वीजपुरवठा खंडित आंबा,काजूचे प्रचंड नुकसान
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरात जोरदार वाऱ्यासह मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. गारांच्या जोरदार माऱ्यामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र गारांचा सडा पडला होता.
दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडून पडले. नवीन नळ पाणीपुरवठा योजनेसाठी शहरभर करण्यात आलेल्या खुदाई व जोरदार पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शहरवासियांची चांगलीच भंबेरी उडाली.

तालुक्यात अन्यत्रही पावसाने हजेरी लावली. आंबा व काजू पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसणार असल्याचे सांगितले जाते.

समाजभान जपणारी जनता गृहतारण संस्था : आलम नाईकवाडे
जनता गृहतारण संस्थेमध्ये नार्त्तत्राडे यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करतानाच समाजभान जपणारी संस्था म्हणून जनता सहकारी गृहतारण संस्थेची ओळख असल्याचे मत अंजुमन इत्तेहादूल इस्लाम या संस्थेचे नूतन अध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील जनता गृहतारण संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून, त्यांना प्रोत्साहन देण्यात जनता सहकारी गृहतारण संस्था नेहमीच अग्रेसर आहे. या संस्थेने १०० कोटी ठेवींचा गाठलेला टप्पा नेत्रदीपक आहे. ही संस्था आजरेकरांचा अभिमान असल्याचे नाईकवाडे म्हणाले.
प्रास्ताविकात संचालक डॉ. अशोक बाचुळकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यानंतर संस्थेचे चेअरमन मारूती मोरे यांच्या हस्ते नाईकवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजराचे सचिव अश्कर लष्करे, खजिनदार हुसेन दरवाजकर, जनता गृहतारणचे मॅनेजर मधुकर खवरे, प – शासन अधिकारी मारूती कुंभार, मुख्याध्यापक सलीम शेख, गडहिंग्लजचे काझी कुटुंबीय उपस्थित होते.

हंदेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी ता. आजरा येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.सुरुवातीला विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीचे पूजन,वीणा पूजन, पताका पूजन, टाळ व पखवाज व गाथा , प्रतिमा, तुळस पूजन झाले.
संपूर्ण धार्मिक विधी ह.भ.प. बाळासाहेब रानमाळे यांनी केला. सायंकाळी हभप सतुराम लोहार व कोरस यांनी हरिपाठ केला.रात्री ह.भ.प. शशिकांत गुरव यांचे कीर्तन झाले.यावेळी कलमेश्वर भजनी मंडळ सांबरे यांनी कीर्तन साथ केली.तर कोळिंद्रे येथील भजनी मंडळाने भजन सादर केले.
गुरुवार दिनांक ९ रोजी सकाळी काला कीर्तन नंतर महाप्रसाद होणार असून सायंकाळी श्री ब्रह्मदेव पालखी सोहळा होणार आहे.तर रात्री सुप्रसिध्द सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार दत्तात्रय पाटील यांना प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घाटकरवाडी येथील कवी दत्तात्रय पाटील यांच्या मन फुलपाखरू या कविता संग्रहास पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट काव्यसंग्रह २०२४ प्रथम क्रमांकचा पुरस्कार देण्यात आला. श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती येते मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापूर्वी मन फुलपाखरू या काव्यसंग्रहास कदंब पुरस्कार २०२४ पुरस्कार प्राप्त आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या कुसुमाग्रज अध्यासनाचा विशाखा काव्य पुरस्कार २०२३ च्या अंतिम फेरीचे नामांकन मिळाले होते. माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर उपस्थित होते. पाटील वन विभागांमध्ये वनपाल म्हणून कार्यरत असून महाराष्ट्र शासनाचे वनसेवेचे सुवर्णपदक त्यांना मिळालेले आहे. वन प्रबोधन, कथा व कविता लेखन, आकाशवाणी कोल्हापूरसाठी त्यांनी लेखन केले आहे तसेच विविध मासिकांमधून त्यांचे लेख व कविता प्रसारीत झालेल्या आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीय, डॉ. अशोक दोरूगडे, मदन देसाई, रवींद्र पवार, संतोष गायकवाड उपस्थित होते. B





