mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि.७ डिसेंबर २०२४              

विधानसभेच्या तिसऱ्या टर्मचा दणक्यात आरोग्यमय शुभारंभ..!

          राधानगरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विधानसभा मतदार संघातील तिसऱ्या टर्मचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मोफत डायलिसीस सेवा केंद्राचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करून करण्यात आला.

      यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले ,राधानगरी शहरामध्ये लवकरच अत्याधुनिक १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करणार आहे.यापुर्वी ग्रामीण भागातील लोकांना डायलेसिससाठी शहरी भागात जावे लागत होते तो त्रास आता संपला असून राधानगरी सारख्या ग्रामीण भागात सर्वप्रकारचे उपचार यापुढे मिळणार आहेत. रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आपुलकी व विश्वास देऊन वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी उपचार करावेत असे आवाहन केले.

      यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख, माजी उपसभापती अरुणराव जाधव, वैद्यकिय अधिक्षक सुनंदा गायकवाड, वैद्यकिय अधिकारी जी.बी.गवळी, आर.एम.कांबळे, डायलेसिस विभाग प्रमुख कार्तिकेयन, तालुका आरोग्य अधिकारी आर.आर.शेट्ये, भाजपा नेते संभाजी आरडे, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजीराव चौगले, विलास रणदिवे, युवा नेते दिपक शेट्टी, प्रा.चंद्ररशेखर कांबळे, राजाराम कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद चौगले, विजयबाबा महाडिक, बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदीप मगदूम, माजी सरपंच विश्वास राऊत, राजू मगदूम, शिवाजीराव चौगले, संग्रामसिंह पाटील, आनिल बडदारे, सुहास निंबाळकर, राम कदम, विलास डवर, संजय पारकर, सचिन पालकर, युवराज पाटील, अभिजीत हुपरीकर, गनी चोचे, माजी सरपंच बशीर राऊत, फारुख नावळेकर, संग्राम पाटील, संजय पाटील, विलास पाटील, ए.बी.पाटील, सुभाष पाटील-मालवेकर, विजय ढेरे, सुनील गुरव, एच.पी.पाटील, मारुती भूगोलकर, सचिन येटाले, युवराज गिरीगोसावी, प्रवीण कोरगावकर, एमडी चौगुले, भिकाजी तोडकर, उमेश जाधव, सिताराम खाडे, यांच्यासह प्रमुख मान्यवर, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

संध्या बहनजी यांचा उद्या अमृतमहोत्सव सोहळा

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या सेवाकेंद्राच्या संचालिका संध्या बहनजी यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उद्या रविवार दि. ८ डिसेंबर २४ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. येथील आण्णाभाऊ सभागृहात होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हाकुमारीच्या पुणे उपविभागाच्या क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी सुनंदा बहनजी असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

     येथील सोमवार पेठेतील संध्या भास्कर पोतदार यांनी आजरा, वारणानगर येथे शिक्षण घेतल्यानंतर शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी घेतली. रसायनशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठात त्या पहिल्या आल्या आणि त्यांनी सुवर्णपदकही पटकावले. नंतर रोझरी हायस्कूल आजरा येथे अध्यापन, गारगोटीला बी.एड. केल्यानंतर त्यांनी आजरा हायस्कूलमध्ये नोकरीस सुरूवात केली.

     रोझरी हायस्कूलमध्ये सेवा करताना त्यांना सेवेचे महत्व समजले आणि त्यांनी आधीच आजऱ्यात सुरू असलेल्या ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या सेवा कार्यास वाहून घेतले. या सेवा कार्यादरम्यान माध्यमिक शिक्षिका म्हणून मिळणारे सर्व वेतन, निवृत्तीनंतरचा सर्व निधी त्यांनी या आजरा केंद्राच्या उभारणीसाठी खर्च केला. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सहकार्याने आजरा, कोवाड, नेसरी इथं केंद्राच्या वास्तू उभारण्यात आल्या असून उत्तूर येथेही वास्तू उभारली जात आहे.

     रविवारी होणाऱ्या या समारंभाला आण्णा भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक चराटी, जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, जनता बॅंकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

महामानवास अभिवादन…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास मानवंदना देण्यासाठी सिद्धार्थ नगर आजरा येथे कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित आजरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शंकर कळकुटे तसेच अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे(भाऊजी )सुधीर बापू कुंभार ,गौरव देशपांडे ,विजय थोरवत ,संतोष भाटले . मंदार बिरजे ,शैलेश पाटील, आनंदा कुंभार, नितीन यादव ,सुरेश कांबळे , भरत कांबळे. सुभाष कांबळे ,प्रकाश कांबळे , सचिन कांबळे , विलास कांबळे यांनी उपस्थितीत राहून मानवंदना दिली.

     बौद्ध वंदनेनंतर कळकुटे यांनी युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावे असे आवाहन केले. तसेच ‘शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हे बाबासाहेबांचे ध्येय डोळ्यासमोर धरून तुम्ही स्पर्धा परीक्षांना सामोरे जा असेही सांगितले.

     सुधीरबापू कुंभार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती नसताना काय शिक्षण केले होते हे लोकांना पटवून दिले. त्यानंतर अमोल कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

     यावेळी जय भीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते अक्षय माळी , श्रीधर कांबळे ,अश्विन कांबळे , गौरव कांबळे , आकाश कांबळे , महेश कांबळे , विशाल कांबळे , उत्तम कांबळे , राजेश कांबळे  उपस्थित होते.

जनता बँकेचा  ‘बँको ब्लु रिबन-२०२४ ‘ पुरस्काराने सन्मान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श व अग्रगण्य बँक जनता बँक, आजरा या बँकेस “बँको ब्लू रिबन” कडून उत्कृष्ट कामकाजाबद्दल बद्दल सन-२०२३-२४ सालचा ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली. सदरचा पुरस्कार हा देशातील सर्व सहकारी बँकामधून बँकाच्या कामाचे मूल्यमापन व प्रगतीचा आढावा घेऊन देण्यात येतो. सर्वसामान्यांची व जनतेच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळख असलेल्या जनता बँकेस आजपर्यंत बँको ब्लू रिबन, बँकिंग फ्रंटीअर, बँक असोसिएशन अशा वेगवेगळ्या संस्थाकडून २१ वेळा उत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले आहे.

      बँकेकडे रु-३८५ कोटीच्या ठेवी, रु-२५५ कोटीचे कर्ज, रु-१५५ कोटीची गुंतवणूक असून, बँकेचा एन.पी.ए. 0% इतका आहे. बँकेकडून नवीन व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेंतर्गत रु.९५ कोटी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उ‌द्योग योजनेंतर्गत रु.१० कोटी इतका कर्जपुरवठा केला आहे, या योजनेंचा लाभ तरुण व होतकरू व्यावसायिकांनी करून घ्यावा, असे आवाहन श्री मुकुंददादा देसाई यांनी केले. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून, २० शाखांमधून बँकेचे कामकाज चालते. बँकेकडे RTGS, NEFT, PHONE PAY, GOOGLE PAY, UPI यासारख्या डिजिटल बँकिंग च्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. सदरचा पुरस्कार म्हणजे ग्राहक सभासदांचा विश्वास, सुयोग्य नियोजन, तत्काळ सेवा, पारदर्शी कारभार, काटकसर आणि संचालक व कर्मचाऱ्यांचे योगदान याचे फलित आहे, असे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी सांगितले.

श्री पार्वती- शंकर संकुलात आविष्कार स्पर्धांचे उद्घाटन

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती -शंकर शैक्षणिक संस्था संचलित बालमंदिर , प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. क्रीडा, शारीरिक क्षमता व चापल्य प्रकटीकरणास सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणारा हा नाविन्यपूर्ण स्पर्धांचा उपक्रम ” आविष्कार “या नावाने घेतला जातो. महोत्सवाचे उद्घाटन आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

     प्रास्ताविकपर मनोगतात  पी .एन .केसरकर यांनी विद्यार्थी खेळाडूंना खेळाचे महत्त्व पटवून दिले. क्रीडाशपथ जी. एन. भांदुगरे यांनी दिली.

      संजय पाटील म्हणाले,” दररोज व्यायाम व खेळ यामुळे आरोग्य टिकून राहते. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना राखीव जागा असतात. मात्र हे खेळाचे नैपुण्य शालेय वयातच बानवा. अभ्यासाबरोबरच खेळातही करिअर घडवा. कोल्हापूर जिल्ह्याला खेळांचा वारसा आहे. खेळ व स्पर्धातून सुदृढ शरीर व समतोल मनाची घडण घडवा. या संस्थेच्या स्पर्धांचे नियोजन कौतुकास्पद आहे.”

      विभाग व राज्यस्तरावर शानदार कामगिरी केल्याबद्दल कु. अनघा पाटील , कु.नव्या देवर्डे, कु. अद्विका पाटील यांचा पुष्प देऊन पीएसआय यांनी गुणगौरव केला. तसेच मास्टरस्ट्रोक चित्रकला स्पर्धेतील यशवंत कु.धनश्री पाटील ,ओंकार चव्हाण ,श्री चव्हाण, केदार पाटील, चैतन्य कुंभार, आयेशा चव्हाण यांना बक्षीस वितरण करण्यात आले .

      यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथ करंबळी, सचिव सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही.एम. पाकले , प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, विनायक करंबळी यांच्यासह क्रीडाशिक्षक बी. बी.पाटील, व्ही. एस.नाईक व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता
नारायण पाटील

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कोरीवडे येथील नारायण गोविंद पाटील (वय ९७ वर्षे ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूचना नातवंडे असा परीवार आहे. ग्रामपंचायत माजी सदस्य बाबूराव पाटील व चंदगडचे वनसेवक शांताराम पाटील यांचे ते वडील होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील आजच्या ठळक घडामोडी

mrityunjay mahanews

२३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला… आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews
error: Content is protected !!