सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४

विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला गृहीत धरू नका…
पत्रकार बैठकीत प्रमुख मुस्लिम नेत्यांची भूमिका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुस्लिम समाजाच्या प्रश्नांकडे गेली २० वर्षे लोकप्रतिनिधींकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. मुस्लिम समाजाच्या व्होट बँकेचा वापर करून अनेकजण मोठे झाले. कोणत्याही प्रकारचा भरीव निधी गेल्या वीस वर्षात मुस्लिम वस्त्यांसह मुस्लिम समाज सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला नाही. मुस्लिम समाजाकडे केवळ व्होट बँक म्हणून पाहणाऱ्या मंडळींनी यापुढे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी असल्याचा गैरसमज करून घेऊ नये. सात हजार मतांचा निर्णायक गठ्ठा असणाऱ्या आजरा शहरातील या समाजाच्या पदरी आजतागायत उपेक्षाच आली आहे. आम्हाला आता शाश्वत विकासाची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये याकरिता जो बांधील राहील त्याच्याबाबत समाज विचार करेल असे स्पष्ट मत मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केले. बैठकीमध्ये भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर चाॅंद,ॲड. जावेद दिडबाग, अबुलास दरवाजकर, जवाहर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रियाज तकिलदार, आजरा साखर कारखान्याचे संचालक रशीद पठाण यांनी भूमिका स्पष्ट केली .
शाळा,मशिदी, मदरसे, ठीकठिकाणच्या वस्त्यांमधील रस्ते, गटर्स याकडे दुर्लक्षच आहे. मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. एक रुपयाचा निधीही समाजाला दिला नाही. कधी तुमच्या समाजाला अध्यक्ष नाही असे सांगून तर कधी तुमच्या संस्था न्यायप्रविष्ठ आहेत, समाजाच्या विकास कामांकरिता जागा उपलब्ध नाहीत असे सांगून केवळ समाजाची पिळवणूक करून समाजाला गृहीत धरून समाजाचा वापर करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत मात्र समाजापुढील प्रश्न सोडविण्याची हमी देणाऱ्याबाबतच विचार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महम्मदगौस तकीलदार, जवाहर पतसंस्थेचे अध्यक्ष इकबाल शेख, झाकीर लमतुरे, असलम आगलावे, फैजुल्ला लतीफ, इसाक शेख, सादिक चाॅंद, आलम तकिलदार, निहालअहंमद तकिलदार , आशपाक हेरेकर यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
नेत्यांच्या ग्रुपवर मुस्लिम समाजाचा अनादर…
लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया ग्रुप वर मुस्लिम समाजाविषयी वेळोवेळी अपशब्द व चुकीची माहिती प्रसारित करून समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले जात आहे. लोकप्रतिनिधींकडून संबंधितांना याविषयी समज दिली जात नाही याचा अर्थ काय ? असा सवाल यावेळी करण्यात आला. समाजातील एक-दोघांना सोबत घेऊन फोटोसेशन केले म्हणजे संपूर्ण समाज पाठीशी आहे असा गैरसमज नेत्यांनी कदापिही करून घेऊ नये असेही यावेळी सांगण्यात आले.

पाऊस उभा…
पिकांसह शेतकरी आडवाढगफुटी सदृश्य पावसाने तालुकावासीय हादरले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह काल रविवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसामुळे केवळ शेतातील पिकेच नव्हे तर शेतकरीही आर्थिक दृष्ट्या आडवा झाला असून पावसाच्या या अवकाळी हजेरीने तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गेले आठ दिवस सकाळ- संध्याकाळ पाऊस वारंवार हजेरी लावत आहे. जोरदार पावसामुळे पिकांचे मात्र प्रचंड नुकसान सुरू आहे. दररोजच्या पावसामुळे भात पिकासह नाचणा, भुईमूग हि पिके अडचणीत आली असून शेत जमिनीमध्ये पाणीच पाणी दिसू लागले आहे. भात उत्पादक शेतकरी मात्र पूर्णपणे कोलमडून गेला आहे.
नुकसानग्रस्त शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून पीक नुकसान भरपाई देण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हालचाली कराव्यात अशी मागणी आता पुढे येत आहे.

आजरा ब्राह्मण विकास मंडळाची कोजागिरी उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ब्राह्मण बांधवांनी एकत्र येऊन कोजागिरी उत्सव साजरा केला.
समाजातील जेष्ठ व्यक्ती प्रा. विजय बांदेकर, राम कामत, मनोहर गव्हाणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. आठ दहा वर्षाच्या मुलांनी अवघड स्तोत्रे पठण करून उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. समाजात उत्कृष्ट काम करणारे गौरव देशपांडे, शैलेश बांदेकर , डॉ. संदीप देशपांडे, विजय नूलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विशेष प्राविण्य परीक्षेत यश मिळवल्याबद्दल समाजातील विद्यार्थ्यांचे सत्कारही झाले. विद्यार्थ्यांना डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.ज्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाले आहे अशा कुटुंबांचे, अमृत महोत्सवी ज्येष्ठांचे विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठांच्या वतीने विजय बांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी निपाणीचे ब्राह्मण सभेचे कार्यकर्ते अभय मानवी व पिंपळगावचे डॉ .विनायक
परुळेकर, समाजाचे अध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर, गजानन पतसंस्थेचे चेअरमन जयवंत केळकर, श्रीपाद कुलकर्णी, सोमनाथ भातखंडे, चेतना केळकर,माधवीका जोशी, पूर्वा आपटे, वंदना देशपांडे, गौतम देशपांडे यांच्यासह ब्राह्मण बांधव उपस्थित होते.डॉ. अंजनी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मिलिंद आपटे यांनी आभार मानले.
सौ. स्मिता गव्हाणकर व श्रद्धा वाटवे यांच्या पसायदान सादरीकरणाने सांगता झाली.

निधन वार्ता
आनंदीबाई जाधव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डेपैकी माद्याळ ता. आजरा येथील आनंदीबाई धोंडीबा जाधव ( वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. एम्.डी. इलेक्ट्रीकल्सचे मालक एम्. डी. जाधव यांच्या मातोश्री होत.रक्षा विसर्जन म़ंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.
चिमणे येथे देशी दारू बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चिमणे ता. आजरा येथे बेकायदेशीररित्या आठ हजार रुपये किमतीची देशी दारू चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र पाटील व अन्य एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी दीपक सुभाना किल्लेदार यांनी आजरा पोलिसात फिर्यादी दिली असून पोलिसांनी विक्रीच्या उद्देशाने आणलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पावणेतीन कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त!

बेळगाव
मालवाहू वाहनातून नेण्यात येणारी २ कोटी ७३ लाख २७ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन या रकमेबाबत विचारणा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी माळमारुती परिसरात सीसीबीने ही कारवाई केली.
सांगलीहून हुबळीकडे जाणार्या एका मालवाहू वाहनातून मोठी रक्कम नेली जात असल्याची माहिती सीसीबीच्या पथकाला मिळाली. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांनी सहकार्यांसह सापळा रचून हे वाहन अडवले. यावेळी वाहनात मोठ्या रकमेची बॅग सापडली. ती ताब्यात घेऊन यातील रक्कम मोजली असता ती तब्बल पावणेतीन कोटींची असल्याचे आढळून आले.
जप्त केलेल्या नोटांमध्ये ५००,२०० व १०० रू. मूल्याच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी सचिन मेनकुदळी व मारुती मारगुडे (दोघेही रा. सांगली) यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम कोठून कुठे नेली जात होती व कशासाठी नेली जात होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही रक्कम वाहून नेण्यासाठी वाहनाच्या केबीनमध्ये काही बदल केल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे इतकी मोठी बेहिशेबी रक्कम नेण्यामागील गुढ पोलिसांकडून उकलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिस खात्याने प्राप्तीकर विभागाला माहिती कळवली असून अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेतील मालवाहू टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. माळमारुती पोलिसांत नोंद झाली आहे.
हवालाची रक्कम ?
ही रक्कम नेमकी कशाची आहे, याबाबत पोलिस स्पष्टरीत्या सांगताना दिसत नाहीत. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हवालाची रक्कम असल्याचे सांगण्यात येते. सांगलीतून नेमकी कोणी पाठवली, त्याचे नाव संबंधित दोघांना पोलिसांना दिले आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
(viral news…online news)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



