mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


भर पावसात बाजारपेठ हाउसफुल्ल…
बाप्पांचे आगमन काही तासांवर…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बाप्पांचे आगमन अवघ्या काही तासावर येऊन ठेपले असतानाच पावसानेही जोरदार हजेरी लावण्यास सुरू केली आहे. जोरदार पाऊस सुरू असून देखील बाप्पांच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजरा बाजारपेठ हाऊसफुल झाल्याचे चित्र दिसत आहे.

सजावटीचे साहित्य, फळे, आतषबाजीचे साहित्य, विद्युत रोषणाई करता लागणारे साहित्य खरेदीकडे भक्त मंडळींचा कल दिसत असून साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी होताना दिसत आहे.

    पावसाच्या सरी मात्र अधून मधून कोसळतच असून पावसाचा या व्यत्ययाला न जुमानता बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे.

लाडक्या बहिणींची लगबग

     गणेशोत्सवाच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून दिले जाणारे पैसे हातात आल्याने लाडक्या बहिणींची गर्दीही बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषत: कपड्यांसह सौंदर्य प्रसाधने खरेदीला लाडक्या बहिणींकडून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे.

आजरा नगरपंचायतीचे कर्मचारी बेमुदत संपावर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग अधिकारी व स्थानिक कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यावतीने बेमुदत संप करण्यात आला आहे.

      आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी बेमुदत संप पुकारला असून नगरपंचायतीच्यासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आजरा नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये जुनी पेन्शन, एन. पी. एस, यु. पी. एस लागू करून तात्काळ अंमलबजावणी करणे, न.प कर्मचारी यांना यांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, आगाऊ वेतन अनुदान एक महिना अगोदर देणे, सेवानिवृत्ती वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश सहायक अनुदान मध्ये करण्यात यावा यासारख्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोकाट कुत्र्यांची धरपकड आणि गावगोंधळ…

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरांमध्ये वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित केले आहे.

      या पथकातील मंडळींकडून सुमारे ६७ कुत्र्यांची धडपकड करण्यात आली परंतु स्थानिक तरुणांचा कुत्री पकडत असताना होणारा गोंधळ व आरडाओरडा यामुळे अनेक कुत्री या पथकाच्या हाती लागली नाहीत.

    या व्यत्ययामुळे केवळ एकच दिवस मोहीम राबवून संबंधित मंडळींनी आजरा शहरातून काढता पाय घेतला. पुन्हा एक वेळ शहरभर मोकाट कुत्री फिरताना दिसत आहेत.

पं.दिनदयाळ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पंडित दीनदयाळ विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक भिकाजी पाटील यांच्या हस्ते या दोन थोर विभूतींच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

       तसेच संस्थेचे संचालक भिकाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री रवळनाथ विकास सेवा संस्था, वाटंगीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      वाटंगी येथील श्री रवळनाथ विकासा सेवा संस्थेची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सभेच्या सुरुवातीला श्री एकनाथ गिलबिले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला त्यानंतर सेवा संस्थेचे चेअरमन विजयराव देसाई यांनी प्रास्ताविक केले व संस्थेच्या आर्थिक कामकाजाचा आढावा घेतला.

    अहवाल वाचन सचिव सुभाष चौगुले यांनी केले .यावेळी चेअरमन विजयराव देसाई यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेला दोन लाख ८८ हजारांचा नफा झाल्याचे सांगितले. सभासदांना ८८ लाख ७३ हजार कर्ज वाटप केले असल्याचे सांगून संस्थेच्या सभासदांना चार टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला .यावेळी उपस्थित सर्व सभासदानी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी एकनाथ कृष्णा गिलबिले. शिवाजी तुकाराम नांदवडेकर ,उत्तम जाधव, बाबुराव नार्वेकर. शिवाजी नांदवडेकर  ,दत्ता कुंभार ,विठ्ठल बिरजे ,गणपती नाईक ,सौ.रेखाताई देसाई, सौ .श्रीमंता गाईंगडे उपस्थित होते.

      आभार एकनाथ गिलबिले यांनी मानले.

रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला ३७ लाख ४६ हजारांचा निव्वळ नफा : देसाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३७ लाख ४६ हजार ३१७ इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मारूती देसाई यांनी दिली संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

प्रास्ताविकात चेअरमन देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेमार्फत सभासदांना व ठेवीदारांना एन. इ. एफ. टी. आर. टी. जी. एस, क्युआर कोड, एस. एम. एस सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

     मॅनेजर विजय पत्ताडे यांनी विषय व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. यानंतर विविध सभासदांच्या पाल्यांचा, सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सभेला व्हा. चेअरमन संजय बागडी यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.


 

 

संबंधित पोस्ट

एक मराठा… कोटी मराठा…

mrityunjay mahanews

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

आंबोलीत ‘मुसळ’धार … आजऱ्यात ‘कोसळ’धार …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!