
धक्कादायक आणि लाजिरवाणेही…
अल्पवयीन भावाचा प्रताप उघडकीस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चार दिवसापूर्वी किणे पंचक्रोशीतील एका अल्पवयीन, मतिमंद मुलीवर केलेल्या अत्याचारातून तिला दिवस गेले असल्याची घटना उघडकीस आली होती. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे याप्रकरणी धाव घेतल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. मुलगी मतिमंद असल्याने पुरेशी माहिती मिळू न शकल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला होता.
गेल्या दोन दिवसांमध्ये केलेल्या तपासातून सदर प्रकरणास पीडित मुलीचा अल्पवयीन शाळकरी भाऊ जबाबदार असल्याचे पुढे आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. लहान भावाकडून घडलेल्या या प्रतापामुळे मोबाईलच्या युगामुळे समाज व कुटुंब व्यवस्था भरकटत चालली असल्याचेही समोर येत आहे.

आजरा अर्बनच्या बँकेच्या ३५ व्या शाखेचा उद्या शुभारंभ..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेड्युल्ड दर्जाकडे वाटचाल करीत असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचे स्वमालकीच्या जागेत उद्या गुरुवार (दि. २५ जुलै) रोजी सकाळी ॲड. लुईस शहा यांचे हस्ते व डॉ. महेश कदम (विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग) यांचे प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश कुरूणकर यांनी दिली.
आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा येथील आजरा अर्बन बँकेची (मल्टीस्टेट) वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेने १५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. आधुनिक बैंकिंगसाठी जे पर्याय व्यावसायिक बँकेकडे उपलब्ध आहे असे सर्व पर्याय या बँकेकडे उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व सवलतीच्या योजना बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. या आर्थिक वर्षात बँकेला ३ नवीन शाखा उघडण्याचा परवाना बँकेस प्राप्त झाला असून त्याप्रमाणे कर्नाटक राज्यात बेळगुंदी येथे शाखा उघडण्यात आली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील व्यवसाय, उद्योग आणि नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे तत्व संस्थापक स्व. काशिनाथ चराटी (अण्णा) आणि स्व. माधवराव देशपांडे (भाऊ) यांनी विचारात घेतले होते. याच विचारांचा पाठपुरावा करत बँकेची वाटचाल सुरू असल्याचे कुरूणकर यांनी सांगून सदर उद्घाटन कार्यक्रमास बँकेचे सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुनिल मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, ॲड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर उपस्थित होते.

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी शिवसेना आक्रमक....

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना (उ.बा.ठा.) गटातर्फे आग्रा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवसैनिक घोषणा देत नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर जाऊन धडकले. यावेळी शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या, आरोग्याचे निर्माण झालेले प्रश्न, रस्त्यावर पडलेले खड्डे, पाणीपुरवठ्याच्या गळत्या याबाबत संभाजी पाटील, दयानंद भोपळे, समीर चांद यांनी आक्रमक भूमिका मांडली. नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाच्या वतीने या बाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी ओंकार माद्याळकर, शिवसैनिक चंद्रकांत कोरगावकर, महेश पाटील, शंकर पाटील, अभिजित मनगूतकर, रोहन गिरी, रवी यादव, राजेंद्र बंडगर, भिकाजी विभूते, सौरभ पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये ‘गुरुपौर्णिमा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी तयार केलेले पुष्पगुच्छ व भेट कार्ड देऊन शिक्षकांना गौरवण्यात आले.
श्री.प्रशांत गुरव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यास यांच्या जीवनापासून सुरू असणारी ही गुरु- शिष्य परंपरा विविध उदाहरणे व दाखले देऊन उलगडून दाखविली.
पुष्पगुच्छ तयार करण्याच्या स्पर्धेत सृष्टी नाईक, नियती मटकर, कुणाल माने, तन्मय पाटील, बेबीआयेशा तगारे यांनी क्रमांक पटकाविले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंशुमन भोसले, ईशान मोटे,कार्तिक हुबळे, कल्पक सुतार, यशराज कुंभार,सृष्टी नाईक, रिया देशमुख,शलाका गिरी, ऋषा देसाई, माधवी आजगेकर, कृष्णा दावणे, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले.कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक माजी प्राचार्य सुनील देसाई, सचिन शिंपी उपस्थित होते. प्राचार्य आर. जी. कुंभार व पर्यवेक्षिका व्ही.जे. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता
जानू पोवार

रवळनाथ कॉलनी आजारा येथील माजी सैनिक जानू अण्णाप्पा पोवार (वय ७० वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांचे ते चुलते होत.
रक्षाविसर्जन मूळ गाव देऊळवाडी येथे उद्या गुरुवारी सकाळी आहे.
पाऊस पाणी
चित्री प्रकल्प तुडुंब…

आजरा गडहिंग्लज तालुक्याला तालुक्याला वरदान असणारा चित्री मध्यम प्रकल्पात पूर्ण क्षमतेने १०० % पाणीसाठा झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.उचंगी प्रकल्प ९५.३४% इतका भरला आहे .
गेल्या २४ तासांमध्ये आजरा शहर व आजारा मंडळ परिसरात ८८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून आज अखेर(दि.२४) एकूण १४८६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. साळगाव बंधाऱ्यावरील वाहतूक अद्यापही बंद असून भडगाव पुलावर पाणी आल्याने रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक आजरा मार्गे सुरू होती.

