
भारताला विश्वगुरू बनवू पाहणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पाठीशी रहा : खासदार धनंजय महाडिक
आजरा येथे भाजपाचा मेळावा

आजरा: प्रतिनिधी
रस्ता, वीज, पाणी देणार अशी साठ वर्ष वल्गना करून काँग्रेस पक्षाने देशाची सत्ता केली. त्यांना म्हणून गरीबी हटवता आली नाही. पण गत दहा वर्षात विविध विकास कामे व सर्वसामान्यांसाठी योजना राबवून देशातील २५ कोटी जनता दारिद्रय रेषेच्या बाहेर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते भारत देशाला विश्वगुरु करू पहात आहेत. त्यांच्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन खा. धनंजय महाडिक यांनी केले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी खासदार महाडिक यांनी मार्गदर्शन केले. माजी राज्यमंत्री भरमू पाटील अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे, संग्रामसिंह कुपेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी प्रमुख उपस्थित होते.
अशोकअण्णा चराटी यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गोची कशी होते हे सांगीतले. नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आवाहन केले.
खा. महाडिक म्हणाले, राममंदिरासाठी उद्घाटनाचे निमंत्रण असताना काँग्रेसचा नेता उपस्थित राहीला नाही. काँग्रेस हिंदूद्वेषाचे राजकारण करीत आहे. साठ वर्ष सत्ता हातात असलेल्यांना गरीबी दूर करता आली नाही. भाजपने दहा वर्षांच्या काळात जनतेच्या हिताचे राजकारण केले. श्री. घाटगे म्हणाले, चराटी यांनी मांडलेली व्यथा समजू शकतो. पण देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करूया.

माजी राज्यमंत्री श्री. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचे भाषण झाले. यावेळी तालुकाध्यक्ष अनिरुध्द केसरकर, डॉ.अनिल देशपांडे, डॉ.दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, रमेश कुरुणकर, सुरेश डांग, जनार्दन निऊंगरे, जनार्दन टोपले,कृष्णा येसणे, जी. एम. पाटील, राजू पोतनीस, संदिप पाटील, , सुनिता रेडेकर, ज्योत्स्ना चराटी, वर्षा बागडी, दशरथ अमृते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन तर पांडुरंग लोंढे यांनी आभार मानले.
आमचे उमेदवार राजेच…….!
लोकसभा असू देत किंवा विधानसभा आमचे उमेदवार राजेच असतील असे श्री. चराटी यांनी भाषणात सांगताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
पालकमंत्र्याचा त्रास होतोय…..!
सद्यस्थितीला मला तुमच्या पालकमंत्र्याचा त्रास होतोय. असे विधान श्री. चराटी यांनी खासदार महाडिक यांच्याकडे पाहून केले. जिल्हा बँक व कारखान्याच्या निवडणूकीत पालकमंत्री त्यांनी कसा त्रास दिला याचा पाढा श्री. चराटींनी भाषणात वाचून दाखवला.
तर कोणाची बिशाद नव्हती…
आजरा कारखाना निवडणुकीत आमच्या पॅनेलचा पराभव झाला. दीड हजार मतदान बोगस झाले. यापाठीमागे कोणाचा आशिर्वाद होता हे सांगायला नको. हे घडले असतं तर कोणाचीही आमच्याशी लढण्याची बिशाद नव्हती असा टोलाही श्री. चराटी यांनी लगावला.

…अन्यथा आंदोलन करणार-संग्राम सावंत

आजरा: प्रतिनिधी
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील विविध मागण्या करण्यात आल्या असून अपंगांच्या बाबतीतील प्रश्न सोडवा अन्यथा आजरा पंचायत समिती कार्यालयासमोर असा इशारा ही देण्यात आला आहे.
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी आपण दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत आपण लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करायला हवी आहे.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील अपंगांना/दिव्यांगांच्या पेन्शनची रक्कम वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, सरसकट अपंगांना दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळावे,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सन २०१४-१५ व २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला ५ % राखीव निधी त्याचा ताबडतोब अनुशेषासह परिपूर्ण विनीयोग झालाच पाहिजे. तसेच दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप केला पाहिजे,प्रत्येक ग्रामपंचायतीने घरफाळ्मयाध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला आहे. ती सवलत दिली पाहिजे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे
वरील मागण्यांच्या यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली नाहीत तर आंदोलन करणार आहोत.असा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मुक्ती संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष संग्राम सावंत,रूझाय डिसोझा,संजय डोंगरे, आबुहुसेन माणगावकर,अहमद नेसरीकर, सुलेमान दरवाजकर,आसिफ मुजावर, व इतर दिव्यांग अपंग बांधव उपस्थित होते.

चाफवडे येथे सगुण व निर्गुण भक्तीचा संगम सोहळा

आजरा: प्रतिनिधी
अवघ्या चार वर्षात गावकऱ्यांनी निर्माण केलेल्या नविन चाफवडे येथे संत निरंकारी भवन व श्री गणेश मंदिर या वास्तूंची निर्मिती करण्यात आली.धार्मिक व आध्यात्मिक अशा वातावरणात निर्गुण व सगुण भक्तीचा सोहळा पार पडला.
एक वर्षांत संत निरंकारी मिशनद्वारे सुसज्ज असे सत्संग भवन व लोकसहभागातून सहा महिन्यांत श्री गणेश मंदिर चे बांधकाम करण्यात आले. “निराकार परमात्म्याचा साक्षात्कार करून मानव जातीचे कल्याण करणे” हे उद्दिष्ट ठेवून निरंकारी मिशन कार्य करते. नविन चाफवडे ग्रामस्थांनी संत निरंकारी भवन बांधकाम साठी २० गुंठे जमीन विनामूल्य बहाल केली. त्या मध्ये निरंकारी मिशन (नवी दिल्ली) द्वारे एक वर्षांत सुसज्ज असे अध्यात्मिक भवन बांधण्यात आले.
सुखदेव सिंह , श्री अमरलाल निरंकारी, श्री शहाजी पाटील, भिकाजी पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. गणेश मुर्ती प्राण प्रतिष्ठा व मंदिर च्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी विविध गावची एकूण २१ भजनी मंडळे उपस्थित होती. नित्य हरिपाठ,भजन, कीर्तन, दिंडी सोहळ्या सह दोन वेळची भोजन व्यवस्था करण्यात आली. सदर कार्यक्रमास आमदार राजेश पाटील , अशोकआण्णा चराटी, डॉ.अनिल देशपांडे, अभयसिंह देसाई यांच्यासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली.
एक आठवडा चाललेल्या या कार्यक्रमात गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळींनी सहभाग घेऊन सेवाभाव वृत्तीने दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडले. सदर कार्यक्रमांचे नियोजन श्री पांडुरंग धडाम यांनी केले.

सिरसंगी येथील वटवृक्ष पहाण्याकरता कॅनडाच्या मान्यवरांची हजेरी

आजरा: प्रतिनिधी
सिरसंगी ता. आजरा येथील गोठण देव परिसरातील सुप्रसिद्ध व महाकाय असा वटवृक्ष पाहण्यासाठी कॅनडा येथील जेनी बॅरेल,यूकेचे व्यवस्थापकीय संचालक.
फिलिप व्हॅन वासेंजर प्रधान सल्लागार अर्बन फॉरेस्ट सोल्युशन्स यांच्यासहवैभव राजे “संचालक, वृक्ष संगोपन अमेटी असोसिएशन आधी मी भेट दिली यावेळी स्थानिक सरपंच संदीप चौगले, पत्रकार रणजीत कालेकर ग्रामपंचायत सदस्य व सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग व गटर्स करा… अन्यथा रास्ता रोको
मडीलगे ग्रामपंचायतीचा इशारा

आजरा : प्रतिनिधी
नव्याने काम सुरू असणाऱ्या संकेश्वर- बांदा महामार्गावर मडिलगे हे गाव रस्त्यालगत असून या गावाची रचना रस्त्यापासून उंचीवर असल्याने गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गाशेजारी आरसीसी गटर व गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याकरिता मोरी बांधकाम मंजूर करून मिळावे अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करतील अशा इशारा देण्यात आला असून याबाबतचे पत्र आजरा भुदरगड च्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवड…
डॉ.दीपक सातोसकर

आजरा येथील डॉ.दीपक सातोसकर यांची भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेल कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. डॉक्टर सातोसकर हे येथील आजरा अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, जनता शिक्षण संस्थेचे संचालक आहेत.



