mrityunjaymahanews
अन्य

वाजले की बारा…

वाजले की बारा

आजऱ्याचा राजकीय पटलावर सावळा गोंधळ…

 

(ज्योतिप्रसाद सावंत)

अनपेक्षित व धक्कादायक अशा राज्यात सुरू असलेल्या घडामोडीमुळे आजरा तालुक्यातील शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीसह भाजपा कार्यकर्त्यांनाही धक्का बसला असून केवळ राष्ट्रवादीच नाही तर आता सर्वांनाच ‘वाजले की बारा…’ म्हणण्याची वेळ आली आहे.

वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेबरोबर राहून त्यांच्या प्रति असणारी निष्ठा दाखवून दिली. वर्षभरामध्ये शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाची निवडही झाली नाही अथवा कोणी तसे प्रयत्नही केले नाहीत. विद्यमान आमदार शिंदे गटासोबत असले तरीही मूळ शिवसेनेत अनेक मंडळींशी त्यांचे असणारे संबंध आजही सलोख्याचे राहिले आहेत. शिवसेनेतील या फुटीचा अप्रत्यक्ष फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. भाजपा – शिंदे सेना सरकार स्थापनेनंतर गेले वर्षभर भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच धारेवर धरले. भाजपाच्या या संदेशाद्वारे वारंवार मुश्रिफ यांना लक्ष्य बनवले जात होते. भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपाचे नेते व मुश्रीफ यांच्यातील संघर्ष तालुक्यासह जिल्हावासीयांनी वेळोवेळी अनुभवला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील उत्तूर भागातील भाजपाच्या प्रमुख मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही.

तालुक्यातील राष्ट्रवादीची बहुतांशी मंडळी मुश्रीफ यांचे नेतृत्व मानणारी असल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपातील संबंध ताणले गेले होते.

समोर असणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत व आजरा साखर कारखाना या निवडणुकीला मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व राष्ट्रवादी विरोधातील मंडळीसमोर नेटाने उभे राहण्याची तयारी सुरू असतानाच राज्यात धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपा – शिंदे गट विरोधात राष्ट्रवादी व मित्र पक्ष असाच सामना होणार होता. आता या निर्णयाने निवडणुकीतील हवाच निघून गेली आहे.

एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादीच्या घड्याळात बारा वाजल्यानंतर आजरा तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग ही अनेकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तालुक्यातील समरजीतसिंह घाटगे, शिवाजीराव पाटील, प्रकाशराव बेलवाडे, विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली असली तरी नवीन राजकीय  समीकरणे उदयास येऊ लागली आहेत.

या नवीन समीकरणामुळे तालुक्याच्या राजकारणात सावळा गोंधळ निर्माण झाला असून हा गोंधळ देखील काही मंडळींच्या पथ्यावर पडणार आहे. अनेकांचा जिल्हा परिषदेसह, नगरपंचायत व आजरा साखर कारखान्यात प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग सुखकर होणार आहे असे दिसू लागले आहे हे निश्चित…

आमदार आबिटकर पुन्हा ‘ होल्ड’ वर...

भाजपा – शिंदे सरकार स्थापनेनंतर आमदार प्रकाश आबिटकर या जिल्ह्यातील एकमेव शिंदे गटाच्या/शिवसेनेच्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार अशी गेले वर्षभर चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीच्या सत्तेतील समावेशामुळे पुन्हा एकदा आबिटकर यांचे मंत्रीपद ‘ होल्ड ‘ वर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

चालू घडामोडीची आ. राजेश पाटील यांना यापूर्वीच माहिती…?

काल घडलेल्या राजकीय घडामोडींची आ. राजेश पाटील यांना यापूर्वीच माहिती होती असेही आता सांगितले जात आहे. म्हणूनच आ. पाटील यांनी आपल्या वाढदिनी अजितदादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय पुढचे वाढदिवस करणार नाही, असे जाहीर केले होते. पुढच्या राजकीय घडामोडींची कुणकुण आ. पाटील यांना असल्यानेच त्यांनी हा दावा केला होता असेही बोलले जात आहे.

मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्ते सुखावले…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे गेले वर्षभर इडी, आयकर विभाग व इतर विभागांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर दिसू लागला होता. कार्यकर्ते अस्वस्थ असतानाच राज्यात नाट्यमय घटना घडून पुन्हा मुश्रीफ यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते निश्चितच सुखावले आहेत.

                         …………….

🔴 स्लिपर बसेस म्हणजे धावत्या शवपेट्या ! अपघातात २६ जणांना जिवंत जळल्यानंतर तज्ञ असे का म्हणाले ? वाचा.

♦️बुलडाण्यात झालेल्या भीषण बस अपघातानंतर स्लीपर बसच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बसची बॉडी बनवणाऱ्या डिझायनर्सनी आता स्लीपर बस बनवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी स्लीपर बसेसला फिरती शवपेटी देखील म्हटले आहे.

बुलढाणा बस अपघातात २६ जणांचा जळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य परिवहनसाठी एसी बसेस बनवणारे रवी महांदळे यांच्या म्हणण्यानुसार, स्लीपर बसमध्ये प्रवासी बसवले जातात मात्र त्यांना आतमध्ये पुरेशी जागा मिळत नाही. हातपाय हलवणेही अवघड झाले आहे.

अशा बसेस आठ ते नऊ फूट उंचीच्या असतात. अशा परिस्थितीत ती अचानक एका बाजूला वाकल्याने प्रवाशांना इमर्जन्सी गेटपर्यंत पोहोचणे कठीण होते. अपघातादरम्यान एवढ्या उंचीवर चढणे आणि बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवणेही खूप अवघड असते.

स्लीपर बसचे उत्पादन बंद करावे, अशी मागणी करणारे रवी महांदळे यांनी परिवहन मंत्रालयाला अनेक पत्रे लिहिली आहेत. मात्र, दुर्दैवाने अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी सांगितले की स्लीपर बस भारत आणि पाकिस्तान वगळता कुठेही धावत नाहीत.

दुसरीकडे पुणे शहरातील वाहतूक विभाग आता अशा बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरू करणार आहे. याशिवाय महामार्गावरील वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. अतिवेग हे देखील अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे त्यांचे मत आहे.

सद्यस्थितीत समृद्धी महामार्गावर ताशी १२० किमी वेग आहे, तर ताशी १०० किमी वेगाने वाहनाचा समतोल कसा साधावा हे आपल्याला कळते की नाही हे दाखविणे आवश्यक आहे. अपघात पाहता महामार्गावरील वेगमर्यादेबाबत शासनाने कठोर पावले उचलावीत. तसेच अनेकवेळा महामार्गावर लांबपर्यंत कोणतेही वळण  नसल्याने वाहन चालवताना झोप लागण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे अनेक अपघात होतात.
                          ……..

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजच्या ठळक बातम्या

mrityunjay mahanews

आंबोलीत ‘मुसळ’धार … आजऱ्यात ‘कोसळ’धार …

mrityunjay mahanews

पंधरा वर्षीय मुलीचे आज-यातून अपहरण… मडिलगे येथील एकाचा मुंबईत अपघाती मृत्यू…

mrityunjay mahanews

अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी: आज-यात जि. प. उपाध्यक्ष शिंपी यांची मागणी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!