




चंदगड संघाप्रमाणे आजरा तालुका खरेदी – विक्री संघाला वैभव प्राप्त करून देणार : जयवंतराव शिंपी

आजरा तालुक्याशेजारील चंदगड तालुका खरेदी – विक्री संघ हा तुलनेने अतिशय जोमात सुरू आहे. नियोजनबद्ध कारभार केल्यामुळे या संघाची नेहमीच प्रगती राहिली आहे. असे असताना प्रचंड उलाढाल असूनही आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या कारभाऱ्यांनी मात्र नवे उपक्रम, सभासदांकरिता नव्या योजना व उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न केले नसल्याने याचा परिणाम संघाच्या नफ्यावर होत असून अप्रत्यक्षरीत्या भाग भांडवलधारक शेतकरी सभासदांनाही याचा फटका बसत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने आजरा तालुका खरेदी – विक्री संघालाही चंदगड तालुका खरेदी विक्री संघाप्रमाणे वैभव प्राप्त करून देण्यास श्री रवळनाथ शेतकरी परिवर्तन विकास आघाडी बांधील आहे, असे प्रतिपादन आघाडी प्रमुख जयवंतराव शिंपी यांनी केले.
यावेळी शिंपी म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी तालुका खरेदी – विक्री संघाच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संघाकडून तयार होणाऱ्या खताचीही उलाढाल मोठया प्रमाणात होत आहे. असे असतानाही संघाला घसघशीत नफा का होऊ शकत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे.
तालुका खरेदी – विक्री संघाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची खते, बी बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याबरोबरच तालुका खरेदी विक्री संघामार्फत पेट्रोल- डिझेल पंप, सुपर बजार, औषधालय इत्यादी सुरू करण्याची संधी असून यासाठी निश्चितच परिवर्तन विकास आघाडीचा प्रयत्न राहील.
वास्तविक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपला सुरुवातीपासून प्रामाणिक प्रयत्न होता. तशा प्राथमिक चर्चाही सुरू होत्या. पण काही हेकेखोर मंडळींनी ‘आपण म्हणेल ती पूर्व’ असे धोरण ठेवत निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक प्रक्रिया कशी होईल यासाठीच प्रयत्न सुरू ठेवला. यामुळे संघावर नाहक २५ ते ३० लाख रुपयांचा निवडणूक खर्चाचा बोजा पडणार आहे. याला सर्वस्वी सत्ताधारी मंडळींच जबाबदार आहेत.
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, यांच्यासह गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, जि. प. सदस्या सौ. सुनिता रेडेकर, राजेंद्र सावंत, उत्तुर विभागातील प्रमुख मंडळी, शिंपी – चराटी गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रचाराचे रान उठवून सभासदांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सत्ताधाऱ्यांमधील अनेक नाराज मंडळी आपल्या सोबत असल्याने निवडणूक निकाल आपल्याच बाजूने असेल असा विश्वास शिंपी यांनी व्यक्त केला.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांच्यासह प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती.

पेरणोली येथील रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

पेरणोली येथील श्री रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीच्या रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला रॅलीमध्ये अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी माजी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोविंद गुरव, हरिबा कांबळे, राजू सावंत, तानाजी देसाई, अनिरुद्ध केसरकर, जनार्दन टोपले, उत्तम देसाई,अमृत देसाई, दीपक देसाई, सौ. मनीषा गुरव, एस. पी. कांबळे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



