
आजरा पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा नोंद
व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरण

तस्करीच्या उद्देशाने व्हेल माशाच्या उलटीची वाहतूक करणाऱ्या सात जणांना आजरा पोलिसांनी त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी सायंकाळी या सात जणांना दोन चारचाकी व मुद्देमालासह पोलिसांनी घाटकरवाडी येथून ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
संशयित आरोपी पुढीलप्रमाणे – मंदार चंद्रकांत कुडव ( वय वर्ष ३५ रा. बांदा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ) महेंद्र दत्ताराम परब (वय वर्षे ४५ रा.विलवडे ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग),राजेश रघुनाथ आरोलकर (वय वर्ष ५२रा. सारवादोर, दुमुदो पैठण पोर्रवरी रा. गोवा ), शैलेश नारायण राव (वय वर्ष ५३ रा. म्हापसा, गोवा ता. बारदेश राज्य गोवा), विजय हरिचंद्र परब ( वय वर्ष ५४ रा. शिव प्रेरणा बिल्डींग रूम नं.६१४ वडाळा ईस्ट मुंबई ३७. ),दिपक बबआसोलकर (वय वर्ष ५३ रा. तांबोसे,पेडणे, गोवा),सहदेव परब (रा. बांदा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग)
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे करीत आहेत.
आजरा तालुक्याच्या हद्दीत व्हेल माशाची उलटी जप्त
सात जण ताब्यात
अंदाजे अडीच कोटी किंमत

तस्करीच्या उद्देशाने गोव्याहून नेण्यात येणारी व्हेल माशाची उलटी पोलिसांनी आजरा -आंबोली मार्गावरील घाटकरवाडी येथे आजरा तालुक्याच्या हद्दित ताब्यात घेतली असून अंदाजे या मुद्देमालाची किंमत अडीच कोटी रुपये असल्याचे समजते. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन चार चाकी गाड्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार व गोवा राज्यातील तीन अशा सहा जणांना ताब्यात घेतले आहे .
याबाबत वन विभागाचे कर्मचारी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोवा इथून आजरा तालुक्याच्या हद्दीतून तस्करीच्या उद्देशाने व्हेल माशाची उलटी चारचाकी गाडीतून नेली जात असल्याचे खब-यामार्फत समजले. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव व अन्य चार अशा सहा जणांनी घाटकरवाडी येथे संशयित गाड्या अडवून त्याची झडती घेतली असता या गाड्यांमध्ये दोन किलोची उलटी सापडली . आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत सुमारे अडीच कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज उपविभागाचे पोलीस अधिकारी राजीव नवले हे आजरा पोलीस ठाण्यात थांबून होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीची किंमत अंदाजे अडीच कोटी पेक्षा जास्त असल्याचेही सांगण्यात येत असल्याने सदर उलटी व्हेल माशाचीच आहे याबाबत खातरजमा करण्यासह गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
उलटीचे महत्व
व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो.औषधे बनवण्यासाठीही वापर केला जातो.
आंबोली मार्गावरील तस्करी पुन्हा चर्चेत
आजरा-आंबोली मार्गावर यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. सर्प विषयापासून ते वाघाच्या कातडी पर्यंत तस्करीचे अनेक गुन्हे पोलिसात नोंद आहेत.गोवा बनावटीच्या दारूच्या बेकायदेशीररीत्या होणा-या वाहतुकीला आळा घालण्याचे आव्हान आजही कायम आहे.एकंदर हा मार्ग म्हणजे तस्करीचा महामार्ग बनू लागला आहे.





