शेवटी ‘आपुनका राज है ‘.………
ज्योतिप्रसाद सावंत.
लोकशाही पद्धतीने आम्ही निवडून आलो आहोत आणि आमच्यावर त्यांनी रुबाब दाखवावा ? मग आम्ही निवडून येऊन करायचं काय ? गावातल्या रस्त्याशेजारील रिकाम्या जागा, प्लॉटिंग मधले खुले भूखंड यांच्यावर आमचे लक्ष नको का? बरं आम्ही काय हे लक्ष फुकट ठेवायचे ? निवडणुकीला भरमसाठ खर्च करून निवडून यायचं , प्रसंगी पैसे देऊन मतं विकत घ्यायची , प्रभागरचनेत गोंधळ घालायचा या सर्वांचा खर्च काढायचा कुठून ? एखादा भूखंड , एखादा गाळा आपल्या पदरी पडावा अशी भूमिका आम्ही ठेवली तर बिघडलं कुठे…? ऐन दिवाळीत मोठ्या कष्टाने आम्ही सर्वस्व पणाला लावून शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी गोरगरिबांना व्यवसाय काढता यावेत या प्रामाणिक उद्देशाने गाळे उभे केले . आता हे गाळे गोरगरिबांना परवडणार नाहीत म्हणून आमच्याच काही कार्यकर्त्यांनी घेण्याचा विचार केला . बर कार्यकर्ते आमचे म्हटल्यावर ते देणे आमचं कर्तव्य आहे . आता आम्ही राज्यकर्ते म्हटल्यावर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळले तर चुकलं कुठ…? आता विरोधकांनी हे गाळे बेकायदेशीर आहेत म्हणुन त्याच्यावरून जेसीबी फिरवण्याचा उद्योग केला . राज्यकर्त्यांची तोंडी परवानगी म्हणजे ते कायदेशीर झाले ना ? बर असे गाळे यापूर्वी शहरात झाले नाहीत असेही नाही . ही आपल्या शहराची परंपरा आहे . यापूर्वी प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक मंडळींनी शहरातील मोक्याच्या जागा व गाळे अल्प भाड्याने पदरात पाडून घेऊन त्यामध्ये पोटभाडेकरू ठेवलेतच ना .आमच्या परवानगीने उभारलेले गाळे जर आमच्यासमोर जमीनदोस्त करत असाल तर मग शहरातील इतर गाळे जमीनदोस्त करण्यासाठी आम्ही पुढाकार का घेऊ नये ? या प्रकरणावरून म्हणे आमच्यावरचा शहरवासीयांचा विश्वास उडाला आहे . अशी प्रकरणे करून सुद्धा दोन-दोन वेळा जनतेने निवडून दिलेली काही मंडळी आहेतचकी . म्हणून जनतेचा आमच्यावरील विश्वास उडाला का नाही हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणारच . त्याची काळजी विरोधकांनी कशाला करायची ? आता तर म्हणे या प्रकरणात काहीजण कायदेशीर दाद मागणार . आमच्या विरोधात कायदेशीर दाद मागायला प्रश्न येतोच कुठे ? ज्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले ते अधिकारी आणि विरोधक बघून घेतील . आम्ही आपलं कोणावर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्नशील होतो . आता राहता राहिला तो प्रश्न हे गाळे पाडताना मागवलेल्या पोलिस बंदोबस्ताच्या खर्चाचा .. हे गाळे पाडू नयेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती . आणि या आमच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता .गाळे पाडलेच नसते नसते तर पोलिस यंत्रणा कामाला लागली नसती . पोलीस यंत्रणा आली नसती तर खर्चाचा प्रश्नही नव्हता . म्हणजे आमची भूमिका योग्य होती की नाही हे आता तुम्हीच सांगा . आमच्या राज्यात थोडेफार आमच्या मनाजोगं होणारच की… शेवटी ‘आपुनका राज है ‘…
……









