बुधवार
दि.२८ ऑक्टोबर २०२६

दुष्काळामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या….

आजरा : प्रतिनिधी
राज्य शासनाने दुष्काळाचे कारण पुढे करत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील विविध गटातील सुमारे एक हजाराहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहेत त्यामुळे जिल्हा बँकेसह सर्व निवडणुका आता लांबणीवर पडणार आहेत. ज्या टप्प्यावर सध्या निवडणूक कार्यक्रम आहे त्याच टप्प्यावर हा कार्यक्रम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोकुळचा धसका…?
‘गोकुळ’ मध्ये महायुतीची झालेली पिछेहाट ताजी असल्यामुळे याचा परिणाम जिल्हा बँक निवडणुकीवर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

‘आजरा’ च्या ऊस उत्पादकांची दिवाळी गोड
आजरा : प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांने सन २०२५-२६ या गळीत हंगामात गळीतांस आलेल्या ऊसाचा अंतीम हप्ता प्रति टन १०० रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. ही रक्कम ३ कोटी ६ लाख ८८ हजार इतकी आहे. कारखान्यांने गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला एकूण ३५०० रुपये प्रति टन म्हणजेच एफ.आर.पी.पेक्षा प्रतिटन ३०५ रुपयाप्रमाणे ९ कोटी ३६ लाख रुपये इतकी जादा रक्कम आदा केली आहे. यातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेस गत हंगामावेळी आणखीन जादा प्रतिटन १०० रुपये अधिक देण्याचे कारखाना संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनानुसार दिला होता. त्याची पूर्तता केली आहे. ऊस प्रवठादार शेतक-यांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम उचल करावी. यंदाचा गळीत हंगामासाठी कारखाना ओव्हरहोलींग करून गळीतासाठी सज्ज आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी परजिल्ह्यातील व स्थानिक ३६४ यंत्रणेचे नियोजन केले आहे. कारखान्याकडे करार केलेला संपूर्ण ऊस वेळेत उचलला जाईल. यंदा चार लाख टनाचे गाळपाचे उद्दीष्ट असून शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष श्री. देसाई यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिल फडके, संचालक वसंतराव थ्रे, विष्णूंपत केसरकर, उदयराज पवार, जिल्हा बँक प्रतिनिधी स्थीर देसाई, मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, रचना होलम, मनिषा देसाई, काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरीभाऊ कांबळे, तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक एस. के. सावंत व अधिकारी उपस्थित होते.

स्व. बाबूरावजी कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजऱ्यात भव्य खुली कबड्डी स्पर्धा…
महिला प्रदर्शनीय सामन्याचे आकर्षण
आजरा : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ दिवंगत नेते स्व. बाबूराव हरी कुंभार यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आजरा येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. बाबूरावजी कुंभार विचार मंचाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यातील कबड्डी संघांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्व. बाबूराव हरी कुंभार यांच्या स्मरणार्थ विचार मंचाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व क्रीडा उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही डॉ. स्मिता सुधीर परळकर आणि सुधीर बाबूराव परळकर यांच्या पुढाकारातून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार ५५५ रुपये, उपविजेत्या संघाला १५ हजार ५५५ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘मॅन ऑफ द सिरीज’, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यांसाठीही वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. महिला कबड्डीचा प्रदर्शनीय सामना हे स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे.
स्पर्धेतील सर्व पारितोषिके आणि चषक स्व. बाबूरावजी कुंभार यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा येथील मातीच्या मैदानावर कबड्डीच्या नियमानुसार खेळविण्यात येतील.
गुरुवार, २९ ऑक्टोबर आणि शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये असून, संघांनी बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
कबड्डीप्रेमी खेळाडू आणि संघांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्व. बाबूरावजी कुंभार विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार बैठकीस मलिककुमार बुरुड, नाथा देसाई, संजीव देसाई, विजय राजोपाध्ये, धनाजी पारपोलकर, गौरव देशपांडे, अल्बर्ट फर्नांडिस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कोवाडेतील आगीत ऊस, गवत गंजीचे नुकसान

भादवण : प्रतिनिधी
कोवाडे (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत ऊसाचे फड व गवत गंजी जळून गेले आहे. चार शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शार्ट सर्किट झाल्याने लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
महसूल विभागाने याचा पंचनामा केला आहे. वीज वितरण कंपनीने घटनास्थळी भेट देवून माहीती घेतली आहे.
पोवार कुटुंबाची मशार शेतात जमिन आहे. आज दुपारी बारा वाजता मशार शेताजवळील चिमण्याची रोहीत्र (डीपी) ने पेट घेतला. रोहीत्रातून जोरदार आवाज झाला. शेतात काम करीत असलेले शेतकरी घटनास्थळी धावले. या वेळी ऊसाचे फड पेटले होते. धुरांचे लोट आकाशाकडे जात होता. वाऱ्याने आग सर्वत्र पसरली. यामधे धोंडीबा रामचंद्र पोवार, कांचन किशन पोवार, तुकाराम रामचंद्र पोवार यांचा सुमारे अर्धा एकरातील ऊस जळाला. वाऱ्यामुळे आगीची ठिणगी सुभाष बाळकू पोवार यांच्या गवत गंजीवर पडली. कडक उन्हामुळे गंजी जळून खाक झाली. शेतकऱ्यांनी झाडाच्या फांद्या, हिरण्यकेशी नदीचे पाणी आणून व माती टाकून आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
शॉर्टसर्किटने ऊसाला आग; एक एकर ऊस जळून खाक
दाभिल : प्रतिनिधी
दाभिल (ता. आजरा) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील ऊस जळून नुकसान झाले. या घटनेत शेतकरी संदीप कांबळे यांच्या शेतातील सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला. अंदाजे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे
शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमध्ये ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकरी संदीप कांबळे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

आजरा-गांधीनगर रस्त्यावरील मंजिरीतील पथदिव्यांना सहा वर्षांनंतर उजेड

आजरा : प्रतिनिधी
आजरा-गांधीनगर रस्त्यावरील मंजिरी परिसरात गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेले पथदिवे अखेर सुरू झाले आहेत. दि. २७ ऑक्टोबर रोजी पथदिव्यांची चाचणी यशस्वी झाली.
रस्त्याचे डांबरीकरण करताना जुने दिवे काढण्यात आले होते. त्यानंतर नवे दिवे न बसवल्याने रात्री या मार्गावर अंधार होता. नगरसेवक परशुराम बामणे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले.
पथदिवे सुरू झाल्याने समर्थ कॉलनी, रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी, आयडियल, आनंदवन कॉलनी, गांधीनगर व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रभागातील इतर काही ठिकाणीही लवकरच दिवे बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बामणे यांनी सांगितले.
छायावृत्त


आजचे पंचांग
दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (२९ ऑक्टोबर रात्री ०१.०६ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (दुपारी ०१.२५ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : व्यातीपात योग (सकाळी ०७.१८ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०२.३६ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.४८ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव – देशमुख निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या सौ स्मिता जाधव यांच्यापेक्षा दहा हजार पेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडीवर
शिक्षक मतदार संघामध्ये भाजपाचे कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर
