सोमवार
दि.१२ ऑक्टोबर २०२६

पारेवाडी नजीक चारचाकीचा अपघात
एक ठार ; एक गंभीर जखमी

आजरा : प्रतिनिधी
नांदेडहून रील्स व शॉर्ट फिल्म शूटिंग साठी गोव्याला गेलेले चार तरुण पुन्हा गोवा येथून नांदेडच्या दिशेने परत जात असताना आजरा – आंबोली मार्गावरील हॉटेल मिनर्वा समोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट समोरच असणाऱ्या एका गॅरेजमध्ये घुसून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. धनाजी देशमुख (नांदेड) असे मृताचे नाव(पूर्ण नाव समजू शकले नाही.) असून हिराबाज महादेव वस्तूरे राहणार तरोडा नांदेड असे गंभीर जखमीचे नाव आहे .
चौघेजण टाटा नेक्सॉन गाडी क्रमांक एम.एच.२६ सी.टी. ७३२६ या गाडीतून दोन दिवसांपूर्वी गोव्याला गेले होते.आज सोमवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. अपघातातील गंभीर जखमी वस्तूरे यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

आजरा शहरात दुर्गा मातेचे जंगी स्वागत, भुत्या व हरण्याने उपस्थितांची मने जिंकली

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा मातेचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील पाच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या दुर्गा मातेच्या मूर्तींच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी भव्य आगमन मिरवणुका काढण्यात आल्या.
या मिरवणुकांमध्ये लेझीम, लाठीकाठी, बिट्स, पारंपारिक हलगी आणि ताशा पथकाच्या निनादात तरुणाई थिरकली. मिरवणुका पाहण्यासाठी स्थानिक बालगोपाळ आणि महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.
चाफे गल्ली येथील क्रांतिकारी तरुण मंडळाच्या आगमन मिरवणुकीमध्ये मालवण, मुरुडे येथील लेझीम पथकासह मुलींनी सादर केलेले साहसी खेळ हे विशेष आकर्षण ठरले. तर छत्रपती शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये नाचणारा भुत्या घोडा आणि हिंदकेसरी बैल हरण्या यांनी उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या तालावर नाचणारा रोबोट आणि बिट्सवर थिरकणाऱ्या तरुणाईने मिरवणुकीत चांगलीच रंगत आणली होती.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण शहर दुर्गा मातेच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. भगवा रक्षक नवरात्रोत्सव मंडळाने जागीच उद्घाटन करून मूर्ती दर्शनासाठी खुली केली. लायन्स किंग फ्रेंड सर्कल व रवळनाथ मंदिर येथेही दुर्गा मातेची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून धार्मिक विधी आणि पूजन करण्यात आले.
या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात गृहरक्षक दलाच्या जवानांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सर्व मिरवणुका शांततेत आणि उत्साहात पार पडल्या.


मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत

सिरसंगी : प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस हत्तीने केली आहे . तर सिरसंगी परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतातील कुत्रे गायब होणे आणि एका कुत्र्याचा मृतदेह अंगावर नखांचे ओरखडे असलेल्या अवस्थेत आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिरसंगी परिसरातील मिळालेल्या माहितीनुसार, अमोल होडगे यांच्याकडे दोन कुत्रे होते. त्यापैकी एक कुत्रा मृतावस्थेत आढळला, तर दुसरा कुत्रा गायब झाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी विलास होडगे यांचे साखळीने बांधलेले कुत्रेही गायब झाले आहे. या घटनांमुळे परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकाऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे . मागील आठवड्यात येमेकोंड येथील पोलिस पाटील मारुती कांबळे याना त्यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले . यामुळे सिरसंगी येमेकोंड वाटंगी परिसरातिल शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण आहे .
दुसरीकडे, सहा महिन्यानंतर हत्ती पुनः वाटंगी मोरेवडी परिसरात परतल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री मोरेवडी येथील भैरू तुकाराम अडुळकर यांच्या शेतातील भात पिकाचे ऊस पिकाचे मोट्या प्रमाणात नुकसान केले आहे, सदर पिकाचा पंचनामा वनरक्षक तानजी कवळीकटीकर व वनशिपाई तानाजी खांडेकर यांनी केला , वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वनविभागाने या घटनांची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे

चिकोत्रा धरण झुलपेवाडी बंधारा क्रमांक ४ मधील अडथळे व गळतीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ?

आजरा : प्रतिनिधी
चिकोत्रा धरणांतर्गत झुलपेवाडी येथील बंधारा क्रमांक ४ मधील झाडे, लाकडे व इतर अडथळे न हटवल्याने आणि बंधाऱ्याला असलेल्या गळतीकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार शेतकरी अनिल कृष्णा माने यांनी केली आहे.
या संदर्भात दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे मुख्य तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून अडथळे दूर करावेत, फळ्यांची तांत्रिक तपासणी करावी आणि गळती रोखण्यासाठी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती माहितीसाठी अधीक्षक अभियंता कोल्हापूर, उपविभागीय अभियंता गारगोटी, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि तहसीलदार आजरा यांना पाठवण्यात आल्या आहेत.
बंधाऱ्यातील अडथळ्यांमुळे पाणीसाठ्यावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

छाया वृत्त

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आजरा विभागामार्फत होत असलेल्या दुर्गामाता दौडची सुरुवात काल पासून झाली आहे तालुक्यातील किमान ३६ गावांमध्ये ही दौड चालू आहे. अजून इतर गावांमध्ये नवीन चालू होण्याचे काम सुरू आहे. शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका प्रमुख संदीप पारळे कार्यवाहक सतीश पवार, प्रथमेश काणेकर, मंदार बापट व इतर शिवप्रतिष्ठानचे धारकरी यांच्यामार्फत हे कार्य वाढीस नेण्याचे काम सुरू असून ज्यांना कोणाला अजून दौड चालू करावयची आहे व ज्या गावांमध्ये अजुन चालू झालं नाही अशा मंडळांनी त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क :- ९७६३०६४२३२,८००७७९४८३७

आजचे पंचांग
- दिनांक : १२ ऑक्टोबर २०२६
- वार : सोमवार
- माह (अमावस्यांत) : आश्विन
- माह (पूर्णिमांत) : आश्विन
- ऋतु : शरद
- आयन : दक्षिणायन
- पक्ष : शुक्ल पक्ष
- तिथी : द्वितीया तिथी (रात्री १०.१३ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
- नक्षत्र : स्वाती नक्षत्र (रात्री ११.५१ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
- योग : विष्कुम्भ योग (रात्री ०८.३१ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
- करण : बलवा करण (सकाळी ०९.४८ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
- चंद्र राशी : तुळ राशी
- सूर्य राशी : कन्या राशी
- अशुभ मुहूर्त:
- राहु काळ : सकाळी ०८.०१ ते सकाळी ०९.२९ पर्यंत
- शुभ मुहूर्त:
- अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४८
- सूर्योदय : सकाळी ०६.३३
- सूर्यास्त : सायंकाळी ०६.१७
- संवत्सर : पराभव
- संवत्सर(उत्तर) : रौद्र
- विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
- शक संवत: १९४८ शक संवत

