
शुक्रवार दि.२५ सप्टेंबर २०२६

स्व. मसणू सुतार म्हणजे तालुक्यातील विकास कामांचा शिल्पकार : अशोक चराटी

आजरा : प्रतिनिधी
गडहिंग्लज, आजरा चंदगड तालुक्यात परिचीत असणारे, आजरा बेळगाव रस्ता वाहतुकीसाठी तयार करून, आजरा बेळगाव एस.टी. बसेसची व्यवस्था करणारे तसेच तालुक्यातील विकास कामांचा शिल्पकार म्हणजे मसणू सुतार होय, असे मत प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटनप्रसंगी, आण्णा – भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख कोल्हापूर डाॅ. चंद्रकांत परूळेकर होते.
सुरवातीला स्व. मसणू सुतार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रास्ताविक विनायक परुळेकर यांनी केले. चराटी यांनी बोलताना सुतार साहेब हे धडाडीचे नेते होते. त्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम जयवंत सुतार करत असून, आजरा तालुक्यात जास्त विकास निधी मंजूर करून भागांतील विकास कामांचे नियोजन करत असल्याने स्व.मसणू सुतारांची विकासात्मक उणीव भरून काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे अध्यक्ष परूळेकर यांनी स्व. सुतार यांनी या भागात रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न जनतेतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आरोग्याचा प्रश्न घेऊन जनतेत जाण्याचा जयवंत सुतार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांनी वाडी वस्तीवर आरोग्य शिबीर आयोजित करावीत. अडचणीत असलेल्या रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेतून मदत देऊन, सहकार्य कावे असे आवाहन केले.
यावेळी संभाजी सरदेसाई, व्ही जी कातकर, सी. आर देसाई मनोगत व्यक्त केले. शिवपार्वती चॅरिटेबल ट्रस्ट आजरा आयोजित श्रीगणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे,व देसाई हाॅस्पिटल गडहिंग्लज यांच्या माध्यमातून सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिरात दोनशे रूग्णांनाची तपासणी करण्यात आली.
यावेळी डाॅ. ज्योती चौगुले,अमोल देसाई, दशरथ अमृते, तातू आण्णा बटकडली,एम टी पाटील, विकास बागडी, सरपंच सुनंदा सुतार, भुषण भिंऊगडे, ऊमेश घोरपडे, अमृत सुतार, प्रकाश पाटील,सुरेश सावंत,डाॅ.गुरूनाथ पाटील,बाजीराव देवरकर,हर्षवर्धन महागावकर,आनंदा कातकर, सदाशिव सुतार, सखाराम केसरकर, संदीप केसरकर, महादेव सुतार,सुरेश गिलबीले यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचलन बळवंत शिंत्रे यांनी तर आभार जयवंत सुतार यांनी मानले.

आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्नि-प्रदीपन सोहळा उत्साहात

आजरा : प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन व होम हवन विधी कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर व त्यांच्या पत्नी सौ. सुजाता नांदवडेकर यांच्या हस्ते, तर चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी व्हा. चेअरमन अनिल फडके यांनी ऑफ सिझनमधील ओव्हरहॉलिंग कामाचा आढावा घेतला. चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई यांनी यंदा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. त्यासाठी ३६०० तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून आजरा, गडहिंग्लज, चंदगड भागातील ऊस नोंदीचे काम पूर्ण झाले आहे. कारखाना १९९७-९८ पासून सुरू असून जुनी मशिनरी असल्याने मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यातून यावर्षी सक्षम ओव्हरहॉलिंग करून कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज केला आहे.
तसेच गेल्या ४-५ वर्षांपासून खंडीत झालेली दिवाळी बोनसची परंपरा बदलून कर्मचाऱ्यांच्या त्यागाची भूमिका लक्षात घेऊन यावर्षी ८.३३ टक्के दिवाळी बोनस देण्याचे त्यांनी जाहीर केले.कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री धनाजी किल्लेदार यांनी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कामगारांना समाधानकारक बोनस मिळाल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याबद्दल चेअरमन व व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार मानले व येत्या गळीत हंगामात कामगार पूर्ण क्षमतेने काम करून गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कमी पडणार नाहीत अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश देसाई यांनी केले.
यावेळी जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, मधुकर देसाई, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, राजेंद्र मुरकुटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, काशिनाथ तेली, हरी कांबळे, तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक एस.के. सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व युनियन पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तुर व परिसरात पोलिसांचे संचलन

उत्तूर : प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आजरा पोलिसांनी गुरुवारी उत्तूर, बहिरेवाडी आणि धामणे येथे संचलन केले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले. या वेळी नागरिकांना शांततापूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. संचलनात पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस हवालदार जमीर मकानदार, सुदर्शन कांबळे, राहुल पन्हाळकर, हर्षाली शेवाळे, पंकज खवरे, जयश्री कांबळे, अनंत देसाई यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; युवक गंभीर जखमी
आजरा : प्रतिनिधी
आजरा ते गडहिंग्लज रोडवर भादवण फाटा येथे भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा पिकअप गाडीने (MH09GT3621) दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याची घटना घडली. पृथ्वीराज युवराज देसाई (वय १९, रा. टिकेवाडी, ता. भुदरगड, सध्या रा. कोवाडे, ता. आजरा) हे आपल्या रॉयल इनफिल्ड बुलेट (MH09GC7017) वरून उत्तुरहून आजरा येथे शैक्षणिक दाखल्यासाठी जात होते. भादवण फाटा येथे आले असता समोरून आलेल्या पिकअप चालक रोहीत राजू सुर्यवंशी (रा. गडहिंग्लज) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक दिली. यात देसाई हे गंभीर जखमी झाले.
याबाबतची फिर्याद आजरा पोलीस ठाण्यात दाखल झाली पासून पुढील तपास सुरू आहे.

आजऱ्यात पावसाने मारली दडी ; शेतकरी चिंतेत …
दुष्काळ जाहीर करा : सौ.सुनिता रेडेकर

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर बनली आहे. पावसाअभावी भात, नाचणी आणि भुईमूग पिकांना मोठा फटका बसत असून अनेक शेतांतील पिके करपून जाण्याची वेळ आली आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागातील मलिग्रे,कानोली, सरंबळवाडी परिसरात पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. त्यामुळे आजरा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या व आजरा साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ. सुनीता रेडेकर यांनी केली आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने भात, नाचणी, भुईमूग यासह विविध पिकांची लागवड केली. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, सध्या पाऊस लांबल्याने शेतातील पाण्याची पातळी कमी होत असून जमिनीतील ओलावा झपाट्याने घटत आहे.
त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील पिकांची अवस्था गंभीर बनली आहे.
मलिग्रे, सरंबळवाडी तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी पिके करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भाताच्या शेतातील पाणी पूर्णपणे आटले असून जमिनीला कोरडेपणा जाणवू लागला आहे. नाचणी व भुईमूग पिकांवरही याचा परिणाम दिसून येत आहे.विशेविशेषतःत पिकाला या कालावधीत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आजरा घनसाळ या स्थानिक भात वाणाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकासाठी पुरेसा पाऊस व शेतात आवश्यक पाण्याची पातळी टिकून राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उन्हाचा कडाका असल्याने शेतातील पाणी झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
भात लागवडीपासून खते, औषधे, मजुरी आणि मशागतीपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. पीक चांगले येईल आणि हंगामाच्या शेवटी उत्पादनातून खर्च भरून निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता पाऊस लांबल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पिकांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता रेडेकर यांनी आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील पिकांच्या स्थितीची दखल घेऊन हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असून शेतकरी अडचणीत आला आहे. शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाऊस लांबणीवर गेल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पूर्व भागातील गावांमध्ये तातडीने पिकांची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची गरज आहे. आगामी काळात पाऊस झाला तर पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे; मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे : प्रा. विनायक चव्हाण

‘राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ स्वतःसाठी जगण्याची नव्हे, तर समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रउभारणीत सक्रिय योगदान दिले पाहिजे’, असे प्रतिपादन प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. आजरा महाविद्यालय, आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे
तंत्रज्ञानाचा विधायक वापर करून समाजात सकारात्मक विचार रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजजीवनाशी जोडता येते. पाटोदा, हिवरे बाजार यांसारख्या भागांतील जलव्यवस्थापन, स्वच्छता अभियान, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक प्रबोधन आदी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि सेवाभाव निर्माण होतो, असे प्रा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा ही शिक्षणाशी जोडलेली असून तरुणांमध्ये राष्ट्रजागृती निर्माण तर करणे, कर्तव्याची जाणीव विकसित करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे NSSचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कनिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्पाधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, वरिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन, सहाय्यक प्रकल्पाधिकारी डॉ. लता शेटे, प्रा. स्वाती माने, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे उपस्थित होते. प्रा. रुपाली पिळणकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी च्या वतीने देऊळवाडीत आरोग्य शिबिर ; ८६ नागरिकांची आरोग्य तपासणी

देऊळवाडी : प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीच्या वतीने व जय भवानी तरुण मंडळ, देऊळवाडी यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आणि ‘तीशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देऊळवाडीचे उपसरपंच श्री. संजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात तब्बल ८६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ४६ नागरिकांची रक्त तपासणी तर २६ जणांचे ईसीजी करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव व डॉ. कुमार यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळलेल्या किरकोळ आजारांवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच आजारांचे वेळीच निदान, नियमित तपासणी व योग्य उपचाराचे महत्त्व याबाबत डॉ. गुरव यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान झाल्यास भविष्यातील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यास मदत होते, असा आरोग्य संदेश यावेळी देण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले. जय भवानी तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

आजचे पंचांग
दिनांक : २५ सप्टेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (रात्री ११.०६ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (सकाळी ११.२२ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : शूल योग (दुपारी ०२.५० पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : गराजा करण (सकाळी ११.१७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कुंभ राशी (२६ सप्टेंबर सकाळी ०५.३२ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५९ ते दुपारी १२.३० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी 12:06 ते दुपारी 12:54
सूर्योदय : सकाळी 06:29
सूर्यास्त : सायंकाळी 06:31
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
