mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

दिनांक १ सप्टेंबर २०२६

आजरा येथे गोठ्यातून म्हैशीची चोरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा ते पोळगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयाशेजारील शेतातील गोठ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी संदीप श्रीपती नाईक (वय ४७, रा. महाजन गल्ली, आजरा) यांच्या फिर्यादीनुसार दि. ३० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट सकाळी ६.३० दरम्यान चोरट्याने गोठ्याच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व १० महिन्यांची गाभण असलेली, काळ्या रंगाची मुरा जातीची म्हैस चोरून नेली.

या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आजरा येथे मोटरसायकलची चोरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा ते आंबोली रोडवरील सिमरन ऑटो स्पेअरपार्ट दुकानासमोरून होंडा युनिकॉन मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी असिफ दिलावर मुराद (वय ३१, रा. भारतनगर, आजरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान ३५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीस गेली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर ३५ जणांवर आजरा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी आजरा पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत तालुक्यातील ३५ सराईत व संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यापूर्वीच्या विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात आहे. आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी बीटनिहाय आरोपी दत्तक घेण्यात आले असून प्रत्येक बीट अंमलदाराला त्याच्या हद्दीतील आरोपींवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे, डीजे व ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्यंकटराव हायस्कूलचे नाव सातासमुद्रापार नेणारे ‘मृत्युंजय’कार हे आजऱ्याच्या मातीतील हिरा: जयवंतराव शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यंकटराव शिक्षण संकुल येथे सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी व्यंकटराव प्रशालेचे माजी विद्यार्थी व जगप्रसिद्ध साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर श्री. आर. पी. होरटे यांनी आपल्या मनोगतातून शिवाजीराव सावंत यांच्या जीवनप्रवासाचा आणि साहित्यिक कार्याचा सखोल आढावा घेतला.
​अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. जयवंतराव शिंपी म्हणाले, “शिवाजीराव सावंत हे आजराच्या लाल मातीतील एक अमूल्य हिरा होते. आमच्या संस्थाकालीन व्यंकटराव प्रशालेतच त्यांच्यातील गुणांवर पैलू पाडण्याचे ऐतिहासिक कार्य झाले. त्यांच्यातील लेखनशैली आणि नाट्यकलेला प्रोत्साहन देऊन शाळेने त्यांना विविध व्यासपीठे उपलब्ध करून दिली. विद्यार्थीदशेत मिळालेल्या या संधींमुळेच त्यांच्यात धाडस व आत्मविश्वास निर्माण झाला.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर येथे पुढील उच्च शिक्षण घेत असताना आणि आयुष्यभर प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही शिवाजीराव सावंत यांनी आपल्या मायभूमीशी व व्यंकटराव प्रशालेशी असलेले नाते अखेरच्या श्वासापर्यंत जपले. त्यांच्या जागतिक दर्जाच्या साहित्यामुळेच व्यंकटराव हायस्कूलचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.

​या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा पटेकर, सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव, श्री. अशोक पोवार उपस्थित होते. तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. पन्हाळकर सर, क्रीडा शिक्षक श्री. तेरसे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. देसाई यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पं. दीनदयाळ विद्यालयामध्ये मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची जयंती साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये आज ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांची जयंती साजरी करण्यात आली.वार्ताहर, फोटोग्राफर, हितचिंतक राकेश करमळकर यांच्या हस्ते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विजय राजोपाध्ये यांनी शिवाजीराव सावंत यांच्या साहित्याबद्दल माहिती सांगून त्यांच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे असे सांगितले. भरत बुरुड यांनी शिवाजीराव सावंत लिखित पुस्तकांची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

राकेश करमळकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून वाचनातून शिवाजीराव सावंत यांच्यासारखे साहित्यिक आपल्या प्रशालेतून निर्माण होतील. अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

निधन वार्ता

निवृत्ती पाटील

हाजगोळी खुर्द येथील निवृत्ती संभाजी पाटील वय 75 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. ते आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक होत

शिवाजी पाटील

होन्याळी ता.आजरा येथील शाहीर शिवाजी बाबू पाटील (वय-६८ ) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सूना नातवंडे असा परिवार आहे.उत्तरकार्य दि.१२/९/२०२६ रोजी स.१० वाजता आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १ सप्टेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (सकाळी ०७.४१ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (२ सप्टेंबर पहाटे ०२.४१ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : वृद्धि योग (रात्री ११.३८ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.४१ पर्यंत) त्यानंतर कौलव करण (सायंकाळी ०६.५९ पर्यंत) त्यानंतर तैतुला
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४५ ते सायंकाळी ०५.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

mrityunjay mahanews

डासांसाठी केलेल्या धूमीत पाच म्हैशिंसह शेळ्या व कोंबड्यांचा गुदमरून मृत्यू….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!