मंगळवार
७ जुलै २०२६

पावसाचा कहर…
विजेचा खेळखंडोबा
घरांची पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सलग तिसऱ्या दिवशी पावसाने आजरा तालुक्यात धुमाकूळ घातला असून धुवॉंधार पावसामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊ लागले आहे. यावर्षी साळगाव बंधारा प्रथमच पाण्याखाली गेला आहे तर तालुक्यात सुमारे २५ घरांची पडझड झाल्याचे समोर येत आहे. पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होताना दिसत आहे.
चित्री सर्फनाल्यासह उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोवाडे येथील संतोष जगदाळे यांच्या घराची पडझड होऊन सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर उत्तूर येथील रविकिरण श्रीपती कांबळे यांच्या शेडचे पत्रे पडून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर भादवणवाडी येथील बाळगोंडा लक्ष्मण ढेंगे व रवींद्र बाळगोंडा ढेंगे यांच्या घराची भिंत कोसळली आहे तर वझरे येथील मारुती केरबा भालेकर यांच्या घराचीही भिंत कोसळली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत.
वनक्षेत्रात वृक्ष कोसळत असल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरता वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा कस लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आजरा शहरवासीयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

विद्यार्थी संख्या रोडावली…
जोरदार पावसामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झालेला दिसत आहे. विद्यार्थी संख्या रोडावली आहे.

धामणे येथून तरुणी बेपत्ता

धामणे तालुका आजरा येथून वीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची वर्दी मुलीच्या आईने आजरा पोलिसात दिली आहे.
५ जुलै रोजी सदर तरुणी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे ती अद्याप परतलेली नाही असे वर्दीत म्हटले आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पेरणोली -गवसे जि. प. मतदार संघात शैक्षणिक साहित्य वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली-गवसे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य श्री. सुधिर देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच आजरा पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांच्या सहकार्याने आजरा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक, प्रिंटर इत्यादी शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ६ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्राथमिक शाळा गवसे या ठिकाणी देखील संगणक, प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

प्रवाशांच्या सोयीसाठी उत्तूर गावातून एसटी वाहतुकीचा निर्णय, वहातूक कोंडीचे आव्हान कायम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवीन बसस्थानकाचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जुन्या बसशेडमध्ये वाहतूक कार्यालय सुरू करून गावातून पुन्हा एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित आगारांना पत्रे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून जुन्या शेडची साफसफाई व जागा मोकळी करण्यात आली आहे.
यापूर्वी गावातून बससेवा सुरू असताना दुकानांसमोरील अतिक्रमणे, रस्त्यावर उभी वाहने, जाहिरातींचे फलक आणि शनिवारी होणारी गर्दी यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे एसटी बसच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन वादावादी तसेच नुकसानभरपाईच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बससेवा गावाबाहेरील मार्गाने सुरू करण्यात आली होती.
सध्या विविध मार्गांच्या बस वेगवेगळ्या ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे गावातून पुन्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह मानला जात असला, तरी मुख्य रस्ता, लक्ष्मी रोड, अतिक्रमणे आणि आठवडी बाजारातील वाहतूक याबाबत ठोस नियोजन आवश्यक आहे.
व्यापारी, वाहनधारक आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यानेच हा पर्याय यशस्वी ठरणार असून, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जे. पी. नाईक नागरी पतसंस्थेचा ऐतिहासिक निर्णय; ३ वर्षांनंतर सेवा कायम, ७ वर्षांनंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक नागरी पतसंस्था, आजरा यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेतील कर्मचाऱ्यांना नोकरीची अधिक सुरक्षितता, कार्यक्षमतेला प्रोत्साहन, सेवेला योग्य सन्मान आणि भविष्याची आर्थिक स्थिरता मिळावी या उद्देशाने नवीन सेवा धोरणास मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांच्या सेवेला योग्य न्याय देण्यासाठी हे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.
नवीन निर्णयानुसार, संस्थेमध्ये सलग व समाधानकारक ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. सेवा कायम झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थेच्या नियमांनुसार व संचालक मंडळाच्या मान्यतेने दरवर्षी सामान्य वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात येईल.
याशिवाय, सलग ७ वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार आहे.
हा लाभ देताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, गोपनीय अहवाल, शिस्त, सेवेतील सातत्य, कामकाजातील प्रामाणिकपणा, संस्थेची आर्थिक स्थिती तसेच संचालक मंडळाची अंतिम मान्यता या बाबींचा विचार करण्यात येणार आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही या निर्णयाचा आढावा घेताना सांगितले की, कर्मचारी हा संस्थेचा कणा आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित सेवा, नियमित वेतनवाढ आणि गुणवत्तेच्या आधारे उच्च वेतनश्रेणीची संधी उपलब्ध करून देणे ही संस्थेच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे भविष्यातही कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देत अशाच लोकाभिमुख व कर्मचारीहिताच्या योजना राबविण्यात येतील.
या निर्णयामुळे संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेला योग्य सन्मान देणारा हा निर्णय इतर सहकारी संस्थांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना संचालक मंडळाने व्यक्त केली.

हेल्पिंग हँड्स कडून विद्यार्थ्यांना मदत

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळेरान, धनगरमोळा, घाटकरवाडी, किटवडे, लिंगवाडी आणि आंबाडे या दुर्गम भागांतील प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर ने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविला. याचबरोबर उत्तूर परिसरातील निराधार, गरजू व वंचित विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावर्षी एकूण १५० विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षण प्रवासाला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. इथल्या विद्यार्थ्यांना अशा दानशूर व्यक्तींच्या व संस्थांकडून मदतीची गरज असल्याचे इथल्या विद्यार्थी व शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि शिक्षणाची उमेद हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे.समाजातील दानशूर व्यक्ती, हितचिंतक, स्वयंसेवक आणि हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या आर्थिक व श्रमिक सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असे हेल्पिंग हँड्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षेत आजरा हायस्कूलची दमदार कामगिरी ; १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा हायस्कूल, आजराने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीतील १२ व पाचवीतील २ असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून इयत्ता पाचवीतील शांभवी संतोष पंडित हिने २७० गुणांसह राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त केली, तर क्षितिजा दयानंद उपासे (२६४ गुण) हिच्यासह इयत्ता आठवीतील अर्जुन सुरजकुमार नार्वेकर (२६८), साक्षी सागर ओतारी (२६६), शिफा दाऊदसाहेब खेडेकर (२६४), आयुष रामचंद्र पाटील (२६२), सोनल निवृत्ती मिटके (२५२), स्वरल सुरेश देशमुख (२५२), प्रांजली युवराज मोरे (२५२), अनुप आप्पा पाटील (२५०), मिहीका महेश केसरकर (२४८), शादाब मुबारक भडगावकर (२४२), तन्मयी सुखदेव गाडे (२३८) व अयान अकिलअहमद सनदी (२३६) हे जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक ठरले.
इयत्ता आठवीसाठी विभागप्रमुख श्री. आर. पी. केसरकर, श्रीमती. एम. एस. कांबळे, सौ. एस. एस. पाटील व सौ. बी. पी. पाटील, तर इयत्ता पाचवीसाठी विभाग प्रमुख सौ. पी. एस. भोये, श्री. ए. एस. नाईक, श्री. एस. जी. पाटील व सौ. व्ही. एन. यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आजचे पंचांग
दिनांक : ७ जुलै २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (दुपारी ०१.२४ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (सायंकाळी ०४.२३ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : शोभन योग (दुपारी ०२.३० पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : भाव करण (दुपारी ०१.२४ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.०१ ते सायंकाळी ०५.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
निधन वार्ता
कृष्णा नार्वेकर

पोळगाव गावचे रहिवाशी कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा पर्वता नार्वेकर (वय वर्ष ८६ ) यांचे आजरा येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने काल सोमवारी पहाटे निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे


