mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार  १२

जून २०२६

चारचाकीच्या धडकेत लाकूडवाडी येथील एकजण ठार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बेंगलोर – पुणे हायवे रोडवर गोकुळ शिरगाव नदी चार चाकी ने रस्ता ओलांडणाऱ्या लाकूडवाडी तालुका आजरा येथील राजेंद्र रामचंद्र अर्दाळकर (वय ५५ वर्षे ) यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद रोहिदास शिवाजी कातकर रा. वाघराळी यांनी पोलिसात दिली असून चार चाकी चालक तातोबा सतगोंडा पाटील रा. नागाळा पार्क कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आजरा पं.स.सभापती जयश्री गाडेंचा कुणबी दाखला अवैध
राजकीय वर्तुळात खळबळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री संजय गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कागदोपत्री पुराव्याअभावी सौ. गाडे यांचा दाखला अवैध ठरवला आहे. याबाबत ५ मे ला सुनावणी झाली. काल जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीने याबाबतचा निकाल दिला.

पंचायत समिती निवडणुकीमधे पराभूत उमेदवार साधना संजय केसरकर यांनी सभापती जयश्री गाडे यांच्या दाखल्यावर हरकत घेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर ५ सुनावण्या झाल्या. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा सातपुते यांनी सभापती गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविला. पंचायत समितीच्या आरक्षणात महिला ओबीसीचे आरक्षण सभापती पदासाठी जाहीर झाले आहे. या पदासाठी भादवण पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या जयश्री गाडे या प्रमुख दावेदार होत्या. गाडे या राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडून आल्या आहेत. ताराराणी आघाडीच्या पंचायत समितीच्या पराभव झालेल्या उमेदवार साधना संजय केसरकर यांनी कोल्हापूर जात पडताळणी कार्यालयात गाडे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

दरम्यान गाडे या निकाला विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते.

आगार व्यवस्थापकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग धारेवर…
जमत नसेल तर बदल्या करून घ्या…
पदाधिकाऱ्यांचा रोखठोक सल्ला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा एसटी आगाराचा कारभार हा नियोजन शून्य झाला आहे. वेळेत एसटी सुटत नाही. एसटी फेऱ्या कधीही रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महात्मा गांधी रोजगार योजनेच्या लाभार्थांनी कर्ज काढून जनावरांचे गोठे उभारले, विहीरी काढल्या. तीन वर्ष झाली तर त्याचे अनुदान व हप्ते मिळालेले नाहीत. या विभागाचे अधिकारी करतात तरी काय ? सार्वजनिक बांधकाम कामांची माहिती कधी मिळणार ? अशी विचारणा करीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी एसटी, सार्वजनिक बांधकाम व मनरेगाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामात सुधारणा करा अन्यथा वेगळा विचार करायला लागेल असा इशाराही दिला.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभा झाली. या वेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सभापती सौ. जयश्री गाडे अध्यक्षस्थानी होत्या. उपसभापती सौ. यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई व शिरिष देसाई हे सभापतींच्या परवानगीने उपस्थित होते.

शिरीष देसाई यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. मलिग्रे फिडरवरून ३३ केव्ही वीजवाहीनी टाकल्याने आजरा तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यासाठी वीज वितरणचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. एस.टी. बद्दलची माहिती आगार प्रमुख प्रविण पाटील यांनी दिली. सुधीर देसाई, उपसभापती पोवार, सदस्य समीर पारदे यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एस.टी. बसेसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गाड्यांची वेळेवर सोय नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाहेर प्रवेश घेतला आहे.. रस्त्यांचे जुजबी कारण सांगितले जात आहे. ज्या रस्त्यावरुन कंटेनर सारखे वाहने जातात मग एस.टी. का नाही? तुम्हाला जमत नसेल तर बदली करून घ्या. असे खडे बोल सुनावले. मनरेगातील कामांचे पैसे मिळालेले नाहीत. कर्ज घेवून लाभार्थीनी विहीरी काढल्या. जनावरांचे गोठे उभारले. अनुदान व हप्ते मिळाले नाही. त्यांनी काय करावयाचे. लाभार्थीना योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार असल्याचे विकास चाथे यांनी सांगीतले. सुधीर देसाई म्हणाले, या विभागाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. कारभारात सुधारणा करा.

तालुका कृषीचा आढावा कृषी अधिकारी दीपक मुळे, श्री. फुले यांनी मांडला. नवीन ॲपमुळे शेतकऱ्यांना खते मिळवण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल आहेत. त्यांना तांत्रिक माहीती नाही. त्यांनी खताची नोंदणी कशी करावयाची अशी विचारणा उपसभापती पोवार यांनी केली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. शेतकरी मंडळांना माहिती दया. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत बीट निहाय सर्व्हे करा. दु‌कानदारांना प्रशिक्षण द्या अशा सूचना श्री. चोथे यांनी केल्या. आजरा ग्रामिण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी अशी सूचना सुधीर देसाई यांनी केली. शिरीष देसाई म्हणाले, वृक्ष तोड झाली मात्र नियमानुसार जी झाडे लावायची होती ती कोठे लावली याची माहिती वनखात्याने द्यावी. ठेकेदाराने झाडे लावली नसेल तर त्याच्यावर कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम, पंचायत बांधकाम यांच्यासह विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. सहाय्यक गटविकास अधिकारी परेश पुजारी, दिनेश शेट्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस द्या

आजच्या सभेला अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. सभागृहात याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महिन्यातून एकदा जर आढावा बैठकीला हजर राहता येत नसेल तर त्यांना नोटीसा काढा अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श : उत्तूर येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात तब्बल १२० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.
हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक, सांगली यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व रेनकोट भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी सरपंच श्री.किरण आमणगी श्री. जनार्दन निऊंगरे, श्री. श्रीपती यादव, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. रघुनाथ कातरे, श्री. मंदार हळवणकर, श्री. भास्कर भाईगडे, श्री. प्रविण लोकरे, श्री. प्रदीप लोकरे, श्री. धनाजी उत्तूरकर, श्री. बाळासाहेब सावंत, श्री. अरुण पाटील, श्री. महेश काटकर, श्री. स्वप्नील पाटील, श्री. गणेश व्हरबळे, श्री. अनिकेत मुळीक, श्री. पांडुरंग उंडगे, श्री. प्रशांत कोळी व श्री. संतोष पाटील, मंदार हळवणकर
आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. दीपक आमणगी यांनी केले.

वीज वितरण समोर स्मार्ट मीटर पार्श्वभूमीवर शिवसेना आज आंदोलन छेडणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथे महावितरण कंपनीचे कर्मचारी तालुक्यातील नागरिकांना बळजबरीने व घरात कोणीही नसताना दिशाभूल करून व भीती दाखवून स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा गट) ने केला आहे.

अनेक ग्राहकांनी मित्र बसवण्यास विरोध केला असतानाही मीटर्स बसवण्याचे काम चालू आहे. अनेक वेळा मोर्चा आंदोलन करूनही अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने कोणतीही मीटर बदलणार नाही असा शब्द दिला असतानाही महावितरणचे कंत्राटी कर्मचारी हे मीटर बदलत आहेत. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून आज शुक्रवार दिनांक १२ जून रोजी सकाळी उपअभियंता, आजरा कार्यालय येथे निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी दिली आहे.

विशेष बातम्या…

♦ आजरा पंचायत समिती सभापती सौ. जयश्री गाडे यांच्याबरोबर गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ व पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचा जातीचा दाखला अवैद्य ठरवण्यात आला आहे.

♦ सांगली येथे वेदांत मारुती बंडगर या 14 वर्षीय मुलाचा डोळ्यात गोळी झाडून खून केल्याची घटना घडली आहे. रेल्वेच्या म** धक्का ठेक्यावरून दोन गटातील सुरू असलेल्या वादातून सदर प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

♦ दोन कोटी रुपयांच्या विमा पॉलिसी रकमेसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने माजी सैनिक संदीप मंजिरी रा.घोडगिरी/ हुक्केरी यांचा सलाईन मध्ये विष मिसळून खून केल्याची घटना घडली आहे.

♦ लग्न ठरल्यात अनैतिक संबंधामुळे अडचण ठरणाऱ्या गंगवा सत्यवान हंचीमणी रा. वंटमोरी/ बेळगाव या महिलेचा खून केल्याप्रकरणी शिक्षक बसवराज करणवर यल्लाप्पा करणवर व लगमाप्पा अंकलगी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मेक्सिको येथे फुटबॉलच्या फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे.

निधन वार्ता

यशवंत परीट


भादवण तालुका आजरा येथील सेवानिवृत्ती शिक्षक यशवंत विष्णू परीट ( वय ८६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १२ जून २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी (सायंकाळी ०७.३६ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (सकाळी ०६.२८ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (रात्री ०९.२५ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : कौलव करण (सकाळी ०९.१० पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५९ ते दुपारी १२.३८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


सावधान…

साळगाव  आजरा मार्गावर गवे खुलेआम दर्शन देत आहेत.

 

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले….?

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!