रविवार ३१ मे २०२६


गोवंश हत्याप्रकरणी आजरा येथे आठ जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमराई गल्ली, आजरा येथील कत्तलखान्यात काल शनिवार दिनांक ३० रोजी दस्तगीर बेपारी यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये गाय व बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तौशीफ इस्माईल खेडेकर रा. आमराई गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसांनी अबूतालिम रशीद बेपारी, रेहान अबूतालीम बेपारी, फय्यूम खानसाब बेपारी, खलील रशीद बेपारी, सोहेल सलाम बेपारी, अल्ताफ खलील बेपारी, दस्तगीर खलील बेपारी व सलाम रशीद बेपारी या आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

धामणेत गव्याच्या धडकेत महिला गंभीर जखमी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धामणे ता. आजरा येथील यल्लूबाई रामा लोकरे या गव्याच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या आहेत. लोकरे या ‘पोट्याचे शेत’ परिसरातील भुपाल पाटील यांच्या शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या गव्याने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून परिसरातील शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पंधरा ते वीस दिवसांपूर्वीही गव्यांच्या कळपाने धामणे गाव परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधात गव्यांचे कळप थेट वस्तीपर्यंत येत आहेत.

निधन वार्ता
अंजना गुरव

दाभिल तालुका आजरा येथील सौ. अंजना पांडुरंग गुरव ( वय ५० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुली, दोन दीर यांच्यासह मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते नामदेव गुरव यांच्या त्या भावजय होत. फोटो पूजन शुक्रवार दिनांक ५ जून रोजी आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये एच.पी. व्ही लसीकरण शिबीर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये एच.पी.व्ही लसीकरण प्रबोधन शिबीर संपन्न झाले . विजय राजोपाध्ये यांनी पालक व विद्यार्थी -विद्यार्थिनींना एच .पी . व्ही संदर्भात थोडक्यात माहिती सांगितली. यानंतर आरोग्य अधिकारी एच.डी. वर्दम यांनी एच.पी. व्ही. लस कोणत्या प्रकारचीआहे, कोणते फायदे आहेत आणि मुलींसाठी किती उपयोगाची आहे या संदर्भात माहिती सांगून विद्यार्थिनींना लस घेण्यासाठी आवाहन केले. वयाची १४ वर्षे पूर्ण केलेल्या आणि १५ वर्षाच्या आतील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी एच.पी व्ही लसीकरण सुरू करण्यात आले.
यावेळी डी. आर. हरणे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थिनींचे माता पालक तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आज ठरणार आयपीएल चषकाचा मानकरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले दिड महिने क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमधील अंतिम हाय व्होल्टेज लढत आज रविवारी सायंकाळी साडेसात वाजता गुजरात विरुद्ध बंगळुरू अशी होत आहे. दोन्हींनी संघांनी जय्यत तयारी केली असून बंगळुरूचे पारडे जड दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
♦ गोकुळ दूध संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता महायुतीतील सर्व घटक पक्ष छत्रपती ‘ शाहू शेतकरी विकास आघाडी ‘ च्या माध्यमातून एकत्र आले असून महायुतीने सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
♦ मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले.
♦ पुणे येथील फुगेवाडी व हडपसर भागात विषारी दारू सेवन केल्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी सरकार आक्रमक झाले असून बेकायदा आणि बनावट मद्याचा पुरवठा रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलातील तसेच राज उत्पादन शुल्क विभागातील २२ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
♦ सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसला असून सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ३१ मे २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा (दुपारी ०२.१४ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (दुपारी ०४.११ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : सिद्ध योग (१ जून सकाळी ०६.१८ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : भाव करण (दुपारी ०२.१४ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३२ ते सायंकाळी ०७.११ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


