mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि.४ एप्रिल २०२६

पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यात अकरा जखमी..?
साळगाव येथील घटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

साळगाव तालुका आजरा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल अकरा जणांना जखमी केले असल्याचे समजते. गेले दोन दिवस साळगाव परिसरात या कुत्र्याची दहशत असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

गेले दोन दिवस साळगाव परिसरात पिसाळलेले कुत्रे वावरत आहे.या कुत्र्याने सुमारे अकरा जणांचा चावा घेऊन जखमी केले असल्याची समजते. यामध्ये संजय श्रीपती भंडारी. अनिता ईश्वर कांबळे.संतान लुईस फर्नांडीस, वैशाली बबन वड्ड, मारुती भालेकर, रत्नाबाई बाबू देवलकर आदींचा समावेश आहे.

आजरा ग्रामीण रुग्णालयात संबंधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दुचाकी अपघातात एक जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – आंबोली मार्गावर हॉटेल शर्विल समोर दुचाकी चारचाकीला धडकून झालेल्या अपघातात अश्विन शिवाजी पाटील (वय ४२ रा. मुरुडे ता. आजरा ) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अश्विन हे आजऱ्याच्या दिशेने येत असताना सदर अपघात झाला. गतिरोधकांचा अभाव व चुकीच्या पद्धतीने लावल्या जाणाऱ्या अवजड वाहनामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. वाहन चालकांकडून गतिरोधकांची मागणी करूनही गतीरोधक बसवले जात नसल्याने अपघातात वाढच होत आहे.

शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करणार
१५ एप्रिलला बाधित गावातील शेतकऱ्यांचा मेळावा..


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्धार आज शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. १५ एप्रिलला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.

सुरुवातीला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना सरकार शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादत आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची जमीन आणि इथले समृद्ध पर्यावरण उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आम्ही संघटितपणे विरोध करून शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, हा महामार्ग केवळ अदानीचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकार जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा हा प्रयत्न तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी आनंदराव कुंभार म्हणाले, आधीच वन्यप्राणी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे त्यात भरीस भर म्हणून हे सरकार मार्फत नवे संकट शेतकऱ्यांच्या वर येत आहे. आम्ही हे संकट परतवून लावू.

यावेळी माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, युवराज जाधव, धनाजी सावंत, शंकर पाटील, बाळू दोरुगडे, श्रीपती गुरव, प्रकाश दोरुगुडे, बाळू जाधव, जानू लाड, मारुती पाटील, कृष्णा सावंत यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते

हरपवडे, कोरिवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवटी, पेठेवाडी, मसोली, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी या महामार्गाने बाधित होणाऱ्या बाधित होणारे होणाऱ्या गावातील शेतकरी उपस्थित होते. पंधरा तारखेला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. मेळाव्याच्या तयारीसाठी गाववार बैठकांचे नियोजन करण्यात आले.

कोळींद्रे – सुळे रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयवंत मसणू सुतार यांचे प्रयत्नातून मंजूर असलेल्या कोळिंद्रे – सुळे रस्ता या कामाचे उद्घाटन जयवंत सुतार यांचे हस्ते पार पडले.

या कामाकरिता खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यामुळे कोळींद्रे – सुळे दरम्यानच्या पुलाजवळील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल असे यावेळी सुतार यांनी सांगितले.

सरपंच वंदना सुभाष सावंत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी सुरेश सावंत, प्रकाश पाटील, सुभाष सावंत, मेजर सुधाकर पाटील, रामजी पाटील, सुधाकर राजाराम, हर्षवर्धन महागावकर, नंदा जाधव, अमोल सुतार, सतीश संकपाळ, दयानंद बुगडे आदी उपस्थित होते.

उत्तुर येथे उद्या भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिंदू धर्म, संस्कृती व परंपरेचे जतन तसेच समाजामध्ये एकता आणि बंधू भाव वाढविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्तुर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ एप्रील रोजी वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार असुन यावेळी श्री क्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. देवव्रत महराज वास्कर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील शरददत्त दास बुवा घाग, वेद शास्त्र संपन्न डॉ. के. डी. हिरेमठ, आकाराम महाराज पोवार, स्वामी शिवयोगी नाथ महाराज, गुरुवर्य किसन महाराज, तानाजी पाटील (देव मामा) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

यानिमित्त दुपारी ४:३० वाजता उत्तुर स्वागत कमान ते इंदिरानगर या मार्गावरून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनासाठी उत्तुर आणि परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पंजाबची चेन्नईवर मात

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई येथे झालेल्या पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये पंजाबने पाच गड्यांनी चेन्नईचा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवून गुण तक्त्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

आजचा सामना

१.दिल्ली विरुद्ध मुंबई

स्थळ : अरुण जेटली स्टेडियम दिल्ली

वेळ : दुपारी ३.३० वाजता

२.गुजरात विरुद्ध राजस्थान

स्थळ : अहमदाबाद 

वेळ : सायंकाळी 7:30 पासून

फोटो क्लिक…

शहरातील कचरा उठाव यंत्रणा विस्कळीत झाल्याने आता शहरांच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.

आजचे पंचांग 

दिनांक : ४ एप्रिल २०२६
वार : शनिवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया (सकाळी १०.०८ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (रात्री ०९.३५ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : हर्षण योग (दुपारी ०२.१६ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : गराजा करण (सकाळी १०.०८  पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : तुळ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ९.३६ ते सकाळी ११.०९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२७ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.३१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत:  १९४८शक संवत

 

संबंधित पोस्ट

महिलेच्या प्रसंगावधानामुळे तिघांना मिळाले जीवदान…. आजरा येथील शिवाजी नगर घाटावरील घटना…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सुलगाव येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह रामतीर्थ परिसरात सापडला

mrityunjay mahanews

३१ डिसेंबर रोजी कुरकुंदेश्र्वराची यात्रा…

mrityunjay mahanews

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews
error: Content is protected !!