मंगळवार दि. १० मार्च २०२६


नूतन रस्त्याचे काम धोकादायक व निकृष्ट दर्जाचे…
हात्तिवडे ग्रामस्थ आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या महागाववरून चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला.
विशेषतः हात्तिवडे परिसरात सुरू असलेल्या दर्जाहीन कामामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पंधरा दिवसापुर्वी कामात सुधारणा करण्याची हमी देण्यात आली होती. काँक्रीटच्या या रस्त्यावर धड पाणी नाही की बॅरेकेटस् उभा केलेले नाहीत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. हात्तीवडे स्टॅन्ड वरील रस्ता झालेला नाही धुरळ्यातून लोकांना दररोज प्रवास करावा लागतो असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सुहास जोंधळे, आजरा कारखाना संचालक संभाजी पाटील,उत्तम हरेर ,विजय पाटील ,साईनाथ कुंभार ,भैरू पंडीत,
नामदेव खांडेकर, मधुकर हरेर, दिनकर शिप्पुरकर, बाळु चौगुले,आनंद हरेर,वसंत पंडित, संजय हरेर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

वडकशिवाले उपसरपंचपदी अमर पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वडकशिवाले (ता. आजरा ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमर निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कु.मयुरी कांबळे होत्या.
तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या. दरवर्षी उपसरपंचपदी संधी देण्याचा निर्णय गट प्रमुखांनी घेतला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे उपसरपंच नितीन सावंत यांनी राजीनामा दिला.पाटील यांचा या वेळी अंबाजी दिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील दिवटे, शशिकांत लोखंडे, जयवंत शिंदे, दत्ताराम कसलकर, रामचंद्र पाटील, श्रीपती पाटील,शालन कांबळे, वच्छला कसलकर, रतन काळे,अशोक लोखंडे विश्वास काळे हे उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सावंत यांनी मानले.

जय हनुमान गृहतारण संस्थेच्या वतीने नुतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली येथे नुतन जि.प. सदस्य सुधीर देसाई व पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार यांचा शेतकरी मंडळाचे सदस्य व जेष्ठ नागरिक श्री हिंदुराव कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ पार पडला.
चेअरमन श्री. सुभाष देसाई यांनी प्रस्ताविक केले. सत्काराला उत्तर देताना सुधीर देसाई यांनी पेरणोली व यापंचक्रोशीतील मतदारांचे आभार मानताना विविध शासकिय योजना , बचतगटाचे कार्य यातुन गावोगावी विकासाचे नवीन पर्व सुरु करु त्याचबरोबर तरुणांना व्यसनापासुन मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ उभा करुया यासाठी ग्रामस्थानी सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी श्री युवराज पोवार व शेतकरी संघाचे व्हा. चेअरमन श्री.डी.ए. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी सौ. मेघना चव्हाण यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार मंडळ सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.संजय मोहिते यांनी केले व आभार श्री. मानसिंग चव्हाण यांनी मानले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे या.आजरा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला . सकाळी शिव ज्योत आणण्यात आली. श्री शिवतीर्थ आजरा येथे आदर्श भिमदिप हळवणकर यांच्या हस्ते छ.शिवाजी महारांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर गावातील ध्वज स्तंभ येथे सोहम संपत पोवार व आयुष अमोल पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रेरणा मंञ घेऊन छ.शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक वाद्य व लेझिमच्या तालावर काढण्यात आली.
दुपारी श्री रासाई मंदिर येथे आरती झाली.नंतर संध्याकाळी ध्वज स्तंभ कड़े राष्ट्रभक्ती पर गीत घेण्यात आले. विद्या मंदिर हरपवडे येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थींना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी आकाश जाधव, कुमार पाटील, अनिकेत लटम व आदर्श हळवणकर उपस्थितीमध्ये कार्य झाले.संध्याकाळी शाहिर श्री. प्रदिप सुतार व सहकारी यांचा पोवाडा गायनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमांमध्ये स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

निवड….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयचा नेटबॉल खेळाडू गौरव बाळू सुतार याची दिनांक ९ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ दरम्यान सेग युनिव्हर्सिटी, भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय पुरुष नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघामध्ये निवड झाली आहे.

भगवंताचे नाम हेच आत्म उद्धाराचे खरे साधन : ह.भ.प. मारुती कदम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मनुष्याच्या जीवनाचे सार्थक म्हणजे भगवंत प्राप्ती करून घेणे होय आणि त्यासाठी भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. भगवंताच्या नामातूनच मनुष्याचा आत्म उद्धार करून घेता येतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने भगवंताच नामात राहून आपल्या जन्माचे सार्थक करून घेणे हेच मानवी जीवनाची खरी फलप्राप्ती आहे असे मत देऊळवाडी येथे होळी व शिमगोत्सव कार्यक्रमा निमित्त झालेल्या कीर्तन सेवेत ह .भ.प.मारुती कदम यांनी व्यक्त केले
यावेळी ब्रह्माकुमारीज विद्यालय चे साधक संजूभाई सावंत व नूतन पंचायत समिती सदस्या सौ.यशोदा युवराज पोवार ,वारकरी संप्रदाय देऊळवाडी सातेवाडी ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ आणि भक्त भाविक उपस्थित होते.

विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत भादवण हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हास्तरीय डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत भादवण हायस्कूल ने विशेष यश संपादन केले.
इयत्ता नववीतील गुणवंत विद्यार्थिनी सानिका प्रकाश वडराळे हिने ८८ गुण मिळवून गडहिंग्लज-आजरा-चंदगड उपविभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कु. प्रतीक्षा प्रशांत डोंगरे हिने ७८ गुण मिळवून तर आर्या कुंभार हिने ७२:गुण मिळवून पात्र होण्याचा मान मिळवला आहे.या
या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विज्ञान विषय समितीचे सदस्य प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
‘आजरा’ ची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी अखेर गाळप जेवण झालेल्या ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. ३४००/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.१४ कोटी ४० लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. सुभाष देसाई यांच्यासह सर्व संचालक व कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत उपस्थित होते .

निधन वार्ता
लक्ष्मीबाई जाधव

मडीलगे ता. आजरा येथील लक्ष्मीबाई विष्णू जाधव (वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सिताराम शेटगे

धनगरमोळा ता. आजरा येथील सिताराम गोविंद शेटगे ( वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, भाऊ, दोन विवाहित मुली, सून, जावई असा परिवार आहे.

आज विशेष...
♦ आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष पद निवड पार्श्वभूमीवर दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
♦ पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात दुपारी एक वाजता सदस्यांची बैठक होणार आहे.

आजचे पंचांग
♦ दिनांक : १० मार्च २०२६. ♦ वार : मंगळवार. . ♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन. ♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र. ♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : सप्तमी तिथी (११ मार्च रात्री १.५४ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
♦ नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सायंकाळी ७.०४ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
♦ योग : हर्षण योग (सकाळी ८.२० पर्यंत) त्यानंतर वज्र योग
♦ करण : विस्ती भद्रा करण (दुपारी १२.४० पर्यंत) भाव करण
♦ चंद्र राशी : वृश्चिक राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ३.४७ ते सायंकाळी ५.१६ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२५ ते दुपारी १.१३
♦ सूर्योदय : सकाळी ६.५२
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४६
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत


