mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि.२ मार्च २०२६

वारकरी भवनासाठी जागा उपलब्ध करून देणार: अशोक चराटी

आजरा येथे रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्थेचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वारकरी सांप्रदाय हा समाजाला सोबत घेवून जाणारा संप्रदाय आहे. आजच्या घडीला या संप्रदायाच्या मार्गाने वाटचाल करणे गरजेचे आहे. वारकरी सांप्रदायसाठी आजऱ्यात वारकरी भवन उभारले जाणार आहे. यासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी केले.

येथील जनता बँकेच्या सभागृहात रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदाय संस्थेचे उ‌द्घाटन उत्साहात झाले. नगराध्यक्ष चराटी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य सुधीर देसाई यांच्या हस्ते संस्थेचे उ‌द्घाटन झाले. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, पंचायत समिती सदस्य सौ.जयश्री गाडे, शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालु‌का प्रमुख युवराज पोवार, रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदाय संस्थेचे अध्यक्ष गौरोजी सुतार, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंत्रे प्रमुख उपस्थित होते.

कॉ. देसाई म्हणाले, वारकरी परंपरा ही लिंगायत परंपरेच्या आधाराने चालते. त्यामुळे या दोनही परंपरची सांगड आजच्या या संस्था उद्घाटनाच्या निमित्ताने झाली आहे. वारकऱ्यांचा विचार आणि प्रसार करण्यासाठी वारकरी भवनाची आजऱ्यात गरज असल्याने रामकृष्ण हरी संस्थेची स्थापना केली आहे.

सुधीर देसाई म्हणाले, वारकरी सांप्रदाय समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सांप्रदाय आहे. वारकरी भवनाच्या जागेसाठी व इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. युवराज पोवार म्हणाले, वारकरी परंपरेकडे सामाजिक चळवळ म्हणून पाहीले पाहीजेत. वारकरी परंपरेतून मानवतेचे दर्शन घडते. गंगाराम येडगे, बाळासाहेब सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

पांडुरंग जोशीलकर, कोंडीबा आडे, विश्राम निऊंगरे, भिकाजी दारुटे, सूर्यकांत गुरव, दिपाली गुरव, संभाजी पालकर, नामदेव सुतार, पांडुरंग पाटील यांच्यासह तालुक्यातील वारकरी सांप्रदाय उपस्थित होता. राजाराम जाधव यांनी प्रास्ताविक तर संजय घाटगे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष श्री. शिंत्रे यांनी आभार मानले.

महागावचा अमोल जाधव ‘आजरा श्री-२०२६’ चा मानकरी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहराचे माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध (बाळ) केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘आजरा श्री – २०२६’ या भव्य शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेत महागावच्या अमोल जाधव याने विजेतेपद पटकावत ‘आजरा श्री’चा किताब आपल्या नावे केला.

या स्पर्धेचे  उद्घाटन प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अनिरुद्ध केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. अंतिम फेरीत अमोल जाधव याने आपल्या अचूक पोझेस आणि शरीरसौष्ठवाच्या जोरावर बाजी मारली.

 संजय धुरे, केसरकर आणि झाकीर नदाफ यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.

याप्रसंगी अनिरुद्ध केसरकर, परशुराम बामणे, परेश पोतदार, संजय पाटील, महेश खेडेकर, विठ्ठल उत्तूरकर, संतोष चौगले, गौतम भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिरसंगीत हत्तीचा धुमाकूळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी ता. आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून उन्हाळी पिकांसह उसाचे मोठे नुकसान सुरू केले आहे.

विजय बाजीराव देसाई यांच्या शेतामधील गावकामत या शेतामध्ये गेले चार दिवस तिचा वावर आहे दिवसा जंगलामध्ये रात्री नऊ नंतर शेतामध्ये प्रवेश करून त्या परिसरामधील ऊस, मका, गहू पिकाचे मोठे नुकसान सुरू केले आहे.

हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


आजरा कारखाना उपाध्यक्ष निवड दहा मार्च रोजी
अनिल फडके प्रमुख दावेदार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक १० मार्च रोजी दुपारी एक वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त संचालकांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळावी याकरिता प्रतिवर्षी उपाध्यक्ष बदलण्याचे यापूर्वी ठरले आहे. सध्याच्या एकंदर हालचाली पाहता सलग दुसऱ्या वेळी कारखाना संचालक पदी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनिल फडके यांची कारखाना उपाध्यक्षपदी एकमताने निवड होणार असल्याचे समजते. 

संजू सॅमसन नावात ९७
भारत सेमी फायनल मध्ये दाखल

वर्ल्ड कप २०२६ च्या सेमी फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १९५- ४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये १९.२ चेंडूत आव्हान पूर्ण करत विजय मिळवला. सलामीवीर संजू सॅमसन याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करत महत्त्वाची भूमिका साकारली. पहिल्या ओव्हरपासून मैदानात असलेल्या संजूने शेवटपर्यंत भारताला सामन्यामध्ये ठेवले होते. भारताचा आता सेमी फायनलमध्ये ५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडसोबत सामना होणार आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन

आजरा हायस्कूल, आजरा

आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यपक श्री. ए. एल.तोडकर ,उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस. कामत व सर्व विज्ञान शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये श्री एस.जी. नाईक यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामण यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो असे सांगितले. तसेच डॉ.सी.वी. रामन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थी मध्ये ईश्वरी ठाकूर, सोनाक्षी टोपले,गौरी शेलार, यशराज पाटील, साई घेवडे, आराध्य यादव स्वरूप कुंभार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्याध्यापक श्री. एल.तोडकर यांनी विज्ञान विषयाचा प्रत्येक विषयाशी सहसंबंध असतो असे विद्यार्थ्यांना सांगितले व विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन विज्ञान विभाग प्रमुख सौ.व्ही. एन. यादव तसेच उपप्रमुख श्री.आर.आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. जी. नाईक सर तर आभार सौ.एम.एस.शेलार यांनी मानले.

व्यंकटराव शिक्षण संकुल

येथील व्यंकटराव हायस्कूल, आजरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गुरव ए.एस यांनी केले.भारतरत्न डॉ.सी.वी.रमण यांचे प्रतिमापूजन प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, आणि पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांच्या हस्ते झाले. सर्व विज्ञान विषय शिक्षकांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. कु. नैशदा पाटील आणि अफिया भडगावकर यांनी आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांची माहिती सांगितली. त्याचबरोबर विज्ञान विषय शिक्षिका श्रीमती एम.एस. शिप्पुरकर यांनी शिक्षक मनोगतामध्ये विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. बालवैज्ञानिकांनी केलेल्या विज्ञान उपकरण प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे संचालक श्री सचिन शिंपी आणि प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आभारप्रदर्शन श्री.एम. एस. पाटील यांनी केले.

श्री सरस्वती हायस्कूल हात्तीवडे

२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उदय अमनगी हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न, नोबेल पारितोषिक विजेते महान शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी शोधलेल्या ‘रमन परिणाम’ या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.

प्रास्ताविकात  श्री. गजानन चिगरे यांनी सी व्ही रमण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील स्थान विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. जैवतंत्रज्ञानाचा शेती, वैद्यकीय क्षेत्र आणि अन्नउत्पादनातील उपयोग, भाडोत्री मातृत्वाची वैज्ञानिक पार्श्वभूमी, आधुनिक पशुपालन व कुक्कुटपालनातील तंत्रज्ञान, तसेच पारंपरिक ऊर्जा स्रोत (कोळसा, पेट्रोलियम) व अपारंपरिक ऊर्जा स्रोत (सौर, पवन, जैवऊर्जा) यांचा वाढता वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विषयक रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रांगोळी व मेहंदीच्या माध्यमातून अणुरचना, सौरमाला, ऊर्जा स्रोत, प्रयोगशाळा उपकरणे आदी संकल्पना कलात्मक पद्धतीने साकारल्या.

या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

भादवण हायस्कूल,भादवण

भादवण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामण आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

मुख्याध्यापक आर.जी.कुंभार,शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विज्ञानगीत सादर करण्यात आले.शिक्षक प्रशांत गुरव व विद्यार्थी श्रवण सुतार,पायल सुतार यांनी विज्ञानविषयक प्रेरणादायी फलकलेखन सादर केले.विविध स्पर्धा व सादरीकरणात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनोगत कार्यक्रमात वैदेही परीट,अश्विता सिमणे, अधिराज देसाई, तन्मय देवरकर, सुशांत खुळे, वेदांत गोईलकर, प्रतीक्षा डोंगरे, अमृता गारडे, श्रावणी सिमणे, प्रणाली ढेंगे, अधिराज डोंगरे, श्रवण सुतार या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व,दैनंदिन जीवनातील उपयोग आणि आधुनिक संशोधन यावर प्रभावी विचार मांडले. विविध वैज्ञानिकांचे कार्य,संशोधन आणि मानवजातीसाठी दिलेले योगदान सानिका वडराळे,आर्या कुंभार व अश्विता सिमणे यांनी मांडले.

विद्यालयात विज्ञान कक्ष निर्मितीचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका मुळीक व प्राची शिंत्रे यांनी केले तर आभार विज्ञान विषय शिक्षक प्रशांत गुरव यांनी मानले.

आजचे पंचांग

♦ दिनांक : २ मार्च २०२६
♦ वार : सोमवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : चतुर्दशी तिथी (रात्री ०७.०९ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा (होळी) तिथी
♦ नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (सकाळी ०७.५१ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
♦ योग : अतिगण्ड योग (दुपारी १२.१८ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
♦ करण : वाणीजा करण (सायंकाळी ०५.५५ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
♦ चंद्र राशी : कर्क राशी (सकाळी ०७.५१ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
 राहु काळ : सकाळी ०८.२६ ते सकाळी ०९.५५ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२७ ते दुपारी ०१.१४
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५८
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४३
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७

 

संबंधित पोस्ट

चाळोबा देव विकास आघाडीची प्रचार सभा

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!