mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार दि. १९ फेब्रुवारी २०२६

तिघांना अटक
आज न्यायालयासमोर हजर करणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वझरे (ता. आजरा) येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाबुराव कृष्णा पाटकर (वय ६०, व्यवसाय शेती, रा. वझरे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पाटकर यांच्या भावाचे घर बंद असताना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. संगनमताने चोरी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

या प्रकरणी राजवर्धन दत्तात्रय मांडरे (रा. कर्पेवाडी), प्रेम अनिल कांबळे (रा. वझरे) आणि अभिजीत अमृत आरेकर ( रा. उत्तूर, ता. आजरा ) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

उत्तूर परिसरातील चोऱ्यांचा उलघडा होणार…?

गेल्या काही दिवसापासून उत्तर परिसरातील ठिकठिकाणी होत असलेल्या चोऱ्या पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या आहेत. काल तिघांना रंगेहात पकडले गेल्यानंतर आता या परिसरातील यापूर्वी झालेल्या चोऱ्यांच्या उलघडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महागोंडला म्हैशीचा बंधा-यात पडून मृत्यू ; १ लाख ३० हजारांचे नुकसान

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महागोंड (ता.आजरा) येथे मारूती पांडुरंग कांबळे यांची म्हैस बंधा-याच्या पुलावरून पडून पात्रात खाली पडली. यामुळे म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. यामुळे कांबळे यांचे १ लाख ३० हजार रुपयाचे नुकसान झाले. म्हैस ही एकमेव उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाल्याने कांबळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळेल.

कांबळे यांनी मु-हा जातीची होती. तिची देखभाल चांगली केलेने दिवसाला १० लिटर दूध तीच्या पासून मिळत होते. या दुधाच्या पैस्यावर घरचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत होता. कांबळे म्हैशीला घेऊन वझरे रस्त्यावरील पातळी नावाचे शेताकडे गेले होते. चारा खाऊन परतत असताना बंधा-याच्या पुलावर आल्यावर म्हैस उधळली व तीने उडी मारली. १५ फुटांवरून ती आंबेओहळच्या पात्रात पडली. यामुळे तिचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नवीन म्हैस घेण्यासाठी सामाजिक संस्था अथवा व्यक्तीनी मदत करावी अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.

२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उडणार धुरळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील २६ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धडा लवकरच उडणार असून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

यामध्ये महागोंड/ महागोंडवाडी, मुम्मेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, बेलेवाडी हुll , हालेवाडी, चिमणे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, कोवाडे, मलिग्रे, शिरसंगी/यमेकोंड, वाटंगी/मोरेवाडी, पेद्रेवाडी, हात्तीवडे, होणेवाडी, कासारकांडगाव, मुरुडे, एरंडोळ, गवसे/आल्याचीवाडी, देवर्डे, हाळोली-मेढेवाडी- दर्डेवाडी, देवकांडगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रशासनाची एकंदर तयारी पाहता एप्रिल अखेर सदर निवडणूक कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.

आजरा कारखान्याच्या गळीत हंगामची सांगता

३ लाख ७ हजार टनाचे गाळप, गुलालाची उधळण करीत जल्लोष


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाची सांगता उत्साहात झाली. या गळीत हंगामात ३ लाख ७ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. ३ लाख ६० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. या वर्षी सरासरी ११. ८५ इतका साखर उतारा मिळाला आहे. हा उतारा समाधानकारक असल्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी सांगीतले.

गेले १०५ दिवस सुरु असणाऱ्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप कारखाना कर्मचारी व तोडणी कामगार, तोडणी आवेढणी वाहतूक यंत्रणेने गुलालाची उधळण करीत उत्साहात केला.

व्यंकटराव शिक्षण संकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांना  शुभेच्छा…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम श्री. जयवंतराव शिंपी (अध्यक्ष आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री कृष्णा पटेकर, सचिव श्री. अभिषेक शिंपी, संचालक श्री. पांडुरंग जाधव, श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव, श्री. विलास पाटील उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात श्री. जयवंतराव शिंपी  म्हणाले, आपल्या शालेय जीवनामध्ये आपण आई-वडील आणि गुरुजन वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आपले ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागा. त्या क्षणासाठी मेहनत करा ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं. यातून तुमचा आत्मविश्वास तर निश्चित वाढणारच त्याचबरोबर या देशाला एक होतकरू अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती युवक मिळेल. ज्याच्या खांद्यावर देशाचे भविष्य आहे.

यावेळी उपाध्यक्ष श्री कृष्णा पटेकर, सचिव श्री अभिषेक शिंपी, प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षक श्री. व्हि.एच. गवारी, विद्यार्थी मनोगतामध्ये प्रणव पाटील, सिमरन पाटील, माधवी आजगेकर, दिशा पाटील व शलाका गिरी यांनी आपले शाळेप्रती विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. एस.टी पाटील, सूत्रसंचालन श्रीम. आर एन पाटील, व आभार श्रीमती. एम व्ही बिल्ले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, इयत्ता दहावी सर्व वर्गशिक्षक, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आवंडी वसाहतीची शिवज्योत थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरून

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त आवंडी वसाहतीतील शिवप्रेमींनी थेट ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला येथून शिवज्योत’ आणण्यात येणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष संतोष चौगुले यांनी गावातील लहान मुले व शिवभक्तांना इतिहासाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा अनोखा संकल्प मांडला. त्यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पदयात्रेत मंडळाचे उपाध्यक्ष चेतन निकम, खजिनदार किरण निकम, ऋतिक फगरे, दिनेश कालेकर, अभिषेक चौगुले, करण कोले, संदेश कालेकर, प्रणव गावडे, सिद्धेश गावडे, विघ्नेश दारुटे, संकेत पाटील, सुशांत बांदेकर, अनिकेत कोले आदींसह अनेक शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आवंडी वसाहतीत शिवज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साळगाव येथील युवकांनी कलानंदी गडावरुन शिवज्योत


महाविज्ञान प्रदर्शनात भादवण हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवतेज तरुण मंडळ,शेळपवाडी आयोजित विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयातील महाविज्ञान प्रदर्शनात इयत्ता आठवी ते बारावी या मोठ्या गटामध्ये भादवण हायस्कूलच्या तन्मय किशन देवरकर इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तयार केलेल्या “स्मार्ट स्ट्रीट लाईट; सोलर एनर्जी सेवर” या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या आदेश दत्तात्रय पाटील या विद्यार्थ्याने सादर केलेले “स्वयंचलित अग्निशमन यंत्र” हे उपकरण विशेषतः शाळा,कार्यालये व घरांसाठी उपयुक्त ठरू शकते. आपत्कालीन परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करणारी ही प्रणाली अत्यंत प्रभावी असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. प्रमाणपत्र,ट्रॉफी व रोख तीन हजार रुपये बक्षीस देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक प्रशांत गुरव यांना गौरविण्यात आले.

निधन वार्ता
मारुती डोंगरे

भादवण ता. आजरा येथील ज्येष्ठ नागरिक मारुती रानबा डोंगरे ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. ते उत्तम डोंगरे यांचे वडील होत.

पेरणोली येथील शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

संयुक्त छञपती शिवजंयती सोहळा पेरणोली मंडळ यांच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🎉 कार्यक्रमाची रूपरेषा
🔸 सकाळी ६ वाजता आजरा येथील शिवस्मारकला वंदन करुण पेरणोली येथे येणे
🔸 सकाळी ६ वा. – प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण
🔸 सायकांळी ६ वा. पाळणा व महाआरती
🔸 सायकाळी. ६.३० वा. मिरवणुक
🌼 कार्यक्रमाचे आकर्षण
लेझीम / ढोल-ताशा पथक ग्रामस्थ मंडळ पेरणोली.
🔸 रात्रौ १० वा. – कार्यक्रमाची सांगता.

छाया वृत्त

शिवतीर्थ, उत्तुर तालुका आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील परिसर सुशोभीकरण, नूतनीकरण व लोकार्पण सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,स्थानिक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकालाचे रोखठोक विश्लेषण खालील लिंक वर पहा…

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह 17 लाखाचा मुद्देमाल ताब्यात अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस…दोघे जेरबंद….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!