mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार   दि. २९  डिसेंबर २०२५

स्टेटस’ बिघडवत आहेत तरुणाईचा ‘स्टेटस’

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

तरुणाई मधील एकमेकांना खुन्नस देणारे स्टेटस वादास व मारामारीस कारणीभूत ठरु लागले असून अल्पवयीन मुलांचे हे प्रताप पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत.

दहावी- अकरावीला असणारी मुले एकमेकांना खुन्नस देणारे, धमकी देणारे स्टेटस आपल्या मोबाईल वरून प्रसारित करतात. परिणामी ज्यांच्या करता हे स्टेटस लावले जातात ती मंडळी दुखावली जाऊन यातून वाद होऊ लागले आहेत. असाच प्रकार चार दिवसांपूर्वी आजरा येथे घडला. तब्बल सात ते आठ जणांनी एका तरुणाची स्टेटस लावल्यावर चांगलीच धुलाई केली. प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले परंतु यातील बहुतांशी मंडळी अल्पवयीन असल्याने कारवाईचा प्रश्न निर्माण झाला.

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरी अल्पवयीनचे लेबल असल्यामुळे या तरुणावर कारवाई करताना मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले आहे. या मारामारीच्या व्हिडिओ क्लिप्सही ठीक ठिकाणी व्हायरल झालेल्या आहेत.

मोबाईलवर स्टेटस आता तरुणाईचा स्टेटस बिघडवू लागले आहेत हे मात्र निश्चित.

ना वेळेवर पाणी ना घंटागाडी…
शहरात पुन्हा एक वेळ धूळ, चिखलाचे साम्राज्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरामध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे पाणीपुरवठा योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अनेकांची चावी कनेक्शन कट झाली आहेत. एकीकडे वेळेवर पाणी नसताना दुसरीकडे कचरा उचलणाऱ्या घंटागाडीचे वेळापत्रक ही कोलमडले आहे यामुळे शहरवासीयांना मोठा त्रास होऊ लागला आहे.

पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून पाणीपुरवठा विभाग नेमका करतो तरी काय ? असा प्रश्न निर्माण होण्याजोगी परिस्थिती आता तयार झाली आहे. कांही ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु मिळणारे पाणी पाहता पूर्वीचे होते तेच बरे होते असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांना आली आहे. केवळ पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी पद्धतीने शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेची अशी अवस्था असताना दुसरीकडे घंटागाडीचे नियोजनही पूर्णपणे कोलमडून गेले आहे. अनेक ठिकाणी खुदाई केल्यामुळे पाणी कनेक्शन तुटून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने घंटागाडी जाऊच शकत नाही तर दुसरीकडे गाड्या पाठवल्या जातच नाहीत अशा विचित्र परिस्थितीत सध्या आजरेकर आहेत. नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित कारभारी यांनी आता तातडीने सर्व सूत्रे आपल्याकडे घेऊन किमान पाणी व घंटागाडीची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचाली वाढल्या

आजऱ्यात इच्छुकांच्या जोर बैठका सुरू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने आजरा तालुक्यामध्ये इच्छुकांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींच्या ठिकठिकाणी बैठका होत असून इच्छुकांची चाचपणी जोरदार सुरू आहे.

सद्यस्थितीत आजरा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषदेचे दोन व चार पंचायत समितीचे मतदार संघ आहेत. पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषदे करता इच्छुकांची संख्या मोठी आहे.

तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस यासह इतर लहान मोठे घटक पक्षही सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन जागांकरिता सर्वच पक्षातील प्रमुख मंडळी इच्छुक आहेत .आघाड्या करत असताना‌ जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाचे दुखणे कायम राहणार आहे. यातूनच आघाड्यांमध्ये बिघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

इकडे जिल्हा परिषदेमध्ये जाण्याकरता इच्छुकांची संख्या मोठी असली तरी पंचायत समितीकरीता मात्र चित्र उलटे आहे. येथे नाईलाजाने काहींना उमेदवारीची सक्ती होण्याची शक्यता आहे.

एकंदर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय हालचाली गतिमान झाल्या आहेत .

१० जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम…?

१० जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असल्याचे पुढे येत आहे १० जानेवारी पासून हा कार्यक्रम सुरू झाल्यास ३० जानेवारीला मतदार व ३१ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचे समजते.

निधन वार्ता
मिनीन सोज

चर्च गल्ली, आजरा येथील .मिनिन फिलिप सोज ( वय ७१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

मच्छी व्यवसाय करणारे सोज हे येथील शांतीदूत सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक होते.

व्यंकटराव हायस्कूलचे यश


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेअंतर्गत व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यामध्ये कामत आर्णवी श्रीकांत, देसाई राजवर्धन रणजीत , पाटील अद्वैत महादेव ,पाटील आदित्य मनोज इयत्ता नववीचे 
गिरी आयुष ओमकार,चौगुले सानवी लक्ष्मण, जाधव राजवीर सुरज, तेजम संस्कार संजय, सय्यद हाजीक मोहम्मद इरफान, पाटील विवेक धनाजी ,पुंडपळ सौश्रुती अमित, निंबाळकर स्वराज प्रवीण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले व इयत्ता सहावी साठी सौ.व्ही.ए.वडवळेकर व नववीसाठी श्री. एम. एम. यलगार यांचे मार्गदर्शन लाभले.

 आजरा हायस्कूलचे यश


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता शिक्षण संस्था संचलित आजारा हायस्कूल आजरा मे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता सहावी व नववी मधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. इयत्ता सहावी मधील आराध्या यादव, राधिका नार्वेकर, सृष्टी मिटके,यशराज पाटील, आरोही पाटील,साई घेवडे, वैभवी कांबळे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना एम. एस. शेलार व, एस.बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. इयत्ता नववी मधील रागिनी कुंभार, मारिया दरवाजकर, अक्षरा पाटील,, प्रशांत पारपोलकर ,वेदिका पोतदार यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना सौ.व्ही.एन. यादव, श्रीमती ए. बी. डांग, सौ. एच. एस. कामत, आर. पी. केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

 

संबंधित पोस्ट

यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

संकेश्वर -बांदा रस्त्याचे काम रोखण्यासाठी मशिनरीना बांधली जनावरे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!