शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५


भाई भाई चित्रमंदिर समोर प्रचंड आग… दुकाने -गाड्या पेटल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आजरा आंबोली मार्गावरील पोलीस ठाण्यानजीक असणारी भाई- भाई चित्रमंदिर समोरील दुकान गाळ्यांना अचानकपणे शनिवारी सकाळी साडेपाच वाजण्याची सुमारास आग लागली.
सदर आगीमध्ये रस्त्याशेजारील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे जोराचा आवाज होऊ लागल्याने आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले. शॉर्टसर्किटने सदर आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आग वेगाने पसरताना दिसत होती. या दुकान गाळ्यांच्या खालील बाजूस कार रिपेरी गॅरेज असल्याने येथील गाड्यांची ही मोठे नुकसान होऊ लागले आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
याबाबतची नेमकी माहिती लवकरच देत आहोत.

दंग्याची भीती दाखवून वृद्धेकडून ७५ हजारांचे दागिने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शुक्रवारी आठवडा बाजारासाठी आलेल्या हौसा शामराव भाईंगडे या मडिलगे ता.आजरा येथील ६५ वर्षीय वृद्धेला पुढे दंगा झाला आहे तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा असे सांगत एक अनोळखी महिला व पुरुष यांनी तब्बल ७५ हजार रुपयांच्या दागिन्यांवर हातोहात डल्ला मारला.
सदर वृद्धा बाजार करत असताना या अज्ञातांनी पुढे दंगा सुरू आहे. पोलीस तपासणी सुरू असून दागिने काढा व रुमालात बांधून ठेवा असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मनी मंगळसूत्र, कर्णफुले, बुगड्या संबंधित महिलेने काढून त्या रुमालात बांधून ठेवल्या. त्यानंतर हातचलाकीने सदर रुमाल लांबवत दोघेही अज्ञात पसार झाले.
पोलीस हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.

प्रसंगी स्वतंत्रपणे लढण्याची कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी : माजी आमदार राजेश पाटील
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचा मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीत करून चंदगड नगरपंचायत निवडणूक लढवली आहे. याला काही अंशी यशही आले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चंदगड पॅटर्न घेवून पुढे जाणार आहे. यासाठी सकारात्मक चर्चा सुरु आहे. युती न झाल्यास प्रसंगी स्वंतत्र लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले.
येथील जे. पी. नाईक पतसंस्थेच्या सभागृहात आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, माजी आमदार पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी आपली मते व सूचना मांडल्या.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी आमदार श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेसाठी चंदगड पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न आहे. चंदगड नगरपंचायती प्रमाणे सोबत येतील त्यांना घेवून लढण्याची तयारी ठेवावी. महायुतीच्या घटक पक्षाच्याकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही. अनुभवही चांगले नाहीत. पक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका आहेत. यामध्ये नेत्यांनी उमेदवारीची अपेक्षा करू नये. कार्यकर्त्यांना संधी द्यावी. सोळाशे कोटीची विकासकामे करून चंदगड विधानसभेला अपयश आले. यातून बोध घेवून संघटीतपणे राहीले पाहीजेत. प्राप्त परिस्थिती पहाता कोणत्याही गटाशी युती करावी लागेल. छोट्या गावातील कार्यकर्त्यांना मतदार संख्येची मर्यादा येत असल्याने त्याला सहकारी संस्थात संधी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मदार के. पी. पाटील, राजेश पाटील जो आदेश देतील त्याच्याशी बांधील राहू.
अल्बर्ट डिसोझा म्हणाले, निवडणुक लढण्याची इच्छा आहे. पण पक्ष ज्या कोणाला संधी देईल त्याच्या पाठीशी राहणार. आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांचे भाषण झाले. वाटंगीतून पंचायत समिती जयराम संकपाळ, काशिनाथ भादवणकर, तानाजी राजाराम, संजय सांबरेकर, अशोक शिंदे, पेरणोली येथून कामिनी दौलती पाटील, सविता देवदास बोलके यांनी मागणी केली.
मारुती चव्हाण, मधुकर यलगार, एम. के. देसाई, संभाजी पाटील, राजू मुरकुटे, संजय पवार, दत्ता परीट, मारुती पोवार, सहदेव प्रभू ,नंदकुमार सरदेसाई, राजू जोशीलकर, अंकुश पाटील,विठ्ठलराव देसाई, रविंद्र होडगे, भिमराव वांद्रे, मारुती पोवार, सहदेव प्रभु, गणपती कांबळे, जनार्दन बामणे, शंकर सुतार याच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आजरा कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रवादीच्या महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेजीना फर्नांडीस यांनी आभार मानले .

निधन वार्ता
गंगाराम रांगणेकर

आजरा येथील गंगाराम रामचंद्र रांगणेकर (वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले,
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नवनाट्य मंडळाचे नेपथ्यकार अशी त्यांची ओळख होती.अमित रांगणेकर व नरेंद्र रांगणेकर यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन सोमवारी २९ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
पांडुरंग कांबळे

वझरे ता. आजरा येथील पांडुरंग बाबू कांबळे ( वय८२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

आजरा महाविद्यालयात शिक्षक–पालक मेळावा उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयातील, ज्युनिअर व्होकेशनल विभागात शिक्षक–पालक मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. एस. व्ही. गाईंगडे यांच्या प्रास्ताविक व स्वागताने झाली. त्यांनी मेळाव्याचे महत्त्व विशद करत पालक–शिक्षक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.यानंतर प्रा. जे. एम. कुंभार यांनी सीईटी परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना प्रवेश प्रक्रिया, अभ्यास पद्धती व भविष्यातील शैक्षणिक संधी यांची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रा. आर. एस. राजमाने यांनी बोर्ड परीक्षेसाठी प्रभावी तयारी, वेळेचे नियोजन, लेखन कौशल्य व परीक्षेतील संभाव्य चुका याविषयी मार्गदर्शन केले.
माननीय उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा व शिस्त निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत शिक्षा सूचीचे वाचन सर्वांसमोर केले. त्याचबरोबर या अभियानांतर्गत पालकांकडूनही कॉपीमुक्तीसंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य सादळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगत, पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. पी. संकेश्वरी यांनी केले तर आभार प्रा. एस. एन. फगरे यांनी मानले.

श्री कुरकुंदेश्वर देवाची यात्रा आजपासून
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आजरा तालुक्यातील पेरणोली गावचे जागृत देवस्थान श्री कुरकुंदेश्वर देवाची यात्रा आज शनिवार दिनांक २७ व उद्या रविवार दिनांक २८ रोजी संपन्न होत आहे.
गुरुवार दिनांक २५ पासून ब्राह्मण समाराधनि उत्सवाने यात्रेस सुरुवात झाली देवाची थळयात्रा करून रुद्राभिषेक पूजा, सतुबाई, चाळोबा व गणेश पूजन करण्यात आले आहे, शनिवारी रात्री देवाला घराणे घालून नवसाचे नारळ व बळीचा मान दिला जाणार आहे.
रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत महाप्रसाद केला जाणार आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री कुरकुंदेश्वर यात्रा समितीमार्फत करण्यात आले आहे.

विशेष सूचना...
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक

वसंतराव देसाई यांना अभिवादन…



