मंगळवार दि.३० सप्टेंबर २०२५


कथा टग्यांच्या…
व्यथा बांधकाम कामगारांच्या…
भाग : ३

♦ ज्योतिप्रसाद सावंत…
लोकसंख्या १ लाख २० हजार बांधकाम कामगार २५ हजार…
आजरा नगरपंचायतीसह तालुक्याची एकूण लोकसंख्या सुमारे १ लाख २० हजार इतकी आहे. आश्र्चय म्हणजे २५ हजारपेक्षा जास्त इतकी बांधकाम कामगारांची नोंद आहे. लोकसंख्येच्या २० ते २५ टक्के इतके बांधकाम कामगार असतील तर हा आकडा निश्चितच या विभागातील गैरकारभाराची साक्ष देणारा असेच म्हणावा लागेल.
या एकूण आकड्यापैकी शासकीय नोकर, शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी, सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांशी लागेबांधे असणारे असे सुमारे १० टक्के इतके तालुकावासिय बांधकाम कामगार अंतर्गत लाभ उठवत आहेत. नोंदणीसाठी
लागणारी प्रतिज्ञापत्रे बिनधास्तपणे कोणत्याही परिणामाची फिकीर न करता देण्यात आली आहेत. जी अवस्था ठेकेदारांच्या दाखल्याची तीच अवस्था प्रतिज्ञापत्रांची. एकीकडे खरोखरच बांधकाम कामगार म्हणून वर्षानुवर्षे झिजणारी मंडळी नैसर्गिक हक्काने नोंदणीपासून केवळ आर्थिक व्यवहार करू शकत नसल्याने वंचित आहेत. तर हजार पंधराशे रूपये जाईनात का परंतू हजारो रूपयांचा फुकटचा लाभ घेणाऱ्या मंडळींची मात्र तातडीने नोंदणी होताना दिसत आहे.
गेंड्याच्या कातडीचे बोगस लाभार्थी, त्यांना चिरीमिरीच्या अपेक्षने अभय देणारे संबधित विभागातील अधिकारी सर्व सावळा गोंधळ. या सर्व कारभाराची आता निपक्षःपाती पणे चौकशी होऊन संबधितावर कारवाई करण्याबरोबरच उपेक्षित बांधकाम कामगारांना न्याय देण्याचे धाडस अधिकारी वर्गाला होणार काय आणि ते व्हावे हीच अपेक्षा….

पाऊस तुफान,
लाखोंची पडझड..
जीवीतहानी मात्र नाही

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
१२ मे पासून आजरा तालुक्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. सातत्याने आक्टोंबर महिन्यापर्यंत गेल्या काही वर्षात झालेला हा विक्रमी पाऊस म्हणावा लागेल. पावसामध्ये घरे, शाळा, गोठे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. परंतू कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. हे यावर्षीच्या पावसाचे वैशिष्ट म्हणावे लागेल.
चालू हंगामात १२ मे पासून आजतागायत २ हजार मिलीमीटर इतका टप्पा पावसाने ओलांडला आहे. काल सोमवार अखेर शासन दफ्तरी २१७ घरांची तर ९ गोठ्यांची पडझड झाल्याची नोंद असून झालेल्या पंचनाम्यानुसार हे नुकसान सुमारे ५० लाख रूपयांचे आहे. नुकसान झाले आहे परंतू शासन दफ्तरी नोंद नाही अशी सुमारे ५० भर घरे व अन्य नुकसानही झाली आहे. पाऊस जोरदार व सातत्याने असला तरीही यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. चालू वर्षी ११७ दिवस पावसाची नोंद झाली आहे. पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत शेतकरी वर्ग आहे.
सदोष नोंदणी
या हंगामात झालेली पावसाची नोंद ही शासन दफ्तरी सदोष पद्धतीने झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सुमारे ६३ दिवस आजरा व गवसे मंडलमध्ये एकसारखा पाऊस झाल्याचे नोंद झाले आहे. याचा फटका गवसे मंडलमधील शेतकऱ्यांना बसत असून प्रत्यक्ष झालेल्या पावसापेक्षा कमी पावसाची नोंद गवसे मंडलमध्ये झाल्याचे सांगितले जाते. यामुळे अनेक दिवसांचा पाऊस हा शासन दरबारी अतिवृष्टी म्हणून नोंद झालेला नाही.

आजरा महाविद्यालयात आतराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यभर २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकारी दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आजरा महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक सादळे होते. यावेळी निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत असे सांगितले. अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर झाल्यास शासन दरबारी असणाऱ्या विविध योजनासह इतर सर्व उपक्रमांची माहिती मिळू शकते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. सादळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

वाटंगी येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ आरोग्य शिबीर उत्साहात
२८७ महिलांची तपासणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे २९ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण २८७ महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात २६६ महिलांची जनरल तपासणी झाली. यामध्ये १०९ महिलांची हिमोग्लोबिन आणि ६८ महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. कॅन्सर स्क्रीनिंगसाठी १४ महिलांची VIA Test करण्यात आली.
डॉ. शेख , डॉ. सौ.गॉडद (माहेर हॉस्पिटल), संत गजानन हॉस्पिटलची टीम, आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.
शिबिरात रक्त तपासण्या, दंत तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, पोषण मार्गदर्शन आणि कर्करोग तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या. सरपंच सौ. इंदू कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. माजी पं.स. सभापती अल्बर्ट डिसोजा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

‘पार्वती-शंकर’च्या चौघींची जिल्हास्तरीय योग स्पर्धेसाठी निवड

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या चार विद्यार्थिनींनी शासकीय क्रीडा स्पर्धेतील तालुकास्तरावर चमकदार यश मिळवत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.१४ वर्षाखालील मुलींच्या रिदमिक पेअर प्रकारात तसेच आर्टिस्टिक पेअर प्रकारात स्वरा विक्रम गोडसे (इ.६ वी) व नव्या विनायक देवर्डे (इ.८ वी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वैयक्तिक योगासन स्पर्धेत गौरी साळुंखे (इ.८ वी), अनघा पाटील (इ.१० वी) व नव्या देवर्डे (इ.८ वी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय गौरी साळुंखे (इ.८ वी) हिने आर्टिस्टिक सिंगल प्रकारातही अव्वल येत दुहेरी यशाची नोंद केली.
या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थिनींना संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, संचालक व प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वोदय विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळेरान ता. आजरा येथील सर्वोदय विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष लहू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संस्थेला आर्थिक वर्षात ६ लाख २२ हजार ४३१ इतका निव्वळ नफा झाला असून ११ टक्के लाभांश देणार असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष लहू पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या ठेवीदार सभासदांना ४ टक्के व्याज देण्याचा ठराव करण्यात आला. सभेमध्ये सचिव दिलीप पाटील यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले. सभेस उपाध्यक्ष आनंदा खरुडे, निवृत्ती अडकुरकर, चंद्रकांत जाधव, मारियन बार्देस्कर, उत्तम खरुडे, अशोक तांबेकर, वैष्णवी पाटील सत्वशिला शेटगे, सरपंच शशिकांत कांबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

दाभिल येथे दशावताराला उत्फुर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल ता.आजरा येथील शिवशंभो सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने दशावतार नाटक आयोजित करण्यात आले होते. यावेळी नाटकाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. जगन्नाथ परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री देव हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे, ता. सावंतवाडी यांचा शतघुबडेश्वर दशावतार नाटक सादर करण्यात आला. रात्री १० वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी दाभिलसह पंचक्रोशीतील नाट्यप्रेमींनी याचा लाभ घेतला.

छायावृत्त…

लकमेश्वर मंदिर, गजरगाव येथे नवरात्रीनिमित्त बेलाची ५१ झाडे लावण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी श्याम गुरव, सुरज गुरव, संजय गुरव, यांच्यासह प्रकाश देसाई,अभिजीत सुतार, अशोक देसाई,परशराम धनुकटे,विद्या गावडे, रत्नाबाई वांद्रे, राजश्री वड्ड, दत्तू मोहिते, संतोष पाटील, नीलम चव्हाण, काशव्वा चव्हाण व गजरगाव ग्रामस्थ उपस्थित होते.


आज तालुक्यात…
कोकण विकास सोसायटी पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा आयोजित महिलांची नेतृत्व विकास कार्यशाळा यरंडोळ ता. आजरा येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे.
आज शहरात…
आजरा येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर परिसरात होणारी डोक्यावरील आरती/ जागर आरती आज सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.



