शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५

एमआयडीसी चोरी प्रयत्न प्रकरणी चौघांना अटक
मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी

काजू प्रक्रिया उद्योगांमध्ये बऱ्यापैकी मुद्देमाल हाताला लागेल अशा उद्देशाने बंदूक सदृश हत्यारासह तलवारीने दमदाटी करून एमआयडीसी आजरा येथील शिवाजी पाटील यांच्या मालकीच्या कारखान्याचे कुलूप गॅस कटरने तोडून मुद्देमाल हडप करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून चौघांना अटक करून आजरा न्यायालयासमोर हजर केले असता चौघांनाही मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री एमआयडीसीत असणाऱ्या श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज नावाच्या काजू कारखाना परिसरात नऊ ते दहा चोरट्यांनी प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहण्याने कारखान्याशेजारी रहात असणाऱ्या कामगारांना मारहाण केली. बंदूक सदृश्य हत्यारासह तलवारीने धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून कारखान्यातील काजूगर व बियांची चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांच्या हाती काही लागले नव्हते.
सदर चोरट्यांनी केलेल्या या धाडसी प्रयत्नाची गंभीर दाखल पोलीस खात्याने घेतली असून या परिसरात असणारे सीसीटीव्ही कॅमेरे यासह विविध माहितीच्या आधारे पोलिसांनी सद्दाम हुसेन सलीम रफुगार, वय ३४ रा. संकेश्वर, चनाप्पा बसाप्पा गुगरी वय २४ रा. अर्जुनवाड, रोहित मारुती बोंगार्डे वय ३० रा. गायकनवाडी/ निपाणी व युवराज आप्पासाहेब आढाव वय २७ रा. गायकनवाडी/निपाणी या चौघांना अटक केली आहे. त्यांना आजरा न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
संकेश्वर येथून दुचाकी चोरीला…
कोवाडे तालुका आजरा येथील आनंदा चौगुले यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल संकेश्वर येथून चोरीला गेली असून सदर गाडीचा नंबर एम एच ०९ एफडी ८५३९ असा आहे सदर गाडी कोणाला आढळून आल्यास ८८५७९३२४०५ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे रानभाजी महोत्सव उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय येथे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सवाचे पार पडला. अध्यक्षस्थानी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष आण्णाप्पा पाटील होते.
या महोत्सवात स्थानिक शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की “मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात ऋतुमानानुसार रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.”
स्पर्धेत तब्बल ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी रानभाजी रोपांचे माहितीपर प्रदर्शन भरवून उपस्थितांचे लक्ष वेधले.
स्पर्धेतील विजेते..
प्रथम क्रमांक – सौ. शुभांगी धनाजी राणे (वेळवट्टी)
द्वितीय क्रमांक – श्रीमती. नंदा सदाशिव सावंत (गारगोटी)
तृतीय क्रमांक – सौ. प्रियांका मोहन पायरेकर (आजरा)
चतुर्थ क्रमांक – सौ. मीरा गंगाराम हरेर (हात्तिवडे)
पाचवा क्रमांक – सौ. विमल दशरथ कसेकर (दर्डेवाडी)
उत्तेजनार्थ पुरस्कार सौ. वर्षा कृष्णा होडगे (यमेंकोड), सौ. सरिता बाळासाहेब पाटील (सरोळी) व सौ. सुगंधा परशराम हरळकर (चाफवडे) यांना देण्यात आले.
विजेत्यांना सन्मानचिन्ह, गृहोपयोगी भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला म्हाळसाकांत देसाई (नायब तहसीलदार, आजरा), डॉ. सुधीर मुंज (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था), भुषण पाटील (तालुका कृषी अधिकारी), संजीव देसाई (प्राचार्य, पं. दीनदयाळ विद्यालय), रामकृष्ण मगदूम (प्राचार्य, नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूर) आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष आण्णाप्पा पाटील होते.

झेप अकॅडमी हा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्लॅटफॉर्म : शैलजा चव्हाण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित, झेप अकॅडमीमुळे गडहिंग्लज व आजरा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. झेप अकॅडमी हा आजरा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील करिअरसाठी सुसज्ज प्लॅटफॉर्म उभा राहीला आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले करिअर घडवावे असा सल्ला आजरा येथील सह. दुय्यम निबंधक मा. शैलजा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ज्ञानदीप प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार झेप अकॅडमीच्या शाखा आजरा येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीविषयी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थेचे संस्थापक संचालक व विद्यमान आजरा शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. शिवशंकर उपासे होते. ज्ञानदीपचे संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, श्री. महेश मजती यांची प्रमुख उपस्थिती होती.
शैलजा चव्हाण म्हणाल्या, ग्रामीण भागातून अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडावेत, यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी, आशावादी राहावे, कष्टाची तयारी ठेवावी, वेळेचे योग्य नियोजन करुन अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळेल.
यावेळी रवळनाथचे सीईओ श्री. डी. के. मायदेव, आजरा शाखा चेअरमन प्रा. डॉ. विनायक आजगेकर, शाखा सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. गणपती नाईक, प्रा. राजीव टोपले, श्री. गौतम सुतार, सौ. सुरेखा भालेराव व सौ. नुरजहाँ सोलापुरे, श्री. जनार्दन दळवी यांच्यासह झेपचे विद्यार्थी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शिवसेना सभासद नोंदणीस आजऱ्यात सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा पालक मंत्री कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीचा सुरुवात उपजिल्हा प्रमुख श्री. राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख श्री संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली.
त्या प्रसंगी आजरा जि.प. संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र भोसले, उपतालुका प्रमुख काकासो देसाई, आत्मा कमीटी आध्यक्ष इंद्रजीत देसाई, शहर प्रमुख विजय थोरवत, दयानंद निऊंगरे,युवराज पाटील, सुनिल दिवेकर, रणजीत सरदेसाई, विजय कोंडुस्कर व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.
तालुका प्रमुख श्री. संजय पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उप मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणेसाठी पहिल्या टप्यात पाच हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करणार कसून एक हजार क्रियाशिल सदस्य नोंदणी या चार दिवसात पूर्ण करणार असे सांगीतले.
गणेशोत्सवानिमित्त भव्य उत्तूर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
(मंदार हळवणकर)
बाजारपेठ मित्र मंडळ, उत्तूर यांच्यातर्फे यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त भव्य उत्तूर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता होणार असून स्पर्धेसाठी लहान गट, मध्यम गट व खुला गट असे तीन विभाग ठेवले आहेत.लहान गटात (१४ वर्षांपर्यंत) मुलांसाठी २ कि.मी., तर मध्यम गटात (१४ ते १७ वर्षे) मुला-मुलींसाठी ३ कि.मी. अंतराची शर्यत असेल. खुल्या गटात (१७ वर्षांवरील) मुलांसाठी व मुलींसाठी ५ कि.मी. अंतराची स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना १५०१/- रुपये, १००१/- रुपये, ७०१/- रुपये, ४०१/- रुपये व ३०१/- रुपयांची पारितोषिके तसेच चषक देण्यात येणार आहेत.
सर्व स्पर्धकांना अल्पोपहाराची सोय मंडळातर्फे केली जाणार असून स्पर्धा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात गावातील तरुणाईला क्रीडास्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

इंदिरानगर-उत्तूर येथे बुद्धिबळ स्पर्धा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इंदिरानगर-उत्तूर येथे अवधूत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आणि चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने गणेशोत्सवानिमित्त सर्वसाधारण एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता अवधूत गल्ली, इंदिरानगर-उत्तूर येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाला ३००१/+ रुपये, द्वितीय क्रमांकाला २००१/- रुपये, तृतीय क्रमांकाला १५०१/- रुपये तर पुढील क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्रे देण्यात येतील. तसेच ८, ११, १४ वर्षांखालील मुले-मुली, ज्येष्ठ गट, दिव्यांग गट आणि उत्तूर गावातील खेळाडूंसाठीही स्वतंत्र पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार खेळवली जाणार असून सकाळी ९ वाजता उद्घाटन होईल. या स्पर्धेमुळे स्थानिक व जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना आपली चमक दाखविण्याची उत्तम संधी मिळणार आहे.इच्छुकांनी ३० ऑगस्टपर्यंत रोहित पोळ, महेंद्र कामत, शंकर सावंत, देवदत्त काळगे, प्रथमेश बर्डे, सोहित पोल सर, मंदार काळे सर, स्वप्नील शेलार सर, राज पाटील, साईनाथ शेलार, संकेत पाटील. यांच्याशी संपर्क साधावा.
निधन वार्ता
मृणाल कालेकर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील मृणाल मारुती कालेकर (वय २३) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यामागे आई, वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.
जनता बँक लिमिटेड आजरा चे शाखा व्यवस्थापक मारुती कालेकर यांचे ते पुत्र होत. रविवार (ता.३१) रक्षा विसर्जन सकाळी९ वाजता आहे.
निधन वार्ता
मारुती इळके

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धामणे ता. आजरा येथील मारुती लक्ष्मण इळके यांचे (वय ७६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रक्षाविसर्जन रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी धामणे येथे होणार आहे.
गणेश दर्शन...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा (वर्ष ९७ वे )

अध्यक्ष : किशोर म्हापसेकर
उपाध्यक्ष : किशोर पारपोलकर
सचिव : दीपक कुरुणकर
खजिनदार : गौतम देशपांडे
आदर्श युवा ग्रुप, उत्तुर

कार्याध्यक्ष : श्री.जोतिबा मारुती पोवार
अध्यक्ष : श्री.विनायक बाळासाहेब सावेकर.
उपाध्यक्ष : श्री.अजित बाळासो वांद्रे.
खजिनदार : श्री.सुधीर विठ्ठल साळुंखे.
सचिव : श्री.रोहीत शिवाजी येसादे
महाप्रसाद आज शनिवारी सायंकाळी ७ नंतर
सार्वजनिक गणेश मंडळ वेळवट्टी (सुधीरभाऊ देसाई प्रेमी)

अध्यक्ष : अमोल देसाई.
उपाध्यक्ष : शंकर सुतार व नागेश सुतार
समता तरुण मंडळ, उत्तुर

अध्यक्ष : जगन्नाथ रणनवरे
उपाध्यक्ष : मारुती जाधव
खजिनदार : भैरू निउंगरे
सचिव : सर्जेराव धुरे

निधन वार्ता
तुकाराम पाटील

आरदाळ ता.आजरा येथील जेष्ठ नागरिक तुकाराम आप्पा पाटील (तात्या) यांचे अल्पशा आजराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ८ वाजता आरदाळ येथे करण्यात येणार आहेत.


