शुक्रवार दि.६ डिसेंबर २०२४

लाडक्या बहिणीं समोरील अडचणी वाढणार…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महायुतीला सत्तेचा मार्ग सुखकर करून देणा-या लाडक्या बहिणींना मात्र आता कागदपत्रे पडताळणीच्या दिव्यातून मार्गक्रमण करावे लागणार असून यामधून कागदपत्रांची पडताळणी न झालेल्या व अपात्र अशा बहुतांशी लाडक्या बहिणींना वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दिवाळीपूर्वी बहुतांशी महिलांना सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे ७५००/- रुपयांची सरकारकडून भेट देण्यात आली होती . समोर निवडणुका असल्याने ज्यांनी अर्ज भरला त्या बहुतांशी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. कागदपत्रांची पडताळणी करण्याइतपत वेळ नसल्याचा गैरफायदाही अनेक नोकरदार व अपात्र महिलांनी घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने या योजनेच्या निधीत वाढ करून तो २१००/- रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन दिले होते. या निधीतून वाढ करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या असून निधीत वाढ करत असताना अपात्र लाभार्थ्यांचा सरकारी तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कागदपत्रांची तपासणी झाल्यास एकूण लाभार्थ्यांमध्ये घट होऊन लाभार्थी संख्या निम्म्यावर येण्याची शक्यता असल्याने आता या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी सुरू होणार आहे. कागदपत्रांबरोबरच प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन शासकीय कर्मचारी लाभार्थ्यांची माहिती घेणार आहेत.
यापुढे ही योजना सुरूच राहणार असल्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे मात्र योजना सुरू राहत असताना अनेक अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून बाजूला व्हावे लागणार आहे.
सत्ता स्थापनेनंतर आज-यात जल्लोष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्या वतीने महाराष्ट्रात महायुतीची स्थापना स्थापन होऊन श्री. देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ विधी झाल्याबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यांच्या आजरा शहरात जोरदार आतषबाजी करत साखरं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे आजरा तालुका अध्यक्ष बाळ केसरकर, अरुण देसाई, डॉ .सुधीर मुंज, ओ.बी.सि जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, अनिल कुमार पाटील, नाथा देसाई, राजेंद्र चंदनवाले, विनोद जाधव, अभिजीत रांगणेकर, रोहित बुरुड, शुभम पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर
अन्याय निवारण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात गेल्या दोन वर्षापासून एकदिवस आड मिळणारे पाणी, उखडलेले रस्ते, करोडो रुपये खर्चुन आणलेली पाणी योजना रेंगाळलेले काम सुरू होण्यापूर्वीच बंद पडलेला घनकचरा प्रक्रिया उद्योग, निकृष्ट दर्जाचे बांधलेले गटर्स व शहरातील असुविधांबद्दल अन्याय निवारण समितीने थेट जिल्हाधिकारी यांच्या दरबारात ऑनलाइन निवेदन देऊन न्याय मागितला. निवेदनाच्या प्रती आजरा नगरपंचायत, तहसीलदार प्रांताधिकारी यांना देण्यात आल्या.
आजरा शहरातील रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायत आहे. मात्र, कामाच्या कोणत्याही निविदा प्रसिद्ध न करता फक्त कार्यालयीन कागदपत्रे तयार करून मर्जीतील ठेकेदार व उपठेकेदारामार्फत कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. नळपाणी पुरवठा योजनेची सद्यस्थिती, शिवकॉलनीतील सांडपाण्याची व्यवस्था, गटार व रस्त्याची कामे निविदा काढून नोंदणीकृत ठेकेदारामार्फत करून घेणे व त्याचा नकाशा सोबत ठेवणे, भारतनगरमधील अर्धवट गटर व पाणीगळती, चाफेगल्लीतील दूध डेअरी पाठीमागील अडविलेला रस्ता खुला करणे, वाणी गल्लीच्या
सांडपाण्याचा निचरा करणे, पाणीपुरवठा ठेकेदारासोबत बैठक लावणे, समर्थ कॉलनीतील चुकीची बांधलेली गटर काढून नवीन बांधकाम करणे, बळीराम देसाई नगरातील पाणीपुरवठा सुरळीत करून गटर व रस्ते पूर्ण करणे, रवळनाथ कॉलनीतील अंगणवाडी शेजारील चोरीला गेलेल्या बोअरवेलचा तपास करणे, यासह विविध ठिकाणच्या गटर्स, रस्ते, पाणी या नागरी सुविधा देण्याबाबत तक्रारी आहेत.
निवेदनावर परशुराम बामणे, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव यासह नागरिकांच्या सह्या आहेत.
होनेवाडी येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडी ता. आजरा येथे शनिवार दिनांक १४ व रविवार दिनांक १५ रोजी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री दत्तगुरु व ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवाच्या अभिषेक सोहळा त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत माजी विद्यार्थी संघटनेमार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तर दुपारी तीन वाजता राजर्षी शाहू व्यायाम शाळे मार्फत गाव मर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धा, सायंकाळी साडेसहा वाजता श्री दत्त जन्म काळ व महाआरती व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी साडेआठ वाजता जिजा शिवकालीन शस्त्र कलापथक गडहिंग्लज यांचा शिवकालीन मर्दानी खेळांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्या पासून दत्तगुरूंच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार असून या पालखी सोहळ्यामध्ये विविध भजनी मंडळे, लेझीम पथके, हलगी वादक पथके, वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता माऊली संगीत सोंगी भजन साके यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत वाटंगी शाळेची जनरल चॅम्पियनशिपवर मोहोर…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे येथे नुकत्याच शिरसंगी केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.यास्पर्धेत सुमारे २५ प्रकारात बक्षीसे मिळवून वाटंगी शाळेने जनरल चॅम्पियनशिपवर मोहर उमटवत केंद्रात वर्चस्व निर्माण केले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे –
लहान गट- मुले
कबड्डी – द्वितीय ,५० मीटर धावणे – प्रथम – तेजस ज्ञानदेव पारसे १०० मीटर धावणे – प्रथम – तेजस ज्ञानदेव पारसे,द्वितीय – सुमित सुरेश बिरजे , उंच उडी – प्रथम तेजस ज्ञानदेव पारसे,द्वितीय – सुमित सुरेश बिरजे ,लांब उडी- प्रथम सुमित सुरेश बिरजे,कुस्ती – ३५ किलो वजनी गट- प्रथम श्री विठ्ठल दळवी .
मोठा गट-
कबड्डी – मुली – प्रथम मुले -द्वितीय
१०० मीटर धावणे – तृतीय – सोहम एकनाथ कसलकर ,४०० मीटर धावणे – प्रथम – ओंकार तातोबा आडूळकर,६०० मीटर धावणे – प्रथम – जगन्नाथ चिमाजी कोकरे ,उंच उडी प्रथम – जगन्नाथ चिमाजी कोकरे,तृतीय- जयदीप जयवंत सावंत,लांब उडी- तृतीय जगन्नाथ चिमाजी कोकरे , रिले- ४ ×१०० द्वितीय ,मुली १०० मीटर धावणे – प्रथम – श्रावणी जानबा कांबळे ,२०० मीटर धावणे – प्रथम – श्रावणी पंढरीनाथ बिरजे ,६०० मीटर धावणे – प्रथम – श्रावणी जानबा कांबळे, उंच उडी- तृतीय – मनाली मुकुंद बुडके लांब उडी -प्रथम – श्रावणी पंढरीनाथ बिरजे
थाळीफेक-प्रथम – श्रावणी पंढरीनाथ
बिरजे ,तृतीय- रोशनी राजेंद्र घेवडे
गोळा फेक – प्रथम – श्रावणी पंढरीनाथ
बिरजे ,रिले – ४ ×१०० – प्रथम
या सर्व स्पर्धांना श्रीमती अनुजा केने, श्रीमती रंजना हसुरे, सौ. अनिता कुंभार तसेच अविनाश मलगोंडे , अभिजीत पिंगळे , धोंडीबा डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक सुनिल कामत यांचे प्रोत्साहन मिळाले.





