


तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
महिनाभरात ५६ जणांचे तोडले लचके

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून महिनाभरात आजरा ग्रामीण रुग्णालयात तब्बल ५६ जणांनी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या जखमांवर उपचार घेतले आहेत. इतरत्र असणाऱ्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणा-यांची संख्याही मोठी आहे. तालुकाभरात शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहू लागले आहे असेही यातून स्पष्ट होत आहे.
आजरा शहरांमध्ये दररोज एक दोन शहरवासींयांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होताना दिसतात. तालुक्यामध्ये इतरत्र फारशी वेगळी परिस्थिती नाही. आजरा शहरात तर गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. नगरपंचायतीकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतानाही याकडे प्रशासनाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होताना दिसते.
विशेषतः वृद्ध नागरिक, महिला व शाळकरी मुले यांना भटक्या कुत्र्यांकडून लक्ष्य बनवले जात आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार तरी कधी ? असा प्रश्न आता तालुकावासीय उपस्थित करत आहेत.
माकड, गवे आणि मांजरांकडूनही हल्ले
तालुक्यात केवळ भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आहे असे नाही तर गव्यांकडून हल्ल्यात जखमी होणे, मांजर व माकडांच्या हल्ल्याच्या जखमी होणे अशा प्रकारचे रुग्णही रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.



आज-यात गीत रामायण कार्यक्रम उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
नवनाट्य कला मंच, आजरा आयोजित आणि दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि, आजरा (मल्टी-स्टेट) च्या वतीने ग. दि. माडगुळकर व सुधीर फडके यांनी अजरामर केलेली गाणी श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्ताने गीत रामायणाचे आयोजन आजरा महाविद्यालय आजरा चे प्रांगणात केले होते.
गीतकार श्रीधर सुधीर फडके व त्यांचे सहकारी यांनी गीत रामायणाचे सादरीकरण केले असून सदर कार्यक्रमाचे निवेदन सुकन्या जोशी यांनी केले. सदर कार्यक्रमाला आजरा व पंचक्रोशीतील जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बँकेचे व्हाट्सअप बँकिंग व फ्रिक्शन लेस कस्टमर ऑनबोर्डींग या सुविधांचे उदघाटन गीतकार श्रीधर सुधीर फडके यांचे हस्ते करणेत आले.
सदर कार्यक्रमाला अण्णा-भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी, बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा. चेअरमन सुनील मगदुम, यांच्यासह सर्व संचालक , अण्णा भाऊ संस्था समूहाचे सर्व पदाधिकारी आजरा शहरातील प्रतिष्ठित व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर यांनी मानले.



भावपूर्ण वातावरणात सुनील हारगुडे यांना निरोप…

आजरा : प्रतिनिधी
गेली अडीच वर्षे आजरा पोलीस ठाण्याचा कार्यभार सक्षमपणे हाताळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांची बदली झाल्यामुळे त्यांना आजरा तालुकावासीय व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
यावेळी यांचा कार्यभार स्वीकारलेले नूतन साहेब पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांचे स्वागत करण्यात आले.
आजरा तालुक्यातील आपली कारकीर्द स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडली. यापुढेही आपणाला आजरा तालुक्यात काम करणे आवडेल अशी प्रतिक्रिया यावेळी हारुगडे यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन वायदंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.



गव्याच्या हल्ल्यातील जखमीस शासनाकडून मदत

आजरा: प्रतिनिधी
गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पेरणोली ता. आजरा येथील शालन दारुडकर या महिलेला शासनाकडून आलेल्या सव्वा लाखांच्या मदतीच्या निधीचा धनादेश जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर,आजरा परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी वनपाल बाळेश न्हावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



प्रज्ञाशोध करिता निवड

आजरा : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर मार्फत घेण्यात येणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेत पं. दीनदयाळ विद्यालयातील कु.दर्श बिपिन परळकर व कुमारी सर्वस्वी सचिन पाटील या दोघांची प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली .
त्यांना प्रभू पी. जी ,सौ. निर्मळे एस. ए.,पाटील ए. एन. यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक संजीव देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.



शिरसंगी येथे आजपासून पारायण सोहळा

आजरा प्रतिनिधी
शिरसंगी येथे आज दि. ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला आहे.
या सप्ताहात प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार असून व्यासपीठ अधिकारी म्हणून ह भ प बाळासो विठ्ठल सुतार हे असणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या पारायण सोहळ्यामध्ये ह.भ. प. डॉ. विश्वनाथ पाटील महाराज जट्टेवाडी ता. चंदगड श्री. बाळासाहेब रानमाळे महाराज शिरगुप्पी, निपाणी ,श्री. तानाजी पाटील, कोरीवडे, श्री. सुभाष शिंत्रे, अन्नुर ता. कागल, श्री. बाबुराव गावडे यमेटे ता.चंदगड , श्री अरुण जाधव, वाटंगी, श्री अर्जुन जाधव तवंदी, शिरपूर, यांच्या प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होईल.
दिनांक सात रोजी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल .




