


आज-यातील वाहनचालकाचा पाटणे- हलकर्णी मार्गावर अपघाती मृत्यू
इकबाल अहंमद मुल्ला (वय ४५, रा. अमराई गल्ली, आजरा) या वाहनचालकाचा हलकर्णी फाट्यापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या वळणावर ट्रक पलटी होऊन मृत्यू झाला. गाडीतील दोन बैलही मृत पावले आहेत. सकाळी लवकर मालवाहू ट्रक मधून जनावरे घेऊन इकबाल कोकणातून बेळगावच्या दिशेने चालला होता. इकबाल हा सेवानिवृत्त शिक्षक अहंमद मुल्ला यांचा चिरंजीव तर माजी सरपंच स्व.असलम खेडेकर यांचा मेहुणा होता.
बटकणंगले जवळील अपघातात वाघराळी येथील तरुण ठार
नेसरी- गडहिंग्लज मार्गावर बटकणंगले (ता.गडहिंग्लज) येथे लाकुडवाडी घाट फाट्यानजीक झालेल्या अपघातात किरण दत्तात्रय पाटील (वय ३२ रा.वाघराळी ता. गडहिंग्लज ) हा तरुण जागीच ठार झाला. रविवारी सायंकाळनंतर झालेला सदर अपघात सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला. वर्षभरापूर्वी विवाह झालेला किरण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुंबई येथे कामाला असणारा किरण सध्या लॉकडाऊन नंतर गावी होता. त्याच्या निधनामुळे वाघराळी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
चव्हाणवाडी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता
चव्हाणवाडी (ता.आजरा) येथून महाविद्यालयात जातो असे सांगून बाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता असून अद्याप ती परतलेली नाही याबाबतची वर्दी मुलीच्या वडिलांनी उत्तुर पोलिसात दिली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी हेरे येथील दोघा विरोधात गुन्हा नोंद
हेरे (ता.चंदगड) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निसार रशीद आगा व अल्फान अब्दुल करीम शेख या दोघा संशयितांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .शाळकरी मुलीचा पाठलाग करणे व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाटणे फाटा येथील मटका अड्ड्यावर छापा
चंदगड पोलिसांनी पाटणे फाटा येथे मटका घेणाऱ्या उत्तम लक्ष्मण नाईक या बुकीवर छापा टाकून त्याला मटका घेण्याच्या साहित्य व रोख रुपये ५३१२ सह ताब्यात घेतले.
पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू
नागनवाडी (ता.चंदगड) येथे यशोदा विठोबा गावडे या ८८ वर्षीय महिलेचा ताम्रपर्णी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. कोनेेवाडी पूल ओलांडताना तोल जाऊन पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हलकर्णी येथील विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता
हलकर्णी (ता. चंदगड) येथील ललिता विष्णू नाईक (वय ४०) ही विवाहिता आपल्या अनुक्रमे बारा व सहा वर्षीय मुलांना घेऊन बेपत्ता असल्याची फिर्याद महिलेच्या पतीने पोलिसात दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत . (क्राईम न्यूज प्रतिनिधी)


