सुळे येथे पत्नीचा डोक्यात हातोडासदृश्य वस्तू घालून पतीकडून खून

आजरा : प्रतिनिधी
सुळे ता. आजरा येथील सुमन संभाजी पोवार या ४५ वर्षीय महिलेचा पती संभाजी ईश्वरा पोवार याने चारित्र्याचा संशयावरून डोक्यात हातोडासदृश्य हत्याराने वार करून खून केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती संभाजी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्ह्याची कबूली दिल्याचे समजते.

सौ.सुमन व संभाजी पोवार हे दाम्पत्य एकत्र रहात होते. संभाजी पोवार यांची सुमन ही दुसरी पत्नी आहे. या दाम्पत्याची तीनही उच्चशिक्षित मुले पुणे येथे रहातात. सध्या सुळे येथे दोघेच पती पत्नी रहात होते.
या दोघांमध्ये वारंवार सौ.सुमन यांच्या चारित्र्यावरुन वाद होत असत. काल रात्रीही त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा संभाजी याचा सौ.सुमन यांच्याशी जेवणावरुन वाद झाला. या वादानंतर दोघेही हातघाईवर आले. रागात संभाजी यांनी हातोडा सुदृश्य हत्याराने सौ. सुमन यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामध्ये सुमन या जागीच मयत झाल्या.

या प्रकारानंतर संभाजी हा नेहमीप्रमाणे मुख्य घराच्या पाठीमागून बाजूस असलेल्या दुसऱ्या घरामध्ये झोपण्यासाठी निघून गेला. दरम्यान सकाळी तो मुख्य घरी आल्यावर सुरुवातीला स्थानिक पोलीस पाटील यांना आपली पत्नी झाली आहे असे सांगत रात्री झालेल्या वादातून सुमनना आपण फक्त ढकलले होते असे सांगितले. स्थानिक नागरिकांनाही सुरुवातीला संभाजी याचे सांगणे पटले होते. परंतु नंतर स्थानिक पोलिसांनी संभाजी यांच्यावर उलठ-सुलट प्रश्नांचा मारा केला असता त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
सौ सुमन यांचे बंधू पांडुरंग धोंडीबा वळतकर रा. तावरेवाडी ता. गडहिंग्लज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संभाजी आला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे सुळे गावात खळबळ उडाली असून स.पो.नि.सुनिल हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


