

उचंगी येथे काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी…
लाखोंचे नुकसान

उन्हाची तीव्रता वाढेल तसे आजरा तालुक्यामध्ये जंगलांसह काजू बागांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. आज उचंगी येथे लागलेल्या आगीमध्ये सौ. भारती शिंदे, रवळनाथ देसाई, मलगोंडा पाटील, धोंडीबा खांडेकर यांच्यासह नाईक परिवार व इतर शेतकऱ्यांचे काजूच्या झाडांचे सुमारे पाच लाखावर नुकसान झाले आहे.
भर दुपारी जंगलातून आलेला वणवा शेती पिकांमध्ये घुसल्यामुळे पाहता पाहता काजूच्या झाडांसह गवत व इतर शेती उपयोगी साहित्याने पेट घेतला. दुपारची वेळ असल्यामुळे शेतकरी वर्ग काहीच करू शकला नाही. अल्पावधीतच येथील काजूच्या बागा आगीच्या भक्षस्थानी पडल्या.
सध्या काजू पिकांना चांगलाच बहर आला असून हातात आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

श्री हरी काका गोसावी मठात विविध कार्यक्रम उत्साहात !
सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपासह ग्रंथालयाचा शुभारंभ

प.पू. सदगुरू एकनाथदादा गोसावी यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्य श्री. हरीकाका गोसावी ऋग्वेदी-भागवत माठ यमकनमर्डी – हत्तरगी येथे पीठाधीश डॉ.आनंद उर्फ नरसिंह गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सिंबोयसीस स्कूल हरळीचे माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
हुक्केरीचे गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील शाळातून शिष्यवृत्तीसाठी १०५ विद्यार्थ्यांची निवड केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना एक लाख रक्कमेची शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित साधून प.पू.सदगुरू श्री एकनाथदादा यांच्या नावाने ग्रंथालयाचा शुभारंभ मजलट्टी येथील बसवप्रभू स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्रंथालयात धार्मिक ग्रंथसंपदा भक्तांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
यावेळी दत्ता देशपांडे यांनी या ग्रंथालयास २५ हजार रक्कमेचे ग्रंथ देण्याचे जाहीर केले. सामजिक जाणीवेतून लम्पी आजाराने बाधित झालेल्या जनावरांवर उपचार केलेबद्दल पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ.सुधाकर जाधव (आजरा) सुभाष पारपोलकर, मलिक कादरभाई, तेरणीचे बसवराज आगसकी, नरसिंगपूरचे सिनियर व्हेटरनरी इन्स्पेक्टर डॉ. आपन्ना कारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. आनंदमहाराज गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यात अनेक कलागुण असतात. कलागुण जोपासण्यात व त्याची वाढ करण्यात जात, वर्ण, रंग यांचा काही संबध नसतो. इथे फक्त कर्तुत्वालाच महत्व आहे असे स्पष्ट करीत, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे आवाहनही केले.
यावेळी दत्ता देशपांडे, मोहन दंडीन, गुरुनाथ कुलकर्णी, बसवप्रभू स्वामी यांनी तर विद्यार्थ्यांच्यावतीने सई जाधव (जरळी) हिने मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात श्री हरीकाका संस्कृत पाठशाळेच्यावतीने विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता व आरोग्य’या विषयांवर ‘जयतु वैदिक धर्म’ हि नाटिका सादर करून सर्वांची मने जिंकली.
यावेळी श्रीहरीकाका व एकनाथदादा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करणायत आले. विश्वस्त डॉ. प्रा. सुनील देसाई यांनी स्वागत केले.
डॉ. श्रीशैल मठपती यांनी प्रास्ताविकात मठाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी वेणुगोपाल गोसावी, चारुदत्त गोसावी, सुमित्रादेवी गोसावी, प्रकाश आवलक्की, सिम्बोयोसीस स्कूलच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला, व्यंकटेश सरनोबत, सौ.लक्ष्मी सरनोबत, आर.जी कुलकर्णी, शशीशेखर जनवाडकर, टी.एम. दुंडगे, विठ्ठल चौगुले, सुरेंद्र बांदेकर, अजित पाटील- हुनगीनहाल, राजेंद्र शेलार, आण्णासो जाधव, संतोष पोवार, नंदकुमार माळी, गोपाळ चपणे, राजू नाशिपुडी, डॉ.नंदकुमार जोशी, माजी आमदार बजरंग देसाई यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व हरीभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी व शिवानंद मठपती यांनी केले. मेघना बालीघाटे यांनी आभार मानले.

श्रीतेज चव्हाण यांचे यश

आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी गावचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि कवी श्रीकांत चव्हाण (सध्या रा. मुंबई) यांचा मुलगा श्रीतेज चव्हाण यांना २०२३ बिझनेस एनॅलिसिस स्टुडंट कॉम्पीटीशन या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, अॅरलिंगटन, अमेरिका येथे २३ मार्च २०२३ रोजी पार पडली. श्रीतेज हा इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (IIT Madras) येथून B. Tech & M. Tech पदवी धारक आहे. त्यानंतर तो मल्टी नॅशनल कंपनीत ( MNC) डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी करत होता. नोकरी सोडून सध्या तो M.S. करण्यासाठी अमेरिकेतील UTD युनिव्हर्सिटीत Data Science या विषयात उच्च शिक्षण घेत आहे.





