

🟣तामिळनाडूतील किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी; राज्यात पुढील २ दिवस पावसाचा अंदाज

🔹नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात मंदोस चक्रीवादळाचे अस्मानी संकट पाहायला मिळत आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकले, त्यानंतर शनिवारी तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रावरही चक्रीवादळाचा परिणाम झाला असून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे
तामिळनाडूला मंदोस चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र आता तामिळनाडू किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंडोस चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. तामिळनाडूमध्ये सध्या बचावकार्य सुरु आहे. वादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्यासाठी एकूण 25,000 कर्मचारी तैनात आहेत. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनसह नागरी संस्थांकडून प्रशासनाच्या मदतीने पडलेली झाडे हटवण्याचं काम सुरु आहे.
मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे चेन्नई किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळाने समुद्र किनाऱ्यावर चांगलाच धुमाकूळ घातला. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा फटका कमी बसला आणि जास्त नुकसान झालं नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बाधित भागांना भेट दिली आणि बाधितांना अत्यावश्यक वस्तूंचं वाटप केलं. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे जास्त नुकसान झालेले नाही.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात असून गरज भासल्यास केंद्राची मदत घेतली जाईल. चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, या घटनांमुळे सुमारे 181 घरांचं नुकसान झाले असून इतर प्रकारच्या नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. सुमारे 3163 कुटुंबातील 9130 लोकांना 201 मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
Source:-https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

आजऱ्यासह तालुक्यात पाऊस
आजरा शहरासह तालुक्यात ठीक- ठिकाणी आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ऊस तोडणी यंत्रणा कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली.ऊस वाहतूक करणारी यंत्रणाही काही काळाकरता ठप्प झाली आहे.
दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर पाच वर्षाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. बऱ्यापैकी झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच अडचण झाली आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बहरात असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे ऊस तोडणी यंत्रणेवर याचा परिणाम होताना दिसत आहे.
एकीकडे गेले चार दिवस थंडीत वाढ झाली असताना आज अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणातील या बदलामुळे विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



