रविवार दि.१३ सप्टेंबर २०२६

‘सेनेच्या राजा’चे दणक्यात आगमन
पारंपारिक वाद्यांनी शहर दणाणले…

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील शिवसेनाप्रणित जय शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या सेनेच्या राजाचे दणक्यात आगमन झाले आहे. मूर्ती प्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेतून ढोल- ताशा, लेझीम यासह पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटात २१ फुटी मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
येथील छत्रपती संभाजी चौकात शिवसेना जिल्ह्याचे नेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, सभापती सौ. यशोदा पोवार, विजयकुमार पाटील, बाळ केसरकर, मंडळाचे प्रमुख संभाजी पाटील व युवराज पोवार आदींच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करून भाविकांना मूर्तीचे दर्शन खुले करण्यात आले.
ढोल ताशाचा गजर, प्रचंड आतषबाजी व पारंपारिक वाद्याच्या निनादात शहरातील मुख्य बाजारपेठेतून मंडळाच्या मंडपामध्ये मिरवणुकी द्वारे मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी सिद्धेश नाईक, वैभव सावंत, रवी भाटले, मंडळाचे अध्यक्ष रोहन गिरी, बापू पारपोलकर, रवी तळेवाडीकर, मुरलीधर दावणे, शरद कोरगावकर, सौरभ पाटील, अनुसया पाटील, चंद्रकांत व्हरकटे, ओंकार माध्याळकर, अजिंक्य विजयकुमार पाटील, अमित गुरव, प्रथमेश खोत, महेश पाटील, सौरभ पाटील, महेश खेडेकर, भिकाजी विभुते यांच्यासह शिवसैनिक व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा शेतकरी संघाची ६७ वी सर्वसाधारण सभा उत्साहात…
शक्तीपीठला विरोध, हत्तींसह वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठराव

आजरा : प्रतिनिधी
उद्योजकांच्या हितासाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादत आहे. यातून अनेक जण बाधीत होणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरणालाही धोका तयार झाला आहे. या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर हत्तींनी तालुक्यात मोठा डघूस घातला आहे. त्याचबरोबर बिबटे व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी आजरा तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. याबाबतचे ठरावही घेण्यात आले.
येथील शेतकरी संघाच्या सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. तालुका संघाचे अध्यक्ष महादेव हेब्बाळकर अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष संभाजी तांबेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई प्रमुख उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री. तांबेकर यांनी. श्रध्दांजलीचा ठराव मांडला. मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयात अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय खेळामधे गोल्डमेडल मिळवल्याबाबत सिध्दी राकेश करमळकर, शालांत परिक्षेत यश मिळवलेले खतीजा शहानवाज मूल्ला, राजेश सुनिल पाटील, समिक्षा संदिप तोरस्कर, विपूल बाळाराम इंगळे, प्रणिता रविंद्र कांबळे, अहवाल सालात उत्कृष्ट सेवेबद्दल संतोष पोवार (धामणे शाखा), विठ्ठल तुकाराम पाटील (खत विभाग), लक्ष्मण चंद्र माडभगत (गवसे) या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, संजय देसाई, संजय तर्डेकर, संभाजी इंजल, तुळशीराम पोवार यांनी कामकाजाबाबत प्रश्न विचारले.
सुधीर देसाई म्हणाले,ऑनलाईन खतविक्रीची पध्दत बंद करावी. लागेल त्याला मागणी नुसार खत पुरवठा करावा अशी सूचना मांडली. या वेळी वसंतराव धुरे,विष्णुपंत केसरकर, शिरीष देसाई, राजू होलम, मारुती घोरपडे, एम. के. देसाई, दिगंबर देसाई, रणजीत देसाई, विठ्ठलराव देसाई, अनिल फडके, अल्बर्ट डिसोजा, जोतिबा चाळके, सुभाष देसाई, राजू मुरकुटे, सहदेव प्रभू, संभाजी इंजल, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर यांच्यासह संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. गणपती सांगले यांनी आभार मानले.

आजरा महाविद्यालयात इंग्रजी विभागाचा Alumni Interaction कार्यक्रम संपन्न
आजरा : प्रतिनिधी
आजरा महाविद्यालय, आजरा येथील इंग्रजी विभागाच्या (Senior Wing) वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘Alumni Interaction Activity’ हा विशेष उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून प्रेरणा व पुढील संधींबाबत मार्गदर्शन मिळावे हा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. शेखर शिऊडकर यांनी स्वागत व परिचयाने केली. प्रमुख पाहुण्या म्हणून प्राथमिक शिक्षिका पाऊलीन संतान मस्कारनेस यांनी आपला शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास सांगत संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्षस्थानी प्रा. रमेश चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव हे प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सूत्रसंचालन प्रा. शिऊडकर यांनी केले, तर प्रा. संदीप देसाई यांनी आभार मानले.

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याची अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी…

आजरा : प्रतिनिधी
आजऱ्यात कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासनाची दिलेले लॅपटॉप परत करत कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्व समावेशक तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार नवीन आकृतीबंध तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी विभागाचा सध्याचा अपारदर्शक व अ तांत्रिक आकृतीबंध रद्द करून सर्व समावेशक तज्ञ समितीची स्थापना करावी आणि समितीच्या शिफारशीनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा अशी मागणी कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.

प्रकाश पाटील यांना श्रद्धांजली

आजरा: प्रतिनिधी
राष्ट्रीय वनशहीद दिनाचे औचित्य साधून गौसे येथील वनशहीद कै. प्रकाश गोविंद पाटील यांच्या फ़ॉरेस्ट रेंज ऑफिस आजराच्या प्रांगणात वन विभागाने उभा केलेले कोनशिला स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुधीर देसाई (सदस्य, जिल्हा परिषद कोल्हापूर. संचालक, KDCC बँक.) यांच्यासह गवसे गावचे उपसरपंच अविनाश हेब्बाळकर, मुमेवाडीचे बबन पाटील, हत्तीवडे शुभम पाटील, रणजित कालेकर, वनरक्षक प्रियांका पाटील, वनमजूर शिंदे, शंकर सुतार उपस्थित होते.

आजचे पंचांग
दिनांक : १३ सप्टेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (सकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (दुपारी ०१.०६ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : शुक्ल योग (दुपारी ०१.४२ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : कौलव करण (सकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कन्या राशी (१४ सप्टेंबर रात्री ०१.२६ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.१० ते सायंकाळी ०६.४५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी १२.५९
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

सफाई सेविका बाळवाबाई कांबळे यांचे निधन.

उत्तूर येथील माजी ग्रामपंचायत सफाई सेविका बाळवाबाई आण्णापा कांबळे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी उत्तूर ग्रामपंचायतीत सुमारे २० वर्षे सफाईकामगार म्हणून प्रामाणिक सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात मुलगी, सून, नातू व नात असा परिवार आहे.
छायावृत्त…

करपेवाडी खालसा येथे हत्तीने धुमाकूळ घालत विलास नाईक यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
